kinwat today news
सलाम-या-वॉरियरला…-वडिलांवर-अंत्यंसंस्कार-आटोपताच-लिहिली-बातमी

सलाम या वॉरियरला… वडिलांवर अंत्यंसंस्कार आटोपताच लिहिली बातमी

यवतमाळ : कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी संपूर्ण यंत्रणाच रात्रंदिवस राबत आहे. महसूल, पोलिस, आरोग्य यंत्रणा, प्रशासनातील बडे अधिकारी दिवसरात्र एक करीत आहेत. नातेवाइकांची भेट तर सोडाच, आजारी आई-वडीलदेखील सरकारी नोकरीत असलेल्या आपल्या मुलांच्या भेटीसाठी कासावीस झाले आहेत. देशाला आपली आज गरज असताना आपण आपले दु:ख कुठपर्यंत कवटाळत बसायचे, म्हणून कित्येक जण कोरोनाच्या युद्धाला प्रथम महत्त्व देत आहेत. या “फ्रंटलाइन वॉरिअर्स’मध्ये जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांचे नाव अग्रक्रमाने येते. वडिलांवर अंत्यंसंस्कार करून घरी येत नाही, तोच कोरोनासंदर्भातील बातमी लिहून आपल्या कर्तव्याला त्यांनी प्राधान्य दिले.

यवतमाळचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर हे मूळचे वर्धा येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील काशिनाथ जगन्नाथ येसनकर यांचे बुधवारी (ता. 15) रात्री दीर्घ आजाराने वर्धा येथे निधन झाले. वडिलांच्या निधनाचे वृत्त ज्यावेळी कळले, त्यावेळी ते कर्तव्यावरच होते. त्यांनी ती रात्र जागून काढली. सकाळी वर्धा येथे जाऊन वडिलांचे अंत्यदर्शन घेतले. कोरोना विषाणूविरोधातील युद्धात पोलिस, आरोग्य आणि प्रशासनातील यंत्रणा लढत आहे. त्यात प्रिंट आणि इलेक्‍ट्रॉनिक मीडियाचा उल्लेख करून पुढे जाता येत नाही.

सर्व नागरिक आपापल्या घरी सुरक्षित आहेत. त्यांना घरीच थांबण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. घरात सुखरूप असलेल्या नागरिकांना आपल्या गाव, शहरातील विश्‍वसनीय अपडेट माहिती देण्याचे काम पत्रकार करीत आहेत. आणीबाणीच्या परिस्थितीत बातमी देताना एखादी चूक झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे वृत्तांकन करताना तितकेच सजग रहावे लागत आहे. पत्रकारांसाठी विश्‍वसनीय माहितीचा स्रोत जिल्हा माहिती कार्यालय आहे.

कोरोना विषाणूंचा संसर्ग सुरू झाल्यापासून माध्यमांना माहिती पुरविण्याचे काम डिआयओ म्हणून राजेश येसनकर अतिशय जबाबदारीने करीत आहे. त्यामुळे कोरोनाबाबतच्या अपडेट माहिती मिळविण्यासाठी रात्री उशिरापर्यंत पत्रकारांचे लक्ष त्यांच्याकडे असते. जिल्हा माहिती अधिकारी कोणतेही कारण न वाचता प्रत्येक घडामोड माध्यमांना उपलब्ध करून देत आहे. या विश्‍वसनीय स्त्रोतात येसनकर यांनी गुरुवारी (ता. 16) खंड पडू दिला नाही. अपडेट माहितीसाठी पत्रकारांची धडपड सुरू असतानाच डिआयओकडून रोजच्या वेळेवर बातमी आली. आपले दु:ख बाजूला ठेवून कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना यवतमाळच्या पत्रकारसृष्टीने ‘सॅल्यूट’ ठोकला.

– भरभरून पिकलाय संत्रा; शेतक-यांचे खिसे मात्र रिकामेच
 

हाडाचे पत्रकार हीच ओळख
जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांची काही वर्षे विविध दैनिकात पत्रकार म्हणून काम केले. पत्रकारांच्या वाटेला येणाऱ्या संघर्षाची जाणीव त्यांना आहे. शासनाच्या सेवेत असताना त्यांनी आपल्यातील संवेदनशील पत्रकार तसाच जपला. त्याचा परिचय अनेकदा आला आहे. कीटकनाशक फवारणी, बोंडअळी, लोकसभा, विधानसभा निवडणूक या काळातही वडिलांचे आजारपण सांभाळून कर्तव्याला प्राधान्य दिले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply