kinwat today news
इराणमध्ये-अडकलेले-`ते`-चौघे-परतले

इराणमध्ये अडकलेले `ते` चौघे परतले

बांदा (सिंधुदुर्ग) – इराणमध्ये अडकलेले “ते’ चार युवक अखेर काल (ता. 16) सायंकाळी उशिरा आपापल्या घरी दाखल झाले. तब्बल 26 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी फोंडा (गोवा) येथे त्यांनी पूर्ण केला. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सर्व कागदोपत्री परवानग्या पूर्ण झाल्यानंतर त्यांची विलगीकरण कक्षातून मुक्तता करण्यात आली. पत्रादेवी-बांदा तपासणी नाक्‍यावर त्यांचे गावाच्यावतीने उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. 

गोव्यातील जीकेबी या चष्माच्या कंपनीकडून दोन वर्षाच्या मुदतीसाठी इराण येथील कारखान्यात सिंधुदुर्गातील सात व कोल्हापूर येथील एका युवकाला पाठविण्यात आले होते. 14 मार्चला त्यांचा प्रशिक्षण कालावधी संपला होता. त्यांनी भारतात परतीची तिकिटेही काढली होती; मात्र त्याच दरम्यान भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्याने हे सर्व युवक इराणमध्येच अडकले. 
याबाबत “सकाळ’ने सर्वप्रथम आवाज उठवित प्रशासनाचे लक्ष वेधले होते. आमदार नीतेश राणे यांनी युवकांशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी इराण सरकारकडून कोणतीही दखल घेतली नसल्याचे समजताच आमदार राणे यांनी इराणमधील भारत दुतावासाशी संपर्क साधला. त्यानंतर सर्व युवकांना भारतात परत आणण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. 

25 दिवसांपूर्वी त्यांना खास विमानाने भारतात आणून फोंडा (गोवा) येथे 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी त्यांना जिल्ह्यात पत्रादेवी बॉर्डरवर आणण्यात आले होते. मात्र आवश्‍यक परवानग्या पूर्ण न झाल्याने त्यांना परत गोव्यात नेण्यात आले होते. याची माहिती संबंधित युवकांनी आमदार राणे यांना दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्याशी राणे यांनी चर्चा करून युवकांना परत आणण्यासाठी आवश्‍यक परवानग्या पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. 

दक्षिण गोवा जिल्हाधिकारी व सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्या सर्व परवानग्या पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी सर्व युवकांना पत्रादेवी-बांदा सीमेवर आणण्यात आले. यात सागर पंडित (सातोसे), उदय पाटकर (वेत्ये), विकास सुतार (भेडशी) व नितीन गावडे (चंदगड) यांचा समावेश आहे. उर्वरित गोव्यातील चार जणांना 10 एप्रिलला घरी पाठविण्यात आले. गावाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. इराणमधून घरी परत येण्यापर्यंतच्या सर्व प्रक्रियेत आमदार नीतेश राणे यांचे खूप मोठे योगदान राहिल्याचे युवकांनी सांगितले. 
 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply