kinwat today news
क्रूर-नियती!-पत्नीच्या-आक्रोशाने-अख्ख-गाव-गहिवरलं

क्रूर नियती! पत्नीच्या आक्रोशाने अख्ख गाव गहिवरलं

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) –  परदेशात राहणाऱ्या मुला-मुलींना गावात राहणाऱ्या आई-वडिलांना वेळ देता येत नाही. इतकंच काय तर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी यायलाही मुलांकडे वेळ नसतो. त्यामुळे शेजारी-पाजारी अंत्यसंस्कार उरकून घेतात. अशावेळी परदेशात राहणाऱ्या मुला-मुलींचा अंत्यसंस्कार व्हिडिओ कॉलद्वारे दाखवण्याचा हट्ट असतो; खरं तर ती गोष्ट पैशापुढे नाती कफल्लक असल्याचे द्योतक असते. अलीकडे असे प्रकार खूप ठिकाणी घडतात. त्यामुळे आपली कुटुंब व्यवस्था संपुष्टात येते, की काय? अशी भीती उभी राहते. अशीच व्हिडिओ कॉलद्वारे अंत्यदर्शन घेण्याची घटना गुरुवारी तालुक्‍यातील मोर्लेत घडली असली तरी तिला अपरिहार्यतेची, कारुण्याची किनार आहे. 

संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी, डोळ्यात टचकन पाणी आणणारी ती घटना. मोर्ले मूळ गाव असलेले चंद्रकांत लक्ष्मण बांदेकर (वय 67) पत्नी, दोन मुले, दोन सुना, नातवंडे यांच्यासोबत अंधेरी पूर्व येथील तेली गल्लीत राहायचे. अधूनमधून ते पत्नीसह गावी यायचे. शिमगोत्सवापूर्वी ते पत्नीसह गावी आले होते. पुन्हा रामनवमीला यायचे असल्याने त्यांनी पत्नीला गावी ठेवले होते; पण तत्पूर्वीच लॉकडाऊन जाहीर झाल्याने ते रामनवमीला येऊन पत्नीला मुंबईला घेऊन जाऊ शकले नाहीत. गावात बीएसएनएलचा टॉवर अलीकडे सुरू झाल्याने त्यांचा संवाद मात्र मोबाईलद्वारे सुरू असायचा. 

दरम्यान, काल (ता. 16) दुपारी चंद्रकांत बांदेकर यांचे मुंबईत निधन झाले. गावकऱ्यांना त्याबाबत माहिती देण्यात आली. पती मुंबईत आणि पत्नी मोर्लेत, अशी अवस्था. पतीच्या अंत्यसंस्कारासाठी पत्नीला मुंबईत न्यायचे अथवा पतीचा मृतदेह गावी आणायचा तर लॉकडाउनमुळे अशक्‍यच. प्रसंग बाका होता. पतीच्या निधनाची कुणकूण लागताच पत्नीने हंबरडाच फोडला. ज्याच्यासोबत अख्ख आयुष्य घालवले, त्याचे अखेरचे दर्शनही घेता येऊ नये यासारखे मोठे दुःख जगात दुसरे नसेल. त्यातही तर पती-पत्नी. त्यामुळे त्यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता.

पतीच्या अंत्यदर्शनासाठी पत्नीचा आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. सरपंच महादेव गवस, उपसरपंच पंकज गवस, पोलिसपाटील तुकाराम चिरमुरे, रमेश गवस, संतोष मोर्ये आदींनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला. मुंबईतही त्यांचा सतत संपर्क सुरू होता. अखेरीस मुंबईहून त्यांच्या सुनेने प्रसंगावधान दाखवून गावातील ग्रामस्थांच्या स्मार्टफोनवर व्हिडिओ कॉल केला. पतीचे पार्थिव बघताच त्यांनी टाहो फोडला. त्याने उपस्थितांनाही गलबलून आले. 

हे पण वाचा – गावाची तहाण भागविण्यासाठी पोटच्या गोळ्याचे पार्थिव ठेवले बाजूला

चंद्रकांत बांदेकर हरहुन्नरी आणि हसतमुख होते. सर्व वयोगटांतील माणसांशी त्यांची मैत्री असायची. ते नाटकात उत्तम भूमिका करायचे, तसेच ते चांगले दिग्दर्शकही होते. मुंबईस्थित मोर्लेवासीयांच्या ग्रामोद्धार मंडळाचेही ते सक्रिय कार्यकर्ते होते. अशा व्यक्तीच्या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली. 

हे पण वाचा –  कथा त्या भावंडांची! तब्बल २७ दिवसांनी थांबला तो माणुसकी गोठवणारा प्रवास                                      

अखेरची भेट हुकली 
सर्वांत मोठे दुःख होते ते पत्नीचे. त्यांना पतीचे अखेरचे दर्शनही लॉकडाउनमुळे प्रत्यक्ष घेता आले नाही. सुखदुःखात एकमेकाला साथ दिली; पण अंतसमयी जवळ राहता आले नाही, अखेरचा निरोपही जोडीदाराला देता आला नाही, त्यामुळे त्यांना झालेले दुःख, त्यांनी भोगलेली वेदना याची कल्पना कुणीही करू शकत नाही. लॉकडाउनमुळे दोन जीवांची अखेरची भेटही होऊ शकली नाही, ते सगळे वास्तव काळीज पोखरणारे आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply