kinwat today news
कोरोनाच्या-काळात-"चेक-फ्रॉम-होम'! 

कोरोनाच्या काळात "चेक फ्रॉम होम'! 

मुंबई – कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर घरातच क्वारंटाईनमध्ये असलेल्या ठाण्यातील एका डॉक्‍टरने आता “वर्क फ्रॉम होम’ धर्तीवर “चेक फ्रॉम होम’ सुरू केले आहे. क्वारंटाईनच्या पाचव्या दिवशी डॉक्‍टर समीर देशपांडे आणि जय शहा यांनी इओन केअर (Aeon Care) या पोर्टलद्वारे एका क्‍लिकवर वैद्यकीय सेवा उपलब्ध केली आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ठाण्यातील इन्फिनिटी मेडिसर्ज सेंटर स्पेशालिटी रुग्णालयाचे डॉक्‍टर समीर देशपांडे सध्या क्वारंटाईनमध्ये आहेत. रुग्णालयात आलेला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे रुग्णालय सील केल्यावर त्यांनी सुरक्षेचा उपाय म्हणून स्वतःहून क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. कोरोनाचे थैमान सुरू असताना रुग्णसेवेचे कर्तव्य बजावणे अत्यावश्‍यक असल्याची जाणीव त्यांना होती. त्यातूनच क्वारंटाईनच्या तिसऱ्या दिवशी त्यांना व्हर्च्युअल वैद्यकीय सेवेची संकल्पना सुचली आणि वेबपोर्टल विषयातील तज्ज्ञ जय शहा यांच्या मदतीने ती पाचव्या दिवशी प्रत्यक्षातही आली. 

डॉ. देशपांडे यांनी सुरू केलेल्या https://aeon.care या वैद्यकीय संकेतस्थळावर केवळ कोरोनाच नाही, तर अन्य आजारांबाबतही माहिती मिळू शकते. नागरिकांना मोफत वैद्यकीय सल्ला देणाऱ्या अनेक नामवंत डॉक्‍टरांची यादी येथे आहे. लॉकडाउनमुळे बहुतेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशा व्यक्तींना आजारांबाबत माहिती आणि उपचारांचा सल्ला मिळणे आवश्‍यक आहे. याच हेतूने इओन केअर सुरू केले, असे त्यांनी सांगितले. आज घराबाहेर न पडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या वैद्यकीय सेवा मिळायला. अशी सेवा “ना नफा’ तत्त्वावर सुरू करण्याची गरज ध्यानात घेऊन संशोधन सुरू केले. माझे सहकारी जय शहा यांच्या मदतीने हे ऑनलाईन पोर्टल अस्तित्वात आले, असे ते म्हणाले. 

घरातच राहा 
नागरिकांचा प्रतिसाद पाहिल्यावर व्हर्च्युअल वैद्यकीय सल्ला केंद्राची किती आवश्‍यकता आहे ते कळले, असे डॉ. देशपांडे सांगतात. क्वारंटाईन सुरू झाल्यावर त्यांना सोसायटीत थोडी अडचण आली होती, मात्र आता सर्व सुरळीत झाले आहे. क्वारंटाईनचा दहावा दिवसही आता संपला. हा कालावधी संपल्यावर पुन्हा प्रत्यक्ष वैद्यकीय सेवा सुरू करणार, असे ते म्हणतात. कोरोनाविरोधी लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी घरातच राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply