kinwat today news
पोटाला-कुलूप-लावत-येत-नाही-साहेब

पोटाला कुलूप लावत येत नाही साहेब

औरंगाबाद : ‘‘आमचा व्यवसाय तीन महिन्यांचा असतो. त्यासाठी आम्ही आठ महिने तयारी करतो. कर्ज काढून सर्व माल खरेदी करतो. काही महिन्यांपूर्वी कूलर तयार करून ठेवतो. आम्ही लाखो रुपये गुंतवणूक करून कूलर तयार केले. मात्र, लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर व्यवसायच थंड पडला. कर्जबाजारी झालो. कूलर तयार करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबाची उपासमार सुरू आहे. दुकानाला कुलूप लावूही; पण पोटाला कसे लावणार?,’’ असा प्रश्न उपस्थित केला तो शहरातील कूलर व्यावसायिक सय्यद अजीम यांनी. 

सय्यद अजीम म्हणाले, ‘‘मागील आठ महिन्यांपासून या व्यवसायाची जोरदार तयारी केली जाते. त्यासाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करतो. आम्ही सर्व प्रकारच्या वस्तू खरेदी केल्या. यामध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य असते. त्याची वॉरंटी असते.

त्याची मुदत संपत आलीय. माझ्याकडे कूलर तयार करणारे कामगार आहेत. त्यांचे फोन येतात. साहेब खाण्यासाठी काहीच नाही. काही पैसे असतील तर द्या. आमचेच लाखो रुपये अडकून पडले आहे.

हेही वाचा- पुरोहितांवर उपासमारीची वेळ

आम्हीच कर्जबाजारी झाल्याने कामगार, मजुरांना देण्यासाठी आमच्याकडे पैसाच नाही. मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. एका कुटुंबात आठ ते दहा माणसे आहेत. त्यांचे पोट कसे भरायचे? एका कूलरची किमत १,५०० ते ५,००० हजारांपर्यंत असते. आता जो पैसा लावला आहे ती मुद्दलसुद्धा निघणार नाही.

एका दुकानात पाच ते सात जण काम करतात तेसुद्धा बेकार झाले आहेत. लॉकडाउन तीन मेपर्यंत आहे; मात्र त्यानंतर खरेदीला कोण येणार,’’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 

ग्राहकांमध्ये भीती

थंड हवामानात कोरोनाचे विषाणू अधिक वेगाने पसरतात, अशा अफवा पसरत आहेत. या भीतीचाही तीन मेनंतर कूलर विक्रीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे याकडे शासनाने लक्ष देऊन कामगारांसह व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी. कारण कूलर बनविण्यासाठी आणून ठेवलेला कच्चा माल तसाच पडून आहे. येत्या पावसाळ्यात त्यातील काही वस्तू कुजणार आहेत, असे सय्यद अजीम यांनी सांगितले. 
 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply