kinwat today news
48-नमुन्यांचे-अहवाल-प्रलंबित

48 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित

ओरोस (सिंधुदुर्ग) –  कोरोना प्रतिबंधासाठी गेले अनेक दिवस अहोरात्र काम करताना नागरिकांशी थेट संपर्क येणाऱ्या जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांची दररोज आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी घेतला आहे. आज नव्याने 10 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रलंबित असलेल्या 40 पैकी 2 नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या 48 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर आयसोलेशनमधील तीन व्यक्ती सोडण्यात आल्या असून सध्या 52 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात 52 व्यक्ती दाखल असून गुरुवारी दाखल असलेल्या तीन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 154 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून 106 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. शुक्रवारी नव्याने 10 नमुने पाठविण्यात आले आहेत. तर दोन नमुन्यांचे अहवाल शुक्रवारी निगेटिव्ह आला आहे. उर्वरित 48 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात आजमितीस 390 व्यक्तींना घरीच क्वारंटाइन करण्यात आले असून 52 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. 28 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केलेल्या अजून 18 व्यक्तींना घरी सोडण्यात आले असून त्याची संख्या 213 आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परदेश, परराज्यातून तसेच परजिल्ह्यातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन ठेवण्यात येते. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन ठेवण्यात येते. या क्वारंटाइन काळात 14 दिवसांपर्यंत या व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत होते. आशा वर्कर्स व आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत हे सर्वेक्षण करण्यात येते. आता सदरचे सर्वेक्षण हे 28 दिवस करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. हे सर्वेक्षण 14 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पुढील सलग 14 दिवस करण्यात येणार आहे. 

वृद्धाश्रमातील व्यक्तीसह कैद्यांची तपासणी 
कोविड 19 रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने जिल्हा रुग्णालयाच्या पथकातर्फे जिल्ह्यातील 7 वृद्धाश्रमांची तपासणी करण्यात आली. एकूण 372 रुग्णांची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. तसेच आश्रमातील वृद्धांची रक्तदाब, मधुमेह तपासणी करुन दोन महिन्यांच्या औषधांचा पुरवठा करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील 6 निवारा केंद्रांची तपासणीही या पथकामार्फत करण्यात आली. त्यामध्ये 101 व्यक्तींची तपासणी करून त्यांचे समुपदेशन करण्यात आले. जिल्ह्यातील ओरोस व सावंतवाडी येथील कारागृहातील कैद्यांची तपासणी वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आली. ओरोस येथील 66 कैद्यांची तपासणी केली. त्यातील 10 कैद्यांना असलेल्या किरकोळ आजारांवर औषधोपचार करण्यात आले. तर सावंतवाडी येथील कारागृहातील 60 कैद्यांची तपासणी करून त्यापैकी किरकोळ आजार असलेल्या 17 कैद्यांवर औषधोपचार करण्यात आले. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये सध्या जिल्हा रुग्णालयामाफत 7 डायलेसिसचे व 1 केमोथेरपीचे रुग्ण सेवा घेत आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज 2119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. 

पोलिस तपासणीसाठी ऑनलाईन स्प्रेडशिट 
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून पोलिस दल सतर्कपणे कर्तव्यावर आहे. आशावेळी पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा जनतेशी नित्य संपर्क येत असतो; पण ज्या व्यक्तीशी संपर्क झाला आहे त्यास कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कसे हे माहीत नसते. त्यामुळे कर्तव्यावर असताना नकळत पणे पोलिस कोरोना विषाणूच्या संपर्कात येऊ शकतात. हा धोका लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची दैनंदिन तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना मध्यम ते तीव्र खोकला, कोरडा खोकला, घशात खवखवणे, श्वास घेण्यास अडथळा, छातीत दुखणे, अशक्तपणा, ताप इ. सारखी लक्षणे आढळून आल्यास त्याविषयी पोलिस अधीक्षक कार्यालयास तत्काळ कळविण्यात येते. यासाठी Sindhudurg Health Cheeklist या नावाने ऑनलाईन स्प्रेडशिट तयार करण्यात आली आहे. यामुळे जिल्हा कोरोना मुक्त रहावा यासाठी काम करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कोणहीती प्राथमिक लक्षणे आढळल्यास त्यांच्यावर वेळीच उपचार करणे शक्‍य होणार आहे. जिल्ह्यातील काही वैद्यकीय अधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे किंवा व्हिडिओ कॉलद्वारे औषधांची माहिती घेऊन टेलिमेडिसिन पुरविण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. 

धान्याचे 100 टक्के वितरण 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील 1 लाख 7 हजार 490 प्राधान्य कुटुंब लाभार्थी व 18 हजार 319 अंत्योदय लाभार्थ्यांना 27 हजार 352 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले. केशरी शिधापत्रिकता धारकांना प्रत्येकी 3 किलो गहू प्रति किलो 8 रुपये दराने व 2 किलो तांदूळ प्रतिकिलो 12 रुपये दराने दोन महिन्यांसाठी वाटप करण्यात येत असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले. 
 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply