kinwat today news
exclusive-:-कोरोनाच्या-विळख्यात-अडकलेल्या-'धारावी'चा-ग्राउंड-झिरो-रिपोर्ट

EXCLUSIVE : कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'धारावी'चा ग्राउंड झिरो रिपोर्ट

मुंबई  : फरसाण, चकल्या, चॉकलेट असे खाद्यपदार्थ तयार करण्याच्या गृहउद्योगांसह चर्मोद्योग, कागद, लोखंड, प्लास्टिकचे कारखाने, पापड, कपडे निर्मिती असे नानाविध उद्योगांसाठी धारावी प्रसिद्ध. पूर असो की दहशतवादी हल्ला, अशा कोणत्याही संकटापुढे कधीही या वस्तीने हार मानली नाही. पण आता ‘कोरोना हॉटस्पॉट’मुळे येथील ही धडधड थंडावली आहे. तर हाताला काम नाही… दोन वेळचे जेवण नाही… त्यामुळे येथील कष्टकरी हताश झाला आहे. आपल्या दारावर कधीही कोरोनाची थाप पडू शकते. त्यामुळे तर रहिवाशी भयभीत झाले आहेत. या संकटातून आपला बचाव व्हावा, पुन्हा नवी उमेद निर्माण व्हावी यासाठी ते पाणावलेल्या डोळ्यांनी सरकारकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. त्याचा हा ग्राऊंड रिपोर्ट..

३५ हजार रहिवाशांची तपासणी
कोरोना संकटावर मात करण्यासाठी माहीम धारावी मेडिकल असोसिएशनने कंबर कसली आहे. पालिका कर्मचारी आणि असोसिएशनच्या सदस्यांनी आतापर्यंत येथील आठ हॉटस्पॉटमधील सुमारे ३५ हजार लोकांची तपासणी पूर्ण केली आहे; तर आणखी २५ हजार लोकांची तपासणी पुढील दिवसांत करण्यात येणार आहे. या भागात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर मुंबई महापालिकेने आठ हॉटस्पॉट निश्‍चित केले. या ठिकाणच्या लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी पालिकेने माहीम धारावी मेडिकल असोसिएशनची मदत घेतली. त्यानुसार ११ एप्रिलपासून संघटनेचे २५ डॉक्‍टर मुंबई महानगर पालिकेसोबत काम करत आहेत. धारावीतील हॉटस्पॉटमधील लोकांची थर्मल तपासणी, रोगाचे निदान होण्यासाठी प्रश्‍न विचारून आवश्‍यक त्या व्यक्तीला मनपा रुग्णालयात पाठविण्यात येत आहे. संशयित रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी केली जाते. गुरुवारपर्यंत (ता. १६) ३५ हजार लोकांची तपासणी करण्यात आली आहे.

Image may contain: one or <a href=more people, people walking, crowd and outdoor” src=”https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t1.0-9/s960x960/93409548_2597563253895614_5330450148327686144_o.jpg?_nc_cat=108&_nc_sid=8024bb&_nc_ohc=8v6gILP0Lb4AX8maIOl&_nc_ht=scontent-sin6-2.xx&_nc_tp=7&oh=c56492ed5a2649bb4eab48d41220ce34&oe=5EBEC6CD” data-mce-src=”https://scontent-sin6-2.xx.fbcdn.net/v/t1.0-9/s960x960/93409548_2597563253895614_5330450148327686144_o.jpg?_nc_cat=108&_nc_sid=8024bb&_nc_ohc=8v6gILP0Lb4AX8maIOl&_nc_ht=scontent-sin6-2.xx&_nc_tp=7&oh=c56492ed5a2649bb4eab48d41220ce34&oe=5EBEC6CD” width=”350″ height=”232″>

मोठी बातमी – ‘ते’ सात आठवडे ज्यानी बदललं संपूर्ण जग; जाणून घ्या कोरोनाचा संपूर्ण प्रवास…

अंतर्गत हॉटस्पॉट
धारावी कोळीवाडा, राजीव गांधीनगर, धारावी ट्रान्सिट कॅम्प, काळा किल्ला, दगडी बिल्डिंग, बालिगानगर, लेबर कॅम्प, कुंभारवाडा.

धारावी उद्योग
छोटे-मोठे उद्योग-  ५ हजार महत्त्वाचे उद्योग- गारमेंट, चमडा बाजार, प्लास्टिक रिसायकल उद्योग, फरसाण
एकूण कामगार- ५० हजार

मुंबई महापालिकेने विचारणा केल्यानुसार कोरोनाविरोधी लढ्यात सहभागी होण्याचे ठरवले आहे. स्थानिक संघटना आणि कर्तव्य म्हणून आम्ही या मोहिमेत सहभागी झालो आहोत. या मोहिमेत आणखी काही सदस्य वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. – डॉ. एस शिंगणापूरकर, अध्यक्ष, माहीम धारावी मेडिकल असोसिएशन.

कामगारांचे भविष्‍य अंधारात!
दाटीवाटीने वसलेल्या झोपड्या, चिंचोळ्या गल्ल्या अशा धारावीतील उद्योगावर कोरोनामुळे संक्रांत आली आहे. फरसाण, गारमेंट, चमडा बाजार, रिसायकल उद्योग कोरोनामुळे ठप्प झाल्याने यामध्ये काम करणारे ५० हजारहून अधिक कामगार हताश आहेत. ‘लॉकडाऊन’च्या काळात सरकारकडून त्यांना कोणतीच मदत होत नसल्याने भविष्य अंधारात आहे. त्यामुळे जनजीवन कधी पूर्ववत होईल, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

 लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे ५ हजार उद्योग ठप्प

 • ५० हजारांपेक्षा कामगार बेरोजगार
 • काम गेले, खिशात पैसा नाही, त्यामुळे कामगार अस्वस्थ
 • अत्यंत छोट्या घरामुळे घरात सोशल डिस्टन्सिंग अशक्‍य
 • ७० टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालयांवर अवलंबून. त्यामुळे संसर्गाचा धोका
 • अरुंद गल्लीबोळात वैद्यकीय तपासणीचे आव्हान
 • असह्य उन्हामुळे नागरिक त्रस्त
 • खासगी दवाखाने, क्‍लिनिक बंद
 • बहुतांश भाग सील केल्यामुळे अन्नधान्य, जेवणाची अबाल
 • आजची आकडेवारी
 • कोरोनामुळे आतापर्यंतचे मृत्यू – १०
 • नवे रुग्ण – १५
 • रुग्णसंख्या – १०१

Image may contain: people walking and outdoor

कामगारांवर उपासमारीची वेळ
धारावीच्या झोपडपट्टीची चर्चा होत असली तरी मुंबईच्या अर्थव्यवस्थेतही तिचा वाटा आहे. आता येथील लहान-मोठे उद्योग ठप्प झाले आहेत. या महानगरीसह आसपासच्या अनेक शहरांतील नागरिकांच्या गरजा येथील उद्योग पूर्ण करते. हे कामगार देशभरातील विविध राज्यांमधून आलेले आहेत. यातील बहुतांश कामगार आता कारखान्यांमध्ये वास्तव्य करतात; तर जेवणाची व्यवस्था खानावळीत होते. उत्तर भारतीय, दक्षिण भारत अशा अनेक प्रकारचे जेवण देणाऱ्या खानावळी येथे आहेत; परंतु त्या आता बंद आहेत. यामुळे विविध उद्योगांतील कामगारांच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना उद्योग मालकांकडून आठवड्याला पगार देतात. त्यामुळे आजवर गाठीला चार पैसे ठेवलेल्या या कष्टकऱ्यांचे सर्व पैसेही खर्च झाले आहेत.

मोठी बातमी – जरा विचार करा, ते स्थलांतरित निघून गेले तर मुंबईचे काय ?

खासगी दवाखाने बंदच
लॉकडाऊनमुळे रेल्वे, बस अशी सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या अनेक खाजगी डॉक्‍टरांना दवाखान्यात पोचता येत नाही. धारावी परिसराच्या आजूबाजूला असलेले डॉक्‍टर एक वेळ दवाखान्यात येतात. पण ठाणे, कल्याण आदी भागांतील बहुतांश डॉक्‍टर दवाखान्यात येऊ शकत नाहीत, असे एका खासगी डॉक्‍टरने सांगितले.

शौचालयातून संसर्गाची भीती
धारावीतील झोपड्‌पट्टीमध्ये राहणाऱ्या खूपच कमी नागरिकांकडे वैयक्तिक शौचालये आहेत. ही वस्ती सुमारे पाचशे एकरवर वसलेली आहे. या ठिकाणी सुमारे १० लाख रहिवाशी आहेत. त्यांच्या नैसर्गिक विधीसाठी पालिका प्रथम शौचालये उपलब्ध करून देत होती; परंतु आता बहुतांश शौचालये अनेक संस्थांना चालविण्यास देण्यात आली आहेत. आमदार, खासदार निधीतून निर्माण होणाऱ्या या शौचालयाच्या वापरासाठी पैसे घेण्यात येतात. या संस्था विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या असून त्यांच्याकडे २ ते ५ शौचालय आहेत. यातून या संस्था महिना लाखो रुपये कमाई करत आहेत. एका शौचकुपाचा वापर सरासरी २०० लोक करत असल्याने एकाच वेळी येणाऱ्या शौचालयात येणाऱ्या लोकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. महापालिकेने संस्थाचालकांना शौचालयात साबण, सॅनिटायझर पुरविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र निर्देश पाळले जात नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे.

मुबलक पाणी पुरवठ्याने दिलासा
कोरोनाचा धारावीत शिरकाव झाल्यानंतर तो रोखण्याचे मोठे आव्हान आरोग्य  विभागासमोर निर्माण झाले. धारावीत शौचालये, पाणी भरण्याच्या सार्वजनिक ठिकाणांमुळे कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होण्याचा धोका होता. तो रोखण्यासाठी महापालिकेने काही शौचालये सॅनिटाईज केली. झोपड्यांतील रहिवाशांनी मीटरचे पाणी घेतल्याने सार्वजनिक नळांवर आता खूपच कमी गर्दी होते. तसेच पाणी अधिक वेळ सोडण्यात आले. त्यामुळे लोकांना मुबलक पाणीही मिळाले.

लॉकडाऊनमुळे अनेक कामगार धारावीत अडकून पडले आहेत. या लोकांसाठी राज्य सरकारने दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे; परंतु ते गरजू लोकांपर्यंत पोचत नाही. सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि या कामगारांचा संपर्क नसल्याने कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.  कामगारांच्या जेवणासाठी मोठ्या मैदानात सेंट्रल किचन निर्माण करावे – राजेश खंदारे, सामाजिक कार्यकर्ते.

धारावीतील काही व्यक्ती, मालक या कामगारांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत. त्यामुळे गर्दीची भीड न बाळगता ४०० ते ५०० कामगार एका ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग राखण्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. – अंजुम, सदस्य, भिवंडी बिझनेस असोसिएशन.

exclusive ground zero coverage on asias largest slum dharavi during corona virus crisis 

Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply