kinwat today news
सतर्कता!-आरोग्य-यंत्रणेकडून-गृहभेटींचा-सपाटा

सतर्कता! आरोग्य यंत्रणेकडून गृहभेटींचा सपाटा

ओरोस (सिंधुदुर्ग) –  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेच्यावतीने 6 लाख 87 हजार 679 लोकांचा सर्व्हे करण्यात आला आहे. यातील 3 हजार 729 लोकांना सर्दी व खोकला ही कोरोनाची असलेली लक्षणे आढळून आली होती. हे सर्व रुग्ण आता व्यवस्थित आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी आज झालेल्या आरोग्य समिती सभेत दिली. 

आरोग्य सभापती सावी लोके यांच्या अध्यक्षतेखाली बॅ. नाथ पै सभागृहात झालेल्या या तहकूब सभेला सदस्य उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनासंदर्भात आढावा घेण्यात आला. डॉ. खलिपे म्हणाले, “”जिल्ह्यात आतापर्यंत 124 रुग्णांना आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले होते. यातील 69 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे, तर 55 रुग्ण आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. आतापर्यंत 144 रुग्णांचे कोरोना नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील एकच नमुना पॉझिटिव्ह आला होता.

103 नमुने निगेटिव्ह आले असून 40 नमुने प्रलंबित आहेत.” 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून महिन्यातून चार वेळा गृहभेटी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. एका आशा स्वयंसेविकेकडे एक हजार घरे दिलेली आहेत. आठवड्यात तिने पाच दिवस काम करायचे आहे. दिवसाला 50 गृहभेटी द्यायच्या आहेत. यासाठी त्यांना नियमित मानधनाव्यतिरिक्त केंद्र सरकार व जिल्हा परिषद विशेष अनुदान देणार आहेत. एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी हे अनुदान असून केंद्र सरकार दोन हजार रुपये तर जिल्हा परिषद एक हजार रुपये देणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेने साथरोगअंतर्गत 10 लाख रुपयांची विशेष तरतूद केली आहे, अशी माहिती डॉ. खलिपे यांनी दिली. 

माकडतापाने 4 मृत, 35 रुग्ण 
पूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातलेले असताना सिंधुदुर्ग जिल्हाही त्याचा सामना करीत आहे; मात्र याच वेळी अर्धा सिंधुदुर्ग जिल्हा माकडताप रोगाचा सामना करीत आहे. परिणामी जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण आला आहे. माकडतापाचे जिल्ह्यात नव्याने 35 रुग्ण आढळले आहेत. यातील 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू गोवा बांबुळी मेडिकल कॉलेजमध्ये तर एकाचा मृत्यू जिल्हा रुग्णालयात झाला आहे. 

संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये महसूलने सेवा द्यावी 
कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये केवळ आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची आहे. यामध्ये दाखल असलेल्या रुग्णांना जेवण पुरविणे, स्वच्छता राखणे, साहित्य पुरविणे ही जबाबदारी महसूल विभागाची आहे, असे डॉ. खलिपे यांनी सांगितले. याबाबत सदस्य खोबरेकर यांनी प्रश्‍न उपस्थित करीत संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये सुविधा पुरविल्या जात नसल्याचे सांगितले होते. 

आंबा वाहतूकदारांची नोंद ठेवा 
यावेळी सभाध्यक्षा सौ. लोके यांनी आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनातून हायरिस्क असलेल्या पुणे, मुंबई येथील नागरिकांची जिल्ह्यात वाहतूक करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेने आंबा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चालकांचे नंबर घेऊन अशी वाहतूक होत असल्यास लक्ष ठेवावे, असे आदेश प्रशासनाला दिले. 

तक्रार कृती समितीने करावी 
हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणचे नागरिक ग्रामीण भागात दाखल होत आहेत. अशा व्यक्तींची पोलिस तक्रार आरोग्य विभागाने करावी, अशी मागणी खोबरेकर यांनी यावेळी केली. जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा कोरोना प्रतिबंधासाठी गुंतलेली आहे. यावेळी त्यांना पोलिस तक्रारसारख्या विषयात गुंतवता येणार नाही. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावागावात स्थापित झालेल्या कृती समितीमधील तलाठी, ग्रामसेवक, पोलिसपाटील यांनी अशा प्रकारे नागरिक आढळून आल्यास तक्रार करावी, असे डॉ. खलिपे यांनी सांगितले. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply