kinwat today news
पूर्ण-इस्लामपूर-शहर-बफर-झोनमध्ये;-बाहेर-पडाल-तर,-कडक-कारवाई 

पूर्ण इस्लामपूर शहर बफर झोनमध्ये; बाहेर पडाल तर, कडक कारवाई 

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : शहरात ज्या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्या भागात पुन्हा कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी तो भाग पूर्ण प्रतिबंधित करण्याच्या सूचना आज जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. तशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण इस्लामपूर शहराचा समावेश बफर झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत मर्यादित हालचालीच शहरात सुरू राहतील. त्यामुळे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेली शिथिलता इस्लामपूर शहराला लागू असणार नाही, असे समजते. या आदेशाचे निकष स्थानिक व तालुका प्रशासनाला कळवले जाणार आहेत

मार्च महिन्यात इस्लामपूर शहरात एकापाठोपाठ २५ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याच्या घटनेने जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. त्यामुळे जिल्हा आणि इस्लामपूर शहराचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला होता. या २५ रुग्णांची तूर्तास कोरोनामधून मुक्तता झाली असली तरी शहरावरचा धोका टळला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे असल्याने योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून हे कोरोनाबधित रुग्ण ज्या भागात आढळले तो परिसर ‘कंटेन्मेंट एरिया तर इतर पूर्ण शहर बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

कंटेन्मेंट एरियामध्ये समाविष्ट असलेला भाग असा 

वाय पी चव्हाण सायकल दुकान ते कुपाडे चिरमुरे भट्टी ते तहसील कार्यालय वाळवा चौक, तहसील चौक ते यल्लमा चौक ते यल्लमा मंदिर, यल्लमा मंदिर ते जावडेकर चौकातील पंडित बापू नलवडे यांचे राहाते घर, या घरापासून गणेश भाजी मंडई ते डॉ गोसावी हॉस्पिटल, हे हॉस्पिटल ते आझाद चौक (मंगलदीप कापड दुकान), या दुकानापासून ते माळी गल्ली ते आप्पा कोरे यांचे राहते घर, जयहिंद थिएटर ते आप्पा कोरे यांचे राहते घर, थिएटर ते काळा मारूती चौक ते पोस्ट ऑफिस कार्यालय. ही नऊ ठिकाणे अत्यंत संवेदनशील मानली जाऊन या ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या एरियामध्ये लोकांना आत बाहेर करण्यास पूर्ण मज्जाव राहील. परस्पर संसर्गामुळे विषाणूचा धोका संभवतो तसेच नागरिकांच्या आरोग्य अथवा सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे पण वाचा – पोलिसांनी लढवली नामी शक्कल अन् कोरोना बाधितांच्या संपर्कातील लोकांना शोधणे झाले सोपे… 

नागरिकांची डोकेदुखी वाढणार 
दुर्दैवाने ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत ती शहराची मुख्य बाजारपेठ आहे. या भागातील पूर्ण आर्थिक उलाढाल थांबेल. आता जो कंटेन्मेंट एरिया आहे त्यामध्ये १६०८ कुटुंबे आणि ७६३१ नागरिकांचा रहिवास आहे. गेले महिनाभर या भागावर प्रशासनाने पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. तालुका आरोग्य विभागाची ३१ पथके सकाळ, संध्याकाळ प्रत्येकाची घरी जाऊन आरोग्य तपासणी करत आहेत. या भागातील एकालाही बाहेर जाऊ दिले नाही की आत येऊ दिले नाही. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या आणि त्याही घरपोच केल्या गेल्या. गरज वाटल्यास एकावेळी एकालाच बाहेर जाऊ दिले. आता ही मुदत आणखी वाढणार असल्याने या नागरिकांची डोकेदुखी वाढणार आहे. पण आरोग्यासाठी नाईलाजास्तव हा निर्णय स्वीकारावा लागेल. 

हे पण वाचा –भाजप कार्यकर्ते आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी नगरसेवकांत यावरून जुंपली 

महिन्याकाठी १२०० कोटींचा फटका

बफर झोनमध्ये पूर्ण शहराचा समावेश केल्याने शहरातील मोठ्या व लघुउद्योजकांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे. एकट्या इस्लामपूर औद्योगिक वसाहतीचा विचार केल्यास महिन्याला सुमारे १२०० कोटी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असते. शेकडो मजुरांचे उदरनिर्वाह या उद्योगांवर अवलंबून आहेत. कधी एकदा शासनाकडून शिथिलता जाहीर केली जाते याकडे हे उद्योजक लक्ष ठेवून होते. गेल्या महिन्यात आर्थिक नुकसान झालेच होते; परंतु आता आणखी सोसण्याची तयारी या उद्योजकांना ठेवावी लागेल.

हे पण वाचा – फोनच्या एका रिंगवर मिळणार आता पैसे : कसे ते वाचा…..

बफर झोन म्हणजे काय?

शासन निर्धारित असे क्षेत्र की ज्यामध्ये ठराविकच आणि मर्यादित गोष्टींना परवानगी राहील. शासनाने लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर इतर भागात ज्या गोष्टी सुरू राहातील त्या सर्वच्या सर्व गोष्टी बफर झोनमध्ये लागू करता येणार नाहीत. इस्लामपूर’हाय रिस्क झोन’मध्ये असल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे!

 

“जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली सूचना विचारात घेऊन उपाययोजना अमलात आणल्या जातील. नागरिकांच्या आरोग्याच्या व जीविताच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही अंमलबजावणी सुरू राहील.”

नागेश पाटील, प्रांताधिकारी.

“वरिष्ठ स्तरावरून बफर झोन, कंटेन्मेंट व कोअर एरियासाठी जे निकष असतील ते लवकरच कळवले जातील, त्यानुसार अंमलबजावणी केली जाईल.”

प्रज्ञा पोतदार-पवार, मुख्याधिकारी.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

3 thoughts on “पूर्ण इस्लामपूर शहर बफर झोनमध्ये; बाहेर पडाल तर, कडक कारवाई 

Leave a Reply