kinwat today news
सोलापूरकर-हुश्श….-औज-बंधाऱ्यात-55-दिवसांचा-पाणीसाठा (video)

सोलापूरकर हुश्श…. औज बंधाऱ्यात 55 दिवसांचा पाणीसाठा (VIDEO)

सोलापूर : शहराला पाणीपुरवठा होणारा औज बंधारा शुक्रवारी सायंकाळी “ओव्हरफ्लो’ होऊन वाहू लागला. त्यामुळे बंधाऱ्यातील पाणी टाकळीकडे वेगाने सरकत आहे. उपलब्ध पाणीसाठा हा अंदाजे 55 दिवस पुरणार असून, शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक हे तीन दिवसाआडच असणार आहे. लॉकडाऊनमुळे बंधाऱ्याच्या परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. धुळखेडकडून बंधाऱ्याला जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बंधाऱ्यावर जाण्यासाठी कुरघोटमार्गाचा वापर करावा लागत आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: बाहेरील आणि पाणी
औज बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडण्यात आलेले पाणी शुक्रवारी पहाटे एक वाजता औज बंधाऱ्यात पोचले. सायंकाळी सातनंतर बंधारा ओव्हरफ्लो होऊन वहात आहे. त्यामुळे शहराचा किमान दोन महिन्यांचा पाणीप्रश्‍न मिटणार आहे. महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार यंदा पहिल्यांदाच घोषित वेळेच्या आधी एक दिवस पाणी बंधाऱ्यात पोचले आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांचा पाण्याचा प्रश्‍न तूर्त सुटला आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: महासागर, आकाश, समुद्र किनारा, बाहेरील, पाणी आणि निसर्ग
औज बंधाऱ्याचा परिसर 

सोलापूर शहराला सध्या तीन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. औज बंधाऱ्यासह चिंचपूर बंधारा साडेचार मीटरपर्यंत भरून घेतला जाणार आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांच्या कालावधीत शहरात पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. वेळेत पाणी नाही पोचले तर उजनी-सोलापूर योजनेवरून शहराला पाणीपुरवठा करण्याची तयारी महापालिकेने ठेवली होती. मात्र, वेळेआधीच पाणी पोचल्याने महापालिका प्रशासनाने सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे. 

बंधारा भरला की लगेच महाराष्ट्र आणि कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून पाण्याचा उपसा सुरू होतो. पिण्याच्या पाण्याची गरज ओळखून महाराष्ट्र हद्दीतील नदीकाठच्या वीजपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल केला जातो. कर्नाटक हद्दीत मात्र 24 तास वीजपुरवठा सुरू असतो. त्यामुळे त्या परिसरातून होणाऱ्या उपशावर नियंत्रण ठेवले तर, पाण्याचा साठा झपाट्याने कमी होणार नाही. शुक्रवारी बंधाऱ्याच्या परिसरात पाहणी केली असता कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांनी आपापल्या मोटारी बंधाऱ्याच्या पात्रात सोडल्या होत्या. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: बाहेरील आणि निसर्ग
कर्नाटक हद्दीत टाकण्यात आलेल्या पाणी उपशाच्या मोटारी 
(सर्व छायाचित्रे ः विजयकुमार सोनवणे)

खंडित वीजपुरवठा आणि स्त्रोतांतील अपुरा पाणीसाठा हेच सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यातील प्रमुख अडथळे आहेत. तो दूर करण्यासाठी एक्‍स्प्रेस फिडर बसविण्याचा निर्णय झाला होता. मात्र ते प्रत्यक्षात आले नाही. उजनी-सोलापूर यशवंत जलाशय योजना, टाकळी-सोरेगाव व भवानी पेठ या तीन स्रोतांतून शहराला पाणीपुरवठा होतो. उजनी योजना 110 किलोमीटर लांब असून, ती 1998 मध्ये कार्यान्वित झाली. तेथून रोज 55 ते 60 दशलक्ष लिटर्स पाणी घेतले जाते. उजनीतून भीमा नदीच्या पात्रात आलेले पाणी औज (दक्षिण सोलापूर) बंधाऱ्यात अडविले जाते. तेथून 35 किलोमीटर लांबीवरून 40 ते 45 दशलक्ष लिटर पाणी घेतले जाते. हिप्परगा तलावातून शहराला रोज 10 ते 11 दशलक्ष लिटर्स पाणी घेतले जाते. हे पाणी गुरुत्वाकर्षणाने पुरविले जाते. उजनी धरणावर 600 अश्‍वशक्तीचे सहा पंप असून, रोज चार पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातो. मात्र, वीजपुरवठा खंडित झाला की पाणीपुरवठ्यात विस्कळितपणा येतो.

औज बंधाऱ्यात 55 दिवसांचा पाणीसाठा (VIDEO)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply