kinwat today news
मच्छीमारांसाठी-महत्त्वाची-बातमी

मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी

मालवण (सिंधुदुर्ग) –  मासळी लिलावाच्या ठिकाणी केवळ मासळी लिलाव घेणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून अन्य नागरिकांना लिलावाच्या ठिकाणी प्रवेशबंदी असेल. याची अंमलबजावणी येत्या 20 तारखेपासून केली जाणार आहे, असे प्रांत वंदना खरमाळे यांनी आज सायंकाळी झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. मासेमारी हंगाम सुरू होणार असला तरी नौकांमधून परजिल्ह्यातील किंवा अन्य भागातून कोणतीही व्यक्ती येथे येणार नाही, याची दक्षता संबंधित नौकामालकांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कारवाईची वेळ आणू नका, असा इशाराही त्यांनी दिला. 

दरम्यान, लिलावस्थळी सातत्याने गर्दी होत असून मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी आपली जबाबदारी झटकत असल्याने मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांना प्रांत खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे यांनी चांगलेच सुनावले. त्यानुसार उद्यापासून मत्स्य व्यवसायचे अधिकारी लिलावाच्या ठिकाणी दोन सत्रांत उपस्थित राहतील, असे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी या वेळी स्पष्ट केले. 

शहरात मासळी लिलावाच्या ठिकाणी सातत्याने गर्दी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज सायंकाळी तहसील कार्यालयात संबंधित अधिकारी, मत्स्य सोसायट्यांचे प्रतिनिधी यांची बैठक प्रांत वंदना खरमाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलिस निरीक्षक विनीत चौधरी, सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, सहायक गटविकास अधिकारी श्‍याम चव्हाण, जे. डी. सावंत, तेजस्विता करंगुटकर, मुरारी भालेकर, मेघनाद धुरी, बाबी जोगी, योगेश मंडलिक, डेनिस नर्होंना, विकी चोपडेकर, सेलेस्तीन फर्नांडिस आदी उपस्थित होते. 

सध्या मासळी मंडईनजीक होणाऱ्या लिलावाच्या ठिकाणी गर्दी होत असून मत्स्य व्यवसाय विभागाकडून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाने आपली जबाबदारी झटकू नये. या ठिकाणी पोलिस व पालिका प्रशासनाचे अधिकारी उपस्थित असताना मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी पुढे येत नाहीत. त्यांच्याकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते ही दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत लिलावाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यासाठी आवश्‍यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना प्रांत खरमाळे यांनी केल्या. 

मच्छीमारांना पास मिळणार 
लिलावाच्या ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी पालिका व पोलिस प्रशासनाचे चांगले सहकार्य मिळत आहे; मात्र मत्स्य व्यवसायच्या महिला अधिकारी तेथे जात असून त्यांचे कोणी ऐकत नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसायच्या अधिकाऱ्यांनी जरा कडक भूमिका घेणे महत्त्वाचे असल्याचे बाबी जोगी यांनी सांगितले. यावेळी तालुक्‍याच्या किनारपट्टी भागातून येणाऱ्या मच्छीमारांना पास द्यावेत, अशी मागणी श्री. धुरी यांनी केली. त्यानुसार सोसायट्यांकडून यादी घेऊन पास दिले जातील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply