kinwat today news
उजनीतून-कालव्यात-सोडणारे-पाणी-बंद 

उजनीतून कालव्यात सोडणारे पाणी बंद 

सोलापूर ः गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले कालव्याचे आवर्तन बंद करण्यात आले आहे. त्याचबरोबर बोगद्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यात आला आहे. औज बंधारा भरल्याने ते पाणी हिळ्ळी बंधाऱ्यात पोचल्यानंतर सोमवारपासून भीमा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी करण्यात येणार असल्याची माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली. 
सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडले जात आहे. आज औज बंधारा भरल्याने ते पाणी हिळ्ळी बंधाऱ्याच्या दिशेने जाऊ लागले आहे. सोमवारी हिळ्ळी बंधाऱ्यात पाणी पोचण्याची शक्‍यता आहे. त्या बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी कमी करण्यात येणार असल्याचेही श्री. साळे यांनी सांगितले. दरम्यान, कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद केले आहे. येत्या एक मेपासून कालव्याच्या माध्यमातून पुन्हा आवर्तन सुरू केले जाणार आहे. सध्या बोगद्यातून 925 क्‍युसेकने पाणी सोडले जात आहे. ते पाणी 20 एप्रिलला बंद केले जाणार आहे. त्यानंतर 22 ते 25 एप्रिलच्या दरम्यान पुन्हा दुसरे आवर्तन बोगद्याच्या माध्यमातून सुरू केले जाणार असल्याचेही श्री. साळे यांनी सांगितले. औज बंधारा भरल्यामुळे पुढील 20 जूनपर्यंत नदीतून पाणी सोडण्याची आवश्‍यकता नाही. यंदा मॉन्सून लवकर येणार असल्याने पाणी सोडण्याची गरज भासणार नाही, अशी अपेक्षाही श्री. साळे यांनी व्यक्त केली. 

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply