kinwat today news
#lockdown20-:-पंढरीतून-सायकलवर-निघाले-होते-उत्तर-प्रदेशाकडे-पण-….

#Lockdown2.0 : पंढरीतून सायकलवर निघाले होते उत्तर प्रदेशाकडे पण ….

दौंड (पुणे) – ‘बाईस दिन घर में बैठे है. पैसे खत्म होने लगे इसलिए साइकिल पर गाव की ओर निकल पडे है. हमको घर जाने दो, मेहरबानी होगी.’ असे आर्जव पंढरपूर येथून सायकल वर उत्तर प्रदेश कडे निघालेल्या तरूणांनी दौंड पोलिसांकडे केले. पोलिसांनी त्यांची समजूत घालून दोन वेळचे जेवण देण्याचे आश्वासन देत निवारागृहात रवानगी केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पंढरपूर मध्ये अर्जुन जुग्गीलाल कुशवाहा (वय २५, रा. मिर्जापूर , ता. साफीपूर, जि. उन्नाव, उत्तर प्रदेश) व त्याचे नऊ अन्य सहकारी गल्लोगली फिरून मटका कुल्फीची विक्री करीत होते. लॅाकडाउन नंतर २२ दिवस त्यांनी विना काम पंढरीत दम धरला परंतु पैसे संपत आल्याने ते हतबल झाले. दरम्यान १४ एप्रिल रोजी लॅाकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढविण्यात आल्याने ते नाईलाजाने १५ एप्रिल रोजी पंढरपूर येथून सायकल वरून गावाकडे निघाले. सायकलवरील गाठोड्यांमध्ये कपडे, मोजके खाद्यपदार्थ, बादली, सायकल मध्ये हवा भरण्यासाठी पंप व सायकल चाकांची रिम, आदी बांधलेले होते. सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरून १६ एप्रिल रोजी रात्री ते दौंड शहरात आले असता रोटरी सर्कल येथे हवालदार रमेश काळे व कॅान्स्टेबल सुरज गुंजाळ यांनी त्यांना अडवून विचारणा करीत दौंड पोलिस ठाण्यात आणले.  

पोलिस ठाण्यात या सायकलस्वारांनी पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांना काहीही करून घरी जाण्याची परवानगी देण्याची कळकळीची विनंती केली. श्री. महाडीक यांनी त्यांना समजावून सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालयातील निवारागृहात रवानगी करीत सायकली जमा करून घेतल्या. लॅाकडाउन संपल्यानंतर वेळ पडल्यास मजूरीची कामे मिळवून देण्याचे आश्वासन श्री. महाडीक यांनी दिले. त्यानंतर अविनाश व आकाश गिदवानी आणि दौंड पोलिसांनी त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.

पंढरपूर ते दौंड हे १४४ किलोमीटरचे अंतर विना मास्क रखरखत्या उन्हात पार करताना त्यांना कोणी अडविले नसले तरी त्यांनी जिल्हाबंदीचा आदेश डावलून सोलापूर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात प्रवेश केला. अनिश्चिततेचे सावट गडद होऊ लागल्याने पंढरपूर ते मिर्जापूर हे १४८६ किलोमीटरचे अंतर सायकल वरून गाठण्याची त्यांची अपरिहार्यता वेदनादायी असली तरी दौंड पोलिसांची सामाजिक बांधिलकी सुखावणारी ठरली.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply