kinwat today news
अखेर-कॅप्टनचे-'ते'-व्हेंटिलेटर-तयार!

अखेर कॅप्टनचे 'ते' व्हेंटिलेटर तयार!

पुणे : संशोधन आणि उत्पादनासाठी मोफत उपलब्ध असलेले निवृत्त कॅप्टन रुस्तम भरुचा यांना व्हेंटिलेटर अखेर तयार करण्यात यश आले आहे. या व्हेंटिलेटरच प्रोटोटाईप विकसित करुन पुढील चाचण्यांसाठी बंगळुरू येथे संबंधित संस्थेकडे पाठविण्याचे यश ऍक्‍युरेट गेजिंग या कंपनीला पदरात पडले आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबरोबरच कमी पडणाऱ्या व्हेंटिलेटरच चर्चाही वाढत गेली. आयात बंद असल्यामुळे देशात व्हेंटिलेटरसाठी पर्याय शोधायला सुरवात झाली. नव्वदच्या दशकातील कॅप्टन भरुचांच्या व्हेंटिलेटरच अगदी भैरव शहा सारख्या अभियंत्यापासून भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी संस्था (आयुका) यांसारख्या मोठ्या वैज्ञानिक संस्थापर्यंत, सर्वांनीच त्याची आधुनिक रचना विकसित केली होती. 

ऍक्‍युरेट गेजींगचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम साळुंके म्हणाले, “आधीच्या रचनेतील सेंसर, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि हार्डवेअरमध्ये आम्ही बदल केला. पूर्णतः पुण्यातील कंपन्यांनी तयार केलेल्या साहित्याचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.” उपचाराच्या प्राथमिक अवस्थेतच रुग्णाला श्‍वासोच्छवासात अडचण झाल्यास हे व्हेंटिलेटर उपयोगात येईल. सर्व प्रकारच्या चाचण्यांमध्ये हे व्हेंटिलेटर यशस्वी ठरले तर, पुढील दोनच आठवड्यात आम्ही उत्पादनाला सुरवात करू असे साळुंके यांनी सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेत कॅप्टन भरुचायांसह रेणू इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे अजय भागवत, साने गुरुजी हॉस्पिटलचे डॉ. शेखर महाजन, डॉ. सुचित केळकर, कंपनीचे अभियंते सुनिल एडके, कैलास गुरव आणि प्रवीण थोरवे यांचा सहभाग होता. 

व्हेंटिलेटरच वैशिष्ट्ये 

– स्वदेशी बनावटीचे, प्रेशर लिमिटेड व्हॉल्यूम जनरेटर या कार्यप्रणालीवर आधारित 
– बॅग वॉल्व मास्कची (एमबीयु) आवश्‍यकता नाही 
– थेट विजेवर, बॅटरीवर आणि आवश्‍यकता वाटल्यास हाताने पंपीग करणे शक्‍य 
– आधुनिक सेन्सरचा वापर, ग्रामीण आणि दुर्गम भागासाठी उपयुक्त 
——————– 
व्हेंटिलेटरच वैद्यकीय वापर

– रुग्णाच्या प्राथमिक उपचारादरम्यान कृत्रिम श्‍वासोच्छवासासाठी 
– फुप्फुसांना पेलवेल एवढाच हवेचा दाब निर्माण करतो, रुग्णाला पालथे झोपवून निगेटिव्ह प्रेशरसाठी मदत होईल, असे साळुंके यांनी सांगितले 
– कोरोनाच्या रुग्णाची दोनही फुफ्फुसे अकार्यक्षम ठरल्यास याचा उपयोग शक्‍य 
—————– 
कोरोनाग्रस्तांसाठी व्हेंटिलेटरचे महत्त्व का? 

कोविड-19 च्या संसर्गामुळे व्यक्तीला न्यूमोनिया होण्याची शक्‍यता मोठ्या प्रमाणावर असते. यामध्ये फुफ्फुसे निकामी होण्याची शक्‍यता जास्त असते. वृद्ध किंवा दुर्धर आजार असलेल्या व्यक्तीला अशावेळी कृत्रीम श्‍वसनाची गरज असते. व्हेंटिलेटरच्या माध्यमातून ही गरज पूर्ण करण्यात येते. व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्यास व्यक्ती दगावण्याची शक्‍यता असते. 
 
व्हेंटिलेटर नसल्यामुळे रुग्ण दगावला असे व्हायला नको म्हणून आम्ही सर्व प्रयत्न करत आहे. अतिशय गंभीर परिस्थितीत सध्या वापरातील अत्याधुनिक व्हेंटिलेटर उपयोगात येतील. परंतु इतर 90 टक्के प्रकरणांत आमचे व्हेंटिलेटर उपयोगात येईल, असा आमचा विश्वास आहे. अशी गंभीर घटना घडल्यावरच सरकारसह आपण सर्व स्वदेशी उत्पादनांचा विचार करतो. त्याऐवजी दीर्घकालीन पाठिंब्याची आणि प्रोत्साहनाची गरज देशातील कंपन्यांना आहे 

– विक्रम साळुंके, व्यवस्थापकीय संचालक, ऍक्‍युरेट गेजींग. 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply