kinwat today news
राज्याच्या-शिक्षण-विभागात-येणार-दिल्ली-पॅटर्न

राज्याच्या शिक्षण विभागात येणार दिल्ली पॅटर्न

सोलापूर ः शिक्षण क्षेत्रात दिल्लीने मोठी प्रगती केली आहे. ती प्रगती नेमक्‍या कोणत्या कारणामुळे झाली, याबाबत सविस्तर चर्चा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी राज्याच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली. झूम व्हीडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून ही चर्चा झाली. त्यामुळे राज्याच्या शिक्षण विभागातही दिल्ली पॅटर्न येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यावतीने संचालक दिनकर पाटील यांच्या पुढाकारातून झूम व्हीसीच्या माध्यमातून दररोज शैक्षणिक विषयावर चर्चा सुरु आहे. त्यामध्ये गुरुवारी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांशी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 880 जणांनी सहभाग घेतला होता. 

राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या प्रेरणेतूनन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे याच्यामार्फत राज्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षण सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी या व्यावसायिक क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या वापरातून व शून्य रूपये खर्चातून ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले जात आहे. गुरुवारी झालेल्या चर्चासत्रामध्ये दिल्लीचे उपमुख्यमंत्री सिसोदिया, दिल्लीचे शिक्षण संचालक बिनय भूषण, दिल्लीच्या शिक्षण विभागाचे सल्लागार शैलेंद्र शर्मा सहभागी झाले होते. 

दिल्लीच्या शैक्षणिक प्रयोगासंदर्भात सिसोदिया यांनी शिक्षण व्यवस्थेत लक्ष देताना पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, पालक सहभाग, अभ्यासक्रम पुनर्रचना या विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. दिल्लीत पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी एकूण अर्थसंकल्पापैकी 25 टक्के म्हणजे एक चतुर्थांश निधी खर्च केला आहे. शिक्षक प्रशिक्षणामध्ये इंटरॅक्‍टिव्ह ट्रेनिंग, सिस्टिमॅटिक इव्हॅल्युएशन या माध्यमातून काम केले. पालक सहभागामध्ये शालेय व्यवस्थापन समित्या सक्षम करून त्यांना शिक्षण प्रक्रियेत सहभागी करून घेतले आहे. अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने मूलभूत वाचन, लेखन व गणित क्रियांसाठी मिशन बुनियाद व हॅप्पीनेस करिक्‍युलम यासारखे बदल केले आहेत. दहावीपर्यंतचे शिक्षण हिंदीतूनच दिले जात असल्याचेही सिसोदिया यांनी त्या चर्चेदरम्यान सांगितले. 

दिल्लीतील शैक्षणिक प्रयोगाबद्दल अधिकाऱ्यांनी काही प्रश्‍न सिसोदिया यांना विचारले. त्याला योग्य ती उत्तरेही त्यांनी दिली. महाराष्ट्राकडून त्यांचे प्रयोग ऐकायला आवडतील असे मत सिसोदिया यांनी व्यक्त केले. राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी राज्यात सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमांबद्दल माहिती दिली. या चर्चेत शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी काही प्रश्‍न विचारुन अधिकाऱ्यांशी संवाद साधला. 

 

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply