kinwat today news

ओबीसी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करावा – ज्योतिबा खराटे

 

माहूर प्रतिनिधी: अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा 28 वा वर्धापन दिन दिनांक 1 नोव्हेंबर रोजी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या अध्यक्षतेखाली व सुभाष क्षीरसागर, नामदेव कातले ,वसंत कपाटे ,सुमित राठोड, समता परिषद यवतमाळ जिल्हा अध्यक्ष आत्माराम जाधव ,अनिल रुणवाल ,किशन राठोड, जीवन कोटरंगे, विलास पवार ,संतोष महल्ले या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यानिमित्ताने बोलताना ज्योतिबा खराटे यांनी बहुजनाच्या न्यायहक्कासाठी विखुरलेल्या ओबीसी समाजाने एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज व्यक्त केली.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष मकरंद सावे यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष सुनील बेहेरे यांनी पर्यटन विभागाच्या यात्री निवासाच्या सभागृहात आयोजित केलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सुभाष क्षीरसागर यांनी केले यावेळी समता, सैनिक गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील बांधवांचा सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना खराटे म्हणाले की, विविध जाती धर्मातील विखुरलेल्या बहुजन ओबीसी समाजावर होणारे अन्याय अत्याचार रोखण्यासाठी दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय नामदार छगन भुजबळ यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. त्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याचे काम अविरतपणे सुरू असून राज्यासह देशात 52 टक्के असलेल्या ओबीसी समाजाची गणना होत नसल्याची बाब खेदजनक असल्याचे सांगून विविध जातीत विखुरलेल्या 348 जाती पोटजाती विसरून आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी व आपल्याला न्यायहक्कासाठी वज्रमूठ बांधावी लागणार असून संघटन मजबूत नसल्यामुळे आर्थिक दृष्ट्या हा समाज मागासलेलाच राहिला अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपले संघटन मजबूत झाले नाही तर भविष्यात अठरापगड जातीत विखुरलेल्या ओबीसीला पारंपरिक धंद्या शिवाय पर्यायच उरणार नाही. त्यामुळेच वेळीच विविध संघटनांनी योग्यपणे येऊन संघटन मजबूत करावे असेही ते म्हणाले .

यावेळी आत्माराम जाधव व संतोष महाले यांनीही मार्गदर्शन केले .याप्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील बेहरे यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक गुरनुले तर आभार प्रदर्शन सुरेश गिर्हे यांनी केले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply