“गाली खळी तुझ्या ग लोचनांनी या लुटावी,  येताच जवळी सखे ग का पापणी तू मिटावी..” कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काव्यमैफल रंगली !

नांदेड ( प्रतिनिधी )
अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र शाखा नांदेड यांच्यावतीने आयोजित कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेली ऑनलाईन काव्यमैफल बहारदार रंगली.

काव्य मैफलीच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यिक वीरभद्र मिरेवाड होते तर नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश मुनेश्वर हे उद्घाटक होते. कविसंमेलनात कवी मिलिंद जाधव, राणी नेमानीवार, साहेबराव कांबळे . रुपेश मुनेश्वर, अर्चना गरुड, विजया तारु, महेंद्र नरवाडे, गणपत गायकवाड, मनोहर बसवंते, सूर्यभान खंदारे, सागर गौरव, सोनबा दवणे सहभागी होते.

रमेश मुनेश्वर यांनी ‘शब्द:चक्षु’ ही कविता सादर करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले तर ‘मातीत शाबूत राहावी म्हणून ‘ ही कविता कवी संमेलनाध्यक्ष वीरभद्र मिरेवाड यांनी सादर करून कार्यक्रमाची बहारदार सुरुवात केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राणी नेमानीवार यांनी केले, प्रास्ताविक सरचिटणीस मिलिंद जाधव यांनी केले, तर आभार रुपेश मुनेश्वर यांनी केले.

साहेबराव कांबळे या कवीने सुंदरसे रचना सादर करून वाहवा मिळवली..
“गाली खळी तुझ्या ग
लोचनांनी या लुटावी,
येताच जवळी सखे ग
का पापणी तू मिटावी..”

यानंतर अर्चना गरुड या कवयित्रीने सुंदर कविता सादर केली..
“चांदण्या रात्रीला
हवास तू कवेत
ऋणानुबंधाची नाते
जुळो तुझं सवेत..”

कवयत्री राणी नेमानीवार बहारदार रचना सादर करून दाद मिळविली..
“जागले एक स्वप्न नवे
मंद का श्वास आहे,
गुंतले तुझ्यात मी प्रेमाचा आभास आहे..”

“रंग प्रेमाचा असतो कसा
कळण्याआधीच रंग तो जसा
जसा जसा रंगत जातो
तसा गोडवा भरत राहतो..”
कवयत्री विजया तारू यांनी ही सुंदर रचना सादर केली.

“का जातीस दूर अशी
दिव्यातील वात बाकी आहे,
ये जवळ जराशी अजूनही
आपली बात बाकी आहे..”
कवी मनोहर बसवंते यांची ही कविता भाव खाऊन गेली.

सांगावा कार महेंद्र नरवाडे यांनी कविता सादर करून वाहवा मिळविली..
“हे कविते, तुझा शिल्पकार
होण्याचे भाग्य मला आज मिळालं
माझ्या रोमारोमात उठणारे
तरंग शब्दमय झाले..”

यानंतर मिलिंद जाधव यांनी सुंदरशी कविता सादर केली..
“परसबागी, चाफा पांढरा
प्रिय चंद्रा, माझ्या दारी
सखे ये ना.. एकदाच
आनंदच बघायला.. ”

कवी रुपेश मुनेश्वर यांनी गेय रचना सादर करून मैफिल जिंकली..
” ये पाऊसधारा घेऊन
ये मोरपिसारा लेऊन
ये सखे साजणी
प्रीतीने न्हाऊनी.. ”

सूर्यभान खंदारे यांनी कविता सादर करून दाद मिळविली..
“निळ्याशार आकाशात
पुनवचा चंद्र आला,
नक्षत्रांच्या भेटीला
चंद्र आहे साक्षीला..”

नजर तिची न माझी
झाली नजरानजर
झाली नजरानजर
ती झाली अजरामर..
कवी सोनबा दवणे यांनी प्रितिची रचना सादर केली.

“तुझी रे छाया, मीच राया
नको विस्मरण, क्षणाचेही..”
कवयत्री उर्मीला परभणकर यांनी सुंदरसी कविता सादर केली.

राजू भगत यांनी प्रेम व्यक्त करणारी कविता सादर केली..
” प्रेम असावे असे
सूईच्या टोकावरही
लक्ष भार पेलणारे,
तुडूंब सागरातही,
वलय निर्माण करणारे ”

गणपत गायकवाड व सागर गोख यांनीही बहारदार रचना सादर केल्या. गुगल मिटवर झालेल्या या कविसंमेलनास बहूसंख्येने ऑनलाईन श्रोते उपस्थित होते.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.