kinwat today news

संत महापुरुषांनी वारंवार सांगितलेला स्वच्छतेचा संदेश अंगिकारून चांगल्या आरोग्यासाठी सर्वांनी स्वच्छता पाळावी- सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार

किनवट/ प्रतिनिधी : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर अनेक रोगांनी डोके वर काढले आहे.याला कारण फक्त अस्वच्छता आहे. केवळ स्वच्छतेमुळेच आरोग्य चांगलं राहतं. आपल्या संत महापुरुषांनी वारंवार आपल्याला स्वच्छतेचं महत्व सांगितलेलं आहे. म्हणूनच आपण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या शहरालगतच्या गोकुंदा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यास आजपासून प्रारंभ करीत आहोत. येथे जरी ग्रामपंचायत असली तरी सरपंच पदाधिकारी तथा ग्रामसेवक यांनी नगरपंचायतीसारखं काम करावं. रस्ते नाल्या स्वच्छ करून सर्व नगरात विद्युत, पाणी व आवश्यक सुविधा पुरवाव्यात यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे, असे प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकिरण एच.पूजार (भाप्रसे ) यांनी केले.
स्वच्छतेचे पुरस्कर्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व जय जवान जय किसान चे जनक दिवंगत प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत गोकुंदा येथून स्वच्छता मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. प्रतिमेला पुष्प अर्पण करून सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण एच. पुजार ग्रामपंचायत ते पेट्रोल पंप पर्यंत सहभागी झाले, त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन रस्ता स्वच्छ करायला सुरुवात केली. त्यानंतर उपस्थित असलेले तहसिलदार उत्तम कागणे, गटविकास अधिकारी सुभाष धनवे, सरपंच राजू मेश्राम, उपसरपंच शेख सलीम, ग्रामपंचायत सदस्य उमेश पिल्लेवार, ग्रामसेवक अशोक चव्हाण, केंद्रप्रमुख रमेश राठोड, रामा उईके, केंद्रीय मुख्याध्यापक राम बुसमवार, तालुका मिडिया समन्वयक उत्तम कानिंदे, मुख्याध्यापक अशोक नेवळे आदींसह गावातील जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस व ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी या प्रत्येकांनी हातात झाडू,खराटा घेऊन संपूर्ण रस्ता स्वच्छ केला.
पुढे बोलतांना सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण म्हणाले, नागरिकांनी आपापले घर, परिसर व दुकानदार – व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने प्रतिष्ठाणे नियमीत स्वच्छ करावीत. कचराकुंडीचा वापर करावा. नाल्यात वा रस्त्यावर घाण, केरकचरा फेकू नये. ग्राम पंचायतीचे पदाधिकारी व ग्रामसेवक यांनी दररोज एकेक वार्ड याप्रमाणे पुढाकार घेऊन संपूर्ण गोकुंदा गाव स्वच्छ करावा. एक महिण्यानंतर पुनःश्च प्रत्यक्ष आढावा घ्यायला आम्ही येणार आहोत. तेव्हा ग्रामपंचायतीला दंड का बक्षिस द्यायचं तेव्हाच आम्ही ठरवू.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply