kinwat today news

संजीवन सहृदयी डाॅ.अशोक बेलखोडे


✍️(c.) : डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट.
मो.नं. : 9420315409, 8411919665.


     वैद्यकीय क्षेत्रातले किनवट तालुक्यातील एक अग्रगण्य नाव म्हणजे डाॅ.अशोक बेलखोडे साहेब होत. परवा दि. १३ सप्टेंबर २०२० रोजी त्यांचा वाढ दिवस संपन्न झाला. त्या निमित्ताने त्यांच्या उत्तुंग वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक कार्याचा छोटेखानी घेतलेला आढावा. 
    " सर्वेपी सुखीना संतु ,
     सर्वे संतु निरामया "

अर्थात : या भूतलावरील सर्व जीव, जंतू, सजीव सृष्टीतील वृक्ष, वनचरे, मानव प्राणी सुखी व समृद्ध व निरामय असावेत असं या प्रार्थनेच्या प्रथम चरणात म्हटल्या गेले आहे. या सजीव सृष्टीतील तमाम मानव प्राणी जनांची सुखी ,समाधानी व निरोगी जीवनाची कामना करणे आज वैद्यकशास्त्रा शिवाय शक्य नाही. वैद्यकशास्त्रा विना आपण सुखी समाधानी राहूच शकत नाही ; हे आजचे ब्रीद झाले आहे. अशा या वैद्यकशास्त्रात निपूण नी पारंगत होणे म्हणावी तेवढी सोपी गोष्ट निश्चितच नाही.


समाजात अनेक तज्ञ वैद्यकशास्त्रज्ञानी ही अवघड किमया पेलली आहे . त्यात ते तरले व आपापल्या सेवाकार्यात यशस्वी पण झालेत. अशीच बरीचशी दिग्गज माणसं या अवघड शास्त्रात पारंगत होऊन यशोशिखर गाठलीत परंतु ही माणसं फार विरळ आहेत. ही अवघड किमया गाठली संजीवन सहृदयी डाॅ.अशोक बेलखोडे साहेबांनी . या दिव्य अशा वैद्यकशास्त्रात सर्वांग निपूण होऊन ते वैद्यकीय सेवा कार्यास लागले व पुढेच पुढे जात राहिले, ते आजतागायत कधीही मागे वळून नाही पाहिले. त्यांच्या वैद्यकीय कार्य क्षेत्राचा आवाका वाढतच राहिला. त्यांच्या सेवा कार्याचा प्रगतीचा आलेख उंचावत राहिला. आज ते निश्चित मुक्कामा पर्यंत येऊन पोहोचले आहेत. या निश्चित मुक्कामा पर्यंत येण्यासाठी त्यांना अनेक खस्ता खाव्या लागल्या.
विद्यार्थी दशेपासूनच त्यांच्यावर राष्ट्र सेवा दलाचे संस्कार पडले. सेवा दलाला वाहून घेणारे निष्काम कर्मयोगी साने गुरूजी, यदुनाथजी तथ्ये , पन्नालालजी सुराणा, डाॅ. व्यंकटेश काब्दे अशा अनेक महान व्यक्तींचे विचार आणि सानिध्य आपणास लाभले आहे.
जागतिक ख्यातीचे सर्वोदयी समाज सेवक, कुष्ठरोग्याच्या सेवा सुश्रुषेसाठी स्वतःच उभं आयुष्य झिजविणारे महान कर्मयोगी बाबा आमटे या हिमालया येवढी उत्तुंग माणसं यांचा संपर्क सहवास आपणास लाभला . या श्रम संस्काराच आपण सोनं केलात. यातूच वैद्यकीय सेवेची उच्च पदवी प्राप्त करून लोक सेवेकरीता आपले ज्ञान पणाला वावलात. आपली रुग्णाप्रती असणारी सामाजिक बांधिलकी , गरीब, आदिवासी, बहुजन, वंचिता विषयी असणारा कारूण्यभाव फार काही सांगून जाते. या सर्व सेवाभावी कार्यातून आपण साने गुरूजी रूग्णालयाची स्थापना केलात. कर्मयोगी बाबा आमटे यांच्या करकमळाने भव्य रुग्णालयाचे उद्घाटन केलात. ही बाब किनवट वासीयाकरीता दीपस्तंभा सारखी आहे.
साहेबांचा आणि माझा वास्तव परिचय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराच्या माध्यमातूनच झालेला आहे. मी १९९३ साली किनवट येथील बळीराम पाटील महाविद्यालयात बी.ए.प्रथम वर्षात शिकत होतो. त्याच वर्षी डिसेंबर महिन्यात रासेयोचे जिल्हा शिबीर महाविद्यालयात घेण्यात आले होते. आमचे रासेयोचे कार्यक्रमाधिकारी मा. रामप्रसाद तौर सरांनी साहेबांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. त्या कार्यक्रमात मी साने गुरूजींचे,” खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे ” हे प्रसिद्ध गीत गायीले. माझ्या आवाजातील हे गीत डाॅ.बेलखोडे साहेबांना फार आवडले. त्यांनी माझे कौतुक करून पाठीवर शाब्बासकीची थाप दिली. या परिचयाला दृढता मिळाली त्यांच्याकडे रूग्ण म्हणून गेलो तेंव्हा. फेब्रुवारी १९९४ चा महिना असावा. त्यावेळेस मी गोकुंदा येथील शासकीय वसतीगृहात राहत होतो. माझ्या अंगात सतत ताप राहू लागली, जेवण मंदावले होते,अशक्तपणा जाणवू लागलेला होता. या प्रसंगी मी साहेबांकडे रूग्ण म्हणून गेलो. साहेबांनी माझ्या रक्ताची तपासणी केली. इतरही सर्वकाही तपासण्या केल्या . तेंव्हा साहेब तालुका आरोग्य अधिकारी म्हणून किनवटच्या आरोग्य केंद्रात रूग्ण सेवा करीत होते. सरकारी दवाखाना असल्यामुळे माझा मोफत विलाज त्यांनी केला व मला सांगितले तूला सतत सहा महिने सकाळ, सायंकाळ मी देत असलेल्या गोळ्या (औषधी) घ्याव्या लागतील असे म्हणाले.
यावर मी म्हणालो,” सर मला झाले तरी काय ?”
” हे तूला मी सहा महिन्यानंतर सांगेन, तो पर्यंत तू मी देतअसलेल्याऔषधी घे , दर महिन्याला यायचे नी औषधी घेऊन जायचे, कळाले ? “
मी दर महिन्याला जाऊन साहेबांना भेटायचो, तपासणी करून औषधी आणायचो. सहा महिन्याचे कोर्स पूर्ण झाल्यावर साहेबांना विचारलो, ” सर मला काय झाले होते ? “
” अरे वसंत, तूला थोडा टी.बी.चा असर झालेला होता. “
मी या भयंकर आजाराने घाबरू वा धास्ताऊ नये, याची पुरेपूर काळजी साहेबांनी घेतली होती. यातच मा.साहेबांची रूग्णा विषयी असणारी कणव व खरी सेवावृत्ती दिसून येते. तेंव्हापासून डाॅक्टर साहेबांचे नी माझे रूणानुबंध घट्ट बांधल्या गेले .
मी,साने गुरूजी रूग्णालय परिवाराचा एक हितचिंतक म्हणून नेहमीच त्यांच्या सेवाकार्याचा आवाका पाहत होतो. साहेबांचे रूग्ण सेवेचे कार्य अतिशय सर्वव्यापी व सर्वस्पर्शी असल्याचे दिसून येते. वैद्यकीय सेवावृत्तीची प्रचंड जिद्द साहेबांच्या ठायी असल्याचे दिसून येते. कुशल सर्जरी,शस्त्रक्रिया करणारा जादूगार म्हटले तरी काही वावगे होणारे नाही. हाताखाली स्वतंत्र अनेस्थेसिया (भूलतज्ज्ञ) नसतांना शस्त्रक्रिया करणे साधी गोष्ट नाही. तरीही जबाबदारी (रिस्क) आपल्या खांद्यावर पत्करून काम करण्याची जादूई हातोटी आपल्या वैद्यकीय कौशल्याचे गमक आहे. कित्येक मरणासन्न रूग्ण, अडले नडलेल्या आया बहिणींना आपल्या हातून जीवदान मिळाले आहे. कित्येकांचे संसार उध्वस्त होतांना वाचले आहे. आजही आपल्या कार्याचा व्याप नी आवाका आजच्या तरुणाईला लाजविणारा आहे. रूग्ण सेवेचे उत्साह आपल्या मुखमंडलावर पाहून रूग्ण शय्येवर मरणासन्न म्हाताराही उत्साहित होत असल्याचे दिसून येते. म्हणून म्हणावेसे वाटते,” वाघाला पहावे अरण्यालयात अन साहेबांना पहावे रूग्णालयात. ” रूग्ण सेवेत ते सर्वस्व तल्लीन होऊन जातात.
साने गुरूजी रूग्णालयाच्या माध्यमातून किनवट सारख्या आदिवासी, दुर्गम, दुर्लक्षित भागात गेली सत्तावीस वर्षापासून आपण रात्रंदिवस इथल्या रूग्णांची संजीवन सेवा करीत आहात ही या उपेक्षित तालुक्या करीता आपली फार मोठी देण आहे. आपण आपल्या ज्ञान कौशल्याच्या जोरावर मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद कुठेही दालन उघडले असते. खोर्‍याने पैसे सावडून आपली झोळीही भरले असते, लाखो करोडोने पैसाही कमवले असते परंतु आपण सर्व हे धुडकाऊन भटक्या विमुक्तांच्या, आदिवासी बहूल, दुर्गम, गोर गरीब तालुक्यात राहणे पसंत केलात. नागपूर जवळील एका लहानशा खेड्यात, ग्रामीण भागात आपला जन्म झाला . हवं तर आपणाला नागपूर सारख्या उप राजधानीत स्थाईक होता आले असते. परंतू आपण तसे नाही केलात. किती मोठा हा त्याग म्हणावा. कदाचित हे स्वप्न भारत जोडो युवा अकादमीच्या माध्यमातून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतच्या सायकल यात्रेत करीत असतांनाच पाहिले असावे. असा मैलो गणतीचा संजीवन यात्री किनवटवासीयांना मिळाला हे मी आमचे भाग्य समजतो. संजीवन सहृदयी डाॅक्टर अशोक बेलखोडे साहेब म्हणजे किनवट सारख्या दुर्गम भागाला मिळालेली अमुल्य देण आहे. या पारंगत देणगीला सांभाळून ठेवणे तमाम किनवट वासीयांच्या हाती आहे.


वैद्यकीय सेवाक्षेत्रात कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे एक अधिकारी म्हणून पदकार्य तरी किती असावेत ? आपले कार्य सर्व सामान्याला तोंडात बोट घालायला लावणारे असे आश्चर्यकारक आहेत ! साने गुरूजी रूग्णालयाचे सर्वस्व व्यवस्थापक, राष्ट्र सेवा दलाचे सक्रिय समन्वयक, नाम फाऊंडेशनचे सक्रिय सदस्य, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे कार्यकारी सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उत्कृष्ट समन्वयक, भारत जोडो युवा अकादमीचे कार्यवाहक, लोक बिराजदारी प्रकल्पाचे निरंतर सदस्य, फिरत्या विज्ञान केंद्राचे संचालक इत्यादी ही यादी लांबच लांब व्यापत जाते. आजही या सर्व क्षेत्रात भरीव असे कार्य मा.साहेबांचे आहे. आपल्या प्रदीर्घ सेवाकार्याची भरीव कामगीरी पाहून शासन व अनेक सेवाभावी संस्थेकडून भाराभर गाठोड्याने पुरस्कार आपणाला मिळालेले आहेत. याची मोजदाद वा गणती नाही. किती व कोण कोणते पुरस्कार मिळालेत म्हणून सांगावेत!
आपल्या वैद्यकीय व सेवाभावी कार्याची पावती म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक संस्थेकडून साने गुरूजी रूग्णालयाला भरपूर देणगी मिळाली. त्यामधे रुग्णवाहिका (अम्बूलन्स ), अत्याधुनिक फिरत्या दवाखान्याची रुग्णवाहिका, रुग्णालयाला अत्याधुनिक वाटर कुलर, नाम फाऊंडेशन कडून शेतकऱ्यांकरीता जे.सी.बी.मशिन, रुग्णालयाकरीता विविध साहित्य व मशिनरी आपल्या निस्पृह सेवाभावी कार्याची पावती आहे. दोन वर्षापूर्वी साने गुरूजी रुग्णालयाचे स्वर्ण महोत्सवी वर्ष आपण अतिशय थाटामाटात साजरे केलात. आज रुग्णालयाला सत्तावीस वर्ष पूर्ण झालेले आहेत. रुग्णालयाच्या स्थापना दिनापासून ते आजतागायत कधीही आपल्या दवाखान्याला कुलूप (Lock)लागलेले नाही. रात्रंदिवस २४×७ ही रूग्ण सेवा अखंडित चालू आहे. या विषयी आपले करावे तेवढे कौतुक कमी आहेत. आज कोरोना काळातही रुग्णालय चोवीस तास काम करीत आहे, सेवा देत आहे.
विविध प्रकारच्या आजाराच्या निर्मूलना करीता मोठ मोठाली आरोग्य शिबीरे आपण आयोजित केलेली आहेत. त्यामध्ये नेत्ररोग निदान शिबीर, कुटुंब नियोजनाची शिबीरे, हरण्या व अंपेडिक्स शस्त्रक्रिया शिबीर, अंगरोग व मधुमेह निदान शिबीर इत्यादी ही यादी सुध्दा शेपटी सारखी लांबत जाईल. महाराष्ट्रातील ख्यातनाम डाॅक्टर्स, वैद्यकीय शल्य चिकित्सक यांना बोलावून रुग्णांची सेवा आपण केलात. ही आपल्या अफलातून रुग्णसेवा कार्याची जमेची बाजू आहे. मला वाचकांना एक गोष्ट आवर्जून सांगावीसी वाटते. कुटुंब कल्याण वा कुटूंब नियोजन कार्यक्रमातील आपली कामगिरी अतुलनीय अशी आहे.


किनवट, माहूर तालुक्यातील कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमाला आपण पूर्णांशाने वाहून घेतलात. इथे आल्यापासून एकही दिवस उसंत न घेता पूर्णपणे या कार्याच्या समर्पणात स्वतःला झोकून दिलात. केवळ किनवटचेच कार्य न करता अख्खा मराठवाडा, विदर्भ पिंजून काढलात. विदर्भातील बुलढाणा पासून गडचिरोली पर्यंत, ईकडे उस्मानाबाद, लातूर पासून थेट नांदेड, हिंगोली पर्यंत अतिशय निष्णातपणे आपले कौशल्य पणाला लावून आजतागायत ९००० हजार यशस्वी शस्त्रक्रिया आपण केलात. यापैकी ५००० हजार शस्त्रक्रिया आपल्या साने गुरूजी रूग्णालयात झालेल्या आहेत. ही बाब तमाम किनवट वासीयांची छाती अभिमानाने फुलून जावी अशी आहे.
डॉक्टर बेलखोडे साहेबांचे वैद्यकीय कार्याबरोबरच समाजिक आणि शैक्षणिक कार्य फार मोठे आहे. साने गुरूजी व्यवस्थापनाच्या माध्यमातून किनवट व बोधडी (बु.)येथे इंग्रजी माध्यमाची शाळा, ईस्लापूर (सहस्रकुंड) येथे साने गुरूजी कला वरिष्ठ महाविद्यालय याचे अद्ययावत असे शैक्षणिक दालन त्यांनी उभे केले. आज हे महाविद्यालय ग्रामीण भागात गोर गरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करीत आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरत भारत जोडो युवा अकादमीच्या वतिने तालुका विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र, किनवट येथे चालवितात. उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांकरीता पर्यावरण शिबीर, रानातील सहल, विविध प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन अशा अनेक शैक्षणिक बाबीचा आवर्जून उल्लेख मला करावासा वाटतो. त्याचबरोबर नाम फाऊंडेशन कडून रेल्व स्टेशन, बसस्थानक, बैल बाजार येथे केलेले वृक्षारोपण किनवट वासीयांना हिरवळीची दिशा देणारे आहे. सामाजिक सदभावनेने घोगरवीडी नावाच्या डोंगर वस्तीच्या गावात बनविलेला रस्ता त्या सर्व आदिवासी लोकांचा आनंद द्विगुणित करणारा आहे.


साने गुरूजी रूग्णालयाचा वर्धापनदिन सोहळा दरवर्षी साने गुरूजी यांच्या जयंतीदिना निमित्ताने दि.२४,२५,२६ डिसेंबरला अतिशय थाटामाटात साजरा होतो. अनेक कार्यक्रमाची भरीव अशी मेजवानी किनवट वासीयांना पहावयास मिळते. विद्यार्थ्यांकरीता विविध स्पर्धेचे आयोजन त्यात चित्रकला, रंगभरण, बाल आनंद महोत्सव, बाल कलाकारा करीता सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल, तसेच बालकांसाठी, चित्र पेंटिंग, हस्तकला उद्योग, मातीकाम, बांबूकला, रांगोळी स्पर्धा इत्यादी प्रकारचे कार्यक्रम बालक, वरिष्ठ महिला,पुरूष या सर्वाकरीता वेग वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
या तिन दिवस चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात व्याख्यान मालेचे आयोजन केले जाते. आजपर्यंत महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते साहेबांनी बोलावले आहेत. त्यामधे थोर समाज सेवीका मेधा पाटकर, आझादी बचाव आंदोलनाचे पुरस्कर्ते राजीव दिक्षित, प्रसिद्ध साहित्यिक बाबा आढाव, ख्यातनाम समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे, त्यांचे पुत्र विकासभाऊ आमटे, कुलगुरु नागनाथ कोत्तापल्ले, डाॅ.जगन्नाथ दिक्षित इत्यादी दिग्गज मान्यवर येऊन गेले आहेत. या तिन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा समारोप स्व. खासदार उत्तमरावजी राठोड साहेब यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत महोत्सवाने होते. ठुमरी, खयाल गायन, शास्त्रीय संगीत, बासरीवादन, पारंपारिक संगीत, भावगीत, गझल गीत अशा भरपूर मोठ्या संगीत रजनीने या भव्य दिव्य कार्यक्रमाची सांगता होते. स्व.राठोड साहेब म्हणजे एक रूषीतूल्य व संगीत प्रिय रसिक व्यक्तीमत्व होते. सहृदयी डाॅक्टर साहेबांची आणि राठोड साहेबांची मैत्री ही एकनिष्ठ होती. म्हणूनच डाॅक्टर साहेब दरवर्षी त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत महोत्सवाचे आयोजन करतात.


तिन दिवस रुग्णालयाचे वर्धापनदिन अटोपल्यानंतर पुनः डाॅक्टर साहेब आपल्या संकल्प सिध्दिकरीता तत्पर होतात. ते जे संकल्प करतात त्या सिध्दांतापर्यंत पोहोचतात किंबहुणा हा त्यांचा स्वभावगुण आहे. त्या शिवाय त्यांना ना आराम, ना चैन. रुग्णालयाचे विस्तारीकरण असो वा एखादा कक्ष सुधारायचे किंवा तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भेटी असो. हे सर्व कार्य ते अस्खलितपणे पार पाडतात. त्याच बरोबर समाजातील विविध आरोग्य विषयक समस्येला वाचा फोडणे, ती माहिती शासन स्तरापर्यंत पोहोचविणे, वर्तमानपत्रात बातमी लावणे ही कामे स्वतः जातीने पार पाडतात. त्याचे एक बोलके उदाहरण मला द्यावेसे वाटते. एकदा मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाच्या बैठकीत ते म्हणाले, ” पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यातील जनता आरोग्यात्मक सोई, सुविधेने पंचवीस वर्ष मागे आहे. असा आर्त टाहो त्यांनी फोडला .” मराठवाड्यातील जनतेच्या आरोग्या विषयीचे प्रश्न थेट मंत्रालयापर्यंत पोहोचविले. किती भक्कमपणे त्यांनी मराठवाड्याची बाजू मांडली हे वरील उदाहरणा वरून दिसून येते.
मागील वर्षी कोल्हापूर, सातारा, सांगली येथे महापुराने थैमान घातले होते. तिथल्या गाव, खेड्यात आपल्या फिरत्या दवाखान्याची गाडी पाठविली. आपले संपूर्ण फिरते वैद्यकीय पथक त्यांनी तेथे पूरग्रस्तांची सेवा ,सुश्रुषा करण्याकरिता रवाना केले. अम्बूलन्स सोबत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू, कपडे, चादरी, अन्य गृहोपयोगी साहित्य व नाम फाऊंडेशनच्या वतिने आर्थिक मदतही केली. त्या दुरितांप्रती कणवतेची सहृदयता त्यांनी दाखविली.
रुग्णालयात रात्री अपरात्री येणाऱ्या रुग्णांची सेवा त्यांनी भाऊ, बंधकीच्या नात्याने केली. मग तो रूग्ण विषारी साप चावलेला असो, विष प्राशन केलेला असो, हर्ट अटॅकचा असो किंवा एखादी बाळंतिण बाई अडलेली असो. तेवढ्या रात्रीला उठून विलाज करणे त्या रूग्णाचे समाधान करण्यातच स्वतःला धन्य मानतात. त्या शिवाय त्यांना चैन पडत नाही. एखादया बाईच्या पोटातून वाढलेल्या मांसाचा गोळा काढणे, बाळ अडवा आलेल्या असहाय्य मातेचे बाळंतपण करणे किवा अनेस्थेसिया नसतांना एखादी शस्त्रक्रिया करणे ही फार मोठी तारे वरची कसरत असते. अशा अनेक कठीण प्रसंगातून त्यांची वाटचाल मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलपर्यंत येऊन पोहोचलेली आहे.
साने गुरूजी रूग्णालयाने मानाचे स्थान मिळवत मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलकडे आपली वाटचाल केलेली आहे. ही मा.बेलखोडे साहेबांची फार मोठी फलश्रुती आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची देण आहे. याचे पूर्ण श्रेय त्यांना जाते. दि.१२ जानेवारी २०२० ला साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल एम.आय.डी.सी.परिसर कोठारी, ता.किनवट येथील कोनशिला समारंभ जागतिक ख्यातीचे समाज सेवक प्रकाशभाऊ आमटे व सौ.मंदाकिनीताई आमटे यांच्या करकमळाने पार पडले. त्याप्रसंगी डाॅक्टर साहेबांचा मोठा चाहता वर्ग, देशाच्या काना कोपर्‍यातून आलेले भारत जोडो युवा अकादमीतील मान्यवर, मित्र मंडळी बहुसंख्येने उपस्थित होती. या भव्य दिव्य देखण्या कार्यक्रमाचे साक्षीदार मला होता आले हे मी माझे भाग्य समजतो.
किनवट तालुक्यातील व परिसरातील रूग्णांना चांगली अद्ययावत सेवा मिळावी या करीता ते नेहमीच धडपडत असतात. मागील महिन्यात दि २४ ऑगस्ट २०२० ला रुग्णालयात डायलेसीसचे उद्घाटन केले. हे डायलेसीसचे स्वतंत्र युनिट त्यांनी रुग्णालयात कार्यान्वित केले. रुग्णांना चांगल्यात चांगली सेवा कशी देता येईल याकरीता ते नेहमीच कार्यतत्पर असतात. त्याच तोडीचे मार्गदर्शन ते प्रत्येक रुग्णांना करतात. स्त्री, पुरुष, अबाल, वृध असा फार मोठा चाहता वर्ग त्यांनी निर्माण केलेला आहे. असेच एक त्यांनी केलेले मार्गदर्शन मला आठवते.
ही गोष्ट नोव्हेंबर २००२ ची आहे. औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठात डाॅक्टर साहेबांची नी माझी भेट झाली. मी न्यायालयात का आलो हे त्यांना चांगले ठाऊक होते. मी साहेबांना नमस्कार केला. साहेबांनी माझी ख्याली खुशाली विचारली व म्हणाले,
” वसंत, माणूस हा कधी परिपूर्ण नसतो.त्याला पूर्णत्वाकडे जाण्यासाठी नाना प्रकारच्या यातना झेलाव्या व सोसाव्या लागतात, संघर्ष करावा लागतो. तेंव्हा कुठं माणूस आपल्या निश्चित ध्येयापर्यंत पोहोचतो. सदोदित धडपड करीत राहा यश मिळेल. “
अशा पध्दतीने त्यांनी मला यशाचा मूलमंत्र दिला. हे मार्गदर्शन माझ्या सदैव चिर स्मरणात राहील. त्यांच्या सहवासातल्या अनेक अशा सुश्राव्य आठवणी आहेत. त्यापैकी एक आठवण मला मुद्दामून सांगावीसी वाटते.
या वर्षी मी दि.१० मार्च २०२० ला होळीच्या धूलिवंदनाचे औचित्य साधून जागतिक महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमित्त गोरबंजारा महिला लेंगी नृत्याचे आयोजन केले होते. मा.साहेबांना मी प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलो. इतरही अनेक पाहुणे बोलावले होते. या सतत तिन चार तास चाललेल्या भरगच्च कार्यक्रमाचा त्यांनी मनमुराद आस्वाद घेतला. डपड्याच्या तालावर धमाल नृत्य करणार्‍या ग्रामीण महिलांवर स्तुती सुमने उधळली व ही अमुल्य कला जतन ठेवण्याचा प्रखर सल्ला त्यांनी दिला. येवढे ते या कार्यक्रमात तल्लीन व रममाण झाले.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे ते पट्टीचे व्यासंगी आहेत. आदिवासी लोकनृत्य, ढेमसा नृत्य, मथुरा नृत्य, बंजारा लोकनृत्य याचे आयोजन ते दरवर्षी करतात. एक वैद्यकीय शल्यचिकित्सक, सर्जनशील डाॅक्टर काय काय करू शकतो, याचे मर्मस्पर्शी उदाहरण म्हणजे डाॅक्टर साहेब होत. अशा पुष्कळशा बाबी साहेबांकडून शिकण्या सारखे आहेत. आदरणीय साहेबांविषयी, त्यांच्या जीवन कार्याविषयी जेवढे बोलू वा लिहू तेवढे कमी आहे.
आज वयाची ६० वर्ष पूर्ण झालेली असतांना तरूणांना लाजवेल अशी कामाची गती व चपलकवृत्ती त्यांच्या ठायी आहे. येवढे अविश्रांत कार्य करून मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटलचे संकल्प त्यांनी केले आहे. किनवट, माहूर तालुक्यातील रुग्णांची होणारी परवड वा हाल त्यांना देखवत नव्हते. किनवट पासून नांदेडचे अंतर दिडसे कि.मी. त्यात रुग्णांची होणारी दमछाक,लागणारी भयंकर फिस, होणारा अनाठायी खर्च हे त्यांना पहावत नव्हते. म्हणूनच त्यांनी या भव्य दिव्य हाॅस्पीटलचे स्वप्न पाहिले आहे. समाजातील लोक वाटा, लोक वर्गणीतून हे मोठे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे. या प्रसंगी समाजातील दानशूरांनी सढळ हाताने मदत करून त्यांच्या स्वप्नाचे साक्षीदार होणे आवश्यक आहे. आजही अतिशय कमी खर्चात, ना नफा ना तोटा, या तत्त्वावर रुग्णांचा विलाज ते करतात, नाममात्र अशी फिस घेतात. अशी नानाविध वैशिष्ट्ये घेऊन साने गुरूजी रूग्णालय ताठ मानेने उभे आहे. असे अनेक लौकिक रुग्णालयाने आजतागायत मिळविले आहेत. याचा संपूर्ण सन्मान, श्रेय आदरणीय डाॅक्टर साहेबांना जातो.
मा.सर, आपली कार्यसिद्धी दिवसेंदिवस उन्नत राहो, आपणाला दीर्घकालीन आयुरारोग्य लाभो, ही सदिच्छा व्यक्त करतो, आपल्या वाढ दिवसा निमित्त मनस्वी अभिष्टचिंतन करतो 🌹👏!
धन्यवाद!

शब्दांकन : डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट.
मो.नं. : 9420315409, 8411919665.
Mail ID:rathodvasant863@gmail.comSocial share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

Leave a Reply