सहस्र विद्यार्थी घडविणारा परीस: प्राध्यापक रामप्रसाद तौर सर साधी राहणी, उंची जेमतेम साधारणच, डोक्यावर कुरळे केसं , साधा सदरा नेहरू पाजामा घातलेला, खांद्यावर एक शबनम नेहमीच लटकलेली. आसपास विद्यार्थ्यांचा घोळका नेहमीचाच, असं एक जगावेगळच व्यक्तीमत्व मला बळीराम पाटील महाविद्यालयात दिसायचं. त्या अवलिया व्यक्तीमत्वाकडे पाहून मला फारच नवल वाटायचं. महाविद्यालयातील ईतर प्राध्यापक मंडळी टापटीप आणि झकपक असायची. या वेगळ्या व्यक्तीमत्वाच लौकिक परिचय जाणून घेण्या करीता मी माझ्या वरिष्ठ मित्रांना विचारायचो. ही गोष्ट १९८९~९०, या शैक्षणिक वर्षातली आहे. त्यावेळेस मी इयत्ता अकरावीला महाविद्यालयात शिकत होतो. नुकतेच दहावी पास होऊन आल्यामुळे महाविद्यालयात शिक्षण घ्यायचे म्हणजे फारच मोठे आकर्षण वाटायचे. नांदेड जिल्ह्यापासून दिडसे कि.मी. आंध्र, तेलंगणाच्या सिमेवरील एकमेव महाविद्यालय म्हणजे बळीराम पाटील महाविद्यालय होय. निसर्गरम्य वातावरणात ऐसपैस पसरलेल भलं मोठं महाविद्यालय हजारो विद्यार्थ्यांनी गजबजून जायचं. या संपूर्ण महाविद्यालयाचे संचालन करणारे प्राचार्य चंद्रकांत गर्जे सर वाघा सारखी डरकाळी फोडले की सर्व वातावरण आपोआपच शांत व्हायचं. प्राचार्य गर्जे सरांचा दराराच तेवढा होता. अतिशय शिस्तबद्ध महाविद्यालय संयमाने चालायचे. 
      मी कुतूहलाने सोबतच्या मित्रांना विचारायचो , हे गळ्यात शबनम लटकवलेले सर कोणते आहेत ? जेष्ठ मित्र श्याम मुडे म्हणायचा, " ते शबनमवाले सर रामप्रसाद तौर आहेत, आम्हाला मराठी शिकवितात. " 

“अण्णा, आम्हाला तर नाही शिकवत सर. “
“अरे वेड्या,ते सर डिग्रीवाल्यांना शिकवितात. “
आम्हाला अकरावी, बारावीला शिकविणारे शिक्षकवृंद वेगळे होते. ह्या कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयाच वातावरण नी तासिका समजून घेण्यातच कसं वर्ष निघून गेलं कळालेच नाही. गोकुंदा ते महाविद्यालय एक दिड कि.मी.चे अंतर होते. आम्ही मित्र किरायाने खोली करून राहायचो. एके दिवशी हातात दोन पुस्तकं व एक डायरी घेऊन मी महाविद्यालयात येत होतो. ज्या अवलिया व्यक्तीमत्वा विषयी मला कुतूहल वाटत होते,त्यांनीच मला पैदल येत असतांना पाहून गाडी थांबवीली व मला त्यांच्या स्कूटरवर बसण्यास सांगितले. मी लाजेनेच सरांच्या स्कूटीवर बसलो. त्या दोन मिनिटाच्या प्रवासात सरांनी माझं नाव, गाव, वर्ग सर्व विचारून घेतले. तेंव्हापासून ते आजतागायत गुरू शिष्याच नात अबाधित आहे.
सरांची आणि माझी खरी ओळख झाली ती महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीराच्या माध्यमातून मी बारावीलाच असतांना माझ्या बी.ए.तील वरिष्ठ मित्रांनी मला शिबीरात नेले. त्यावेळेस रासेयो चे शिबीर तालुक्यातील झळकवाडी या गावी झाले. सर्व शिबीरार्थींना एका मोठ्या ट्रकातूनच नेण्यात आले. त्या खेड्यात जाते वेळेस जलधाराचे मोठे चढीचे घाट लागले. नेमके त्या चढेवरच ट्रकाचा ब्रेक फेल झाला . ट्रक मागे मागे सरकू लागला. सर्व शिबिरार्थी आरडा ओरड करू लागले. जर ट्रक खाली दरीत गेला असता तर …. ऽऽऽ! ही कल्पनाच करवत नाही . मी, श्याम मुडे व अन्य मित्र क्षणाचाही विलंब न करता ट्रकाच्या खाली लगेच उड्या मारून त्याच्या चारही टायरला मोठाल्या दगडाची उटी लावली, अन्यथा …. ऽऽऽ!
जलधारा घाटातून झळकवाडी हे गाव अवघ्या काही अंतरावर होते. नंतर ड्रायव्हरने त्या ब्रेकची दुरूस्ती केली, घाटातून रिकामी गाडी वर आणली. आम्ही सर्व शिबिरार्थी सुखरूपपणे शिबिराच्या गावी पोहोचलो. त्या प्रसंगी सर सेनापती सारखे सर्व शिबिरार्थीना चांगली हिम्मत देत म्हणाले,
” कुणीही घाबरून न जाता आलेल्या संकटावर मात करायचे शिकले पाहिजे, आपण सर्व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले आहोत. या अशा खडतर अनुभवातूनच माणूस घडत नी वाढत असतो. “
सरांचे हे शब्द माझ्या मनःपटलावर कोरल्या गेले. बारावीचे वर्ष असल्या कारणाने मी दुसर्‍याच रात्री शिबिरातून किनवटकडे परतलो. कारण शिबीर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकरिता होते. मी सहजच म्हणून गेलो होतो. खऱ्याअर्थाने मी शिबिरार्थी झालो, बी.ए.प्रथम वर्षात गेल्यानंतरच. त्या वर्षी आमचे शिबीर झाले लखमापूर या गावी नंतर शेलू करंजी व चौथे बामनगुडा , गुरूवर्य प्रा. इंद्रसिंग राठोड सर यांच्या गावी. या तिनही वर्षाच्या शिबिरातून भरपूर काही शिकायला मिळाले. त्याचे वर्णन करतांना माझे शब्द तोकडे पडतील.
माझ्या नजरेत राष्ट्रीय सेवा योजनेला वाहून घेणारे एकमेव सिध्दहस्त म्हणजे तौर सरच होते. प्रा. आंबादास कांबळे सर हे सह समन्वयक होते. कांबळे सर फार साहित्य प्रिय व नाटककार म्हणून प्रसिद्ध होते. दोघेही मिळून आम्हा सर्व शिबिरार्थी सोबत दहा दिवस राहायचे. या शिबीराच्या उपरांत सरांनी मला जिल्हा व विभागीय पातळीवरील विशेष शिबीरा करीता नांदेड ,औरंगाबादला पाठविले. या सर्व शिबीरातून व सरांचा विद्यार्थी म्हणून त्यांच्या संपर्क सानिध्यातून भरपूर ज्ञानार्जन करता आले. त्यांच्या अनमोल मार्गदर्शनातून माझ्या जन्माचे सार्थक झाले.
सरांच्या मार्गदर्शनाखाली वेग वेगळे श्रमदान आम्ही केलो. त्या दहा दिवसाच्या काळात साक्षरता अभियान, ग्राम स्वच्छता अभियान, व्यसनमुक्ती अभियान, शाळा दुरूस्ती, ग्रामवासीयांचे मनोरंजन,शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन, रस्ता दुरुस्ती इत्यादी असे कार्य केले. शिबिरातून राष्ट्रीय एकात्मतेचे गीत, गाणे,भाषण, एकांकी, कलापथक, जागरण गीत गायीले. प्रत्येक वेळेस सरांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून अतिशय चोख आणि जबरदस्त अशी जबाबदारी त्यांनी पार पाडली.
शिबीरातील त्या दहा दिवसाच्या काळात जेवणा खाण्याची चंगळ असायची. सर,स्वतः लक्ष घालून किराणा सामान भरायचे. मला चांगले आठवते ,मी राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थीि प्रतिनिधी होतो. त्या दहा दिवसाच्या शिबिराकरीता पन्नास किलो शेंगदाणे,पन्नास किलो साखर, गुळाची ढेप, पन्नास किलो फल्ली तेल, यावरून इतर सामानाची कल्पनाच न केलेली बरी. आम्हा शिबीरार्थींना गुळ शेंगदाणे नास्त्या करीता तर कधी उसळ, उपमा ,दोन वेळेस चहा, दोन वेळेसचे भरपूर जेवण असायचे. या सर्व सामानाचे पैसे वा बिल महाविद्यालय दिली का नाही दिली का त्याच्यानी त्यांना काही फरक पडायचे नाही. स्वतःच्या खिशातूनच संपूर्ण मालाचे बिल ते चुकते करीत असत.
अध्यापनाच्या बाबतीतही लाजवाब अशी त्यांची शिकविण्याची हातोटी होती. सहजच ओघवत्या स्वरूपात कोणत्याही कथा, कादंबरीचे वर्णन करायचे. विद्यार्थ्यांना जरासेही उदासवाणे वाटायचे नाही. एखाद्या घटनेचे अतिशय मनोरंजक वर्णन करायचे, कधी मिश्किलपणे चुटकूला सांगायचे की, विद्यार्थी पोट धरू धरू हसायचे. मराठी वाङ्मयाचे निष्णात व गाढे अभ्यासक म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात त्यांची ख्याती होती. विद्यापीठातील विविध अभ्यास मंडळावर सक्रिय प्राध्यापक, अध्यक्ष, सदस्य म्हणून कार्यरत होते.
कमालीचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून केवळ महाविद्यालयातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यातील गाव, खेड्यात त्यांचे नाव होते. संत जनाबाई यांच्या एका अभंगात म्हटल्या प्रमाणे,” विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा ” या अभंगातील ओवी प्रमाणे सरांभोवती विद्यार्थ्यांचा घोळकाच राहत असे. प्रत्येकवेळी ग्रामीण विद्यार्थ्यांना चाकोरीच्या बाहेर जाऊन अनौपचारिक मार्गदर्शन करायचे. अडल्या नडल्या विद्यार्थ्यांना आर्थिक, सामाजिक मदत करायचे. त्यांच्या सहृदयी परीसस्पर्शाने हजारो विद्यार्थी महाविद्यालयात घडले. आजही महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील काना कोपर्‍यामध्ये सरांचे विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय अशी कामगिरी करीत आहेत. माझे जेष्ठ मित्र श्याम मुडे सरांविषयी एक वेळेस म्हणाले, “तौर सर जर माझ्या वाट्याला आले नसते, तर मी अतिरेकी झालो असतो. ” हे बोलके उदाहरण फार काही सांगून जाते.
मराठी साहित्य क्षेत्रात सरांचे नाव महाराष्ट्रात सर्व दुर पर्यंत आहे. सांगली जिल्ह्य़ातील वाळवा तालुक्यात सन १९८८ व १९९६ या दोन्ही दलित – आदिवासी – ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलनाचे ते कार्यवाह होते. त्यावेळेस कविवर्य नारायण सुर्वे व जेष्ठ साहित्यिक बाबुराव बागूल हे अध्यक्ष होते. गिरीश कर्नाड, सुहासिनी मुळे या संमेलनाचे उद्घाटक तर क्रांतीवीर नागनाथ नायकवडी हे आयोजक होते. हे दोन्ही संमेलन सरांनी आपल्या प्रांजळ कार्य कौशल्यांनी गाजविले.
तौर सर हे सत्यशोधक साहित्य चळवळीचे खरे अनुयायी होत. सत्यशोधक साहित्य चळवळीला वाहून घेणारे खरे उपासक म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज साहित्यिक,प्रा.एस.एस.भोसले, माजी कुलगुरू नागनाथ कोत्तापल्ले, आ.ह. साळुंखे, दत्ता भगत, रा.र.बोराडे, शरद पाटील, कौतिकराव ठाले पाटील, फ.मु.शिंदे. प्रल्हाद लुलेकर, केशव देशमुख इत्यादी मान्यवर, ही यादी फार मोठी आहे. या सर्व सारस्वतांशी त्यांचा घरोबा होता.
किनवट मध्ये १९९२~९९ च्या दशकात” दैनिक क्रांती ” नावाचे एक वर्तमान पत्र त्याकाळी चालत होते. त्या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले. कित्येक वर्ष ही जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडली. कित्येक वर्तमान पत्रात त्यांनी लेख लिहिले. अनेक वैचारिक ग्रंथांचे संपादन केले. अनेक कथा, कादंबर्‍याचे समीक्षण त्यांनी केले. अशी त्यांची साहित्यात्मक गाथा फार व्यापक आहे.
समाजामध्ये शैक्षणिक, सामाजिक व एक कुटुंब वत्सल प्राध्यापक म्हणून त्यांचे नाव सर्वांच्याच तोंडी आहे. विद्यार्थ्यांना घरी नेऊन जेऊ घालणे, विविध प्रकारची पुस्तके, ग्रंथ वाचावयास देणे, वाचन व साहित्य प्रिय विद्यार्थी घडविणे या सर्व बाबतीत त्यांचा फार मोठा हातखंडा आहे. मला त्यांनी कित्येक वेळेस घरी नेले . सरांचे घर म्हणजे चळवळीचे मुख्य केंद्रच होते. सरांचे घर म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना आपले घर वाटायचे. अनेक प्रकारच्या समस्या घेऊन त्यांच्याकडे जायचो. त्या सहज म्हणून सुटायच्या. कित्येक वेळेस तर सर स्वतः होऊन आम्हा विद्यार्थ्यांच्या भेटीकरीता प्रत्यक्ष रूमवर यायचे, सर्वांची ख्याली, खुशाली विचारायचे. एक प्रसंग मला आजही आठवतो, मी अंतिम वर्षांत वसतीगृहात असतांना तापेने फणफणलो होतो. ही वार्ता सरांच्या कानी पडली. सर जाती निशी मला भेटावयास वसतीगृहात आले. किती हा मनाचा मोठेपणा म्हणावा. आज अशी विशाल ममत्वाची प्राध्यापक मंडळी बोटावर मोजण्या इतकी असतील किंबहुणा सापडणारही नाहीत.
सरांच्या अर्धांगिनी लता पाटील मॅडम सुमतीबाई हेमसिंग नाईक ह्या किनवट मधील नामवंत शाळेत मुख्याध्यापिका होत्या. एक शिस्तप्रिय मुख्याध्यापिका म्हणून शाळेत त्यांचा दबदबा होता. तेवढाच प्रेमळ स्वभाव मॅडमचा होता. मला एक वेळेस महत्वाचे काम पडले. माझी धाकटी बहीण मॅडमच्या शाळेत इयत्ता सातवीला शिकत होती. आठवीला तिचे नंबर शासकीय मुलींच्या वसतीगृहात लावायचे होते. त्या करीता जरा ओघवते मार्क्स तिला हवे होते परंतु ही बाब मला मॅडमला सांगण्याची हिम्मत झाली नाही. मला ना विलाजाने सरांच्या कानावर घालावे लागले. यावरून त्यांच्या शिस्तबद्ध शालेय प्रशासनाची पावती मिळते.
सरांविषयीची एक गोष्ट मला आयुष्यभर आठवणीत राहील, ती म्हणजे मी महाविद्यालयातून पदवी झाल्यानंतर पुढील शिक्षणा करीता मला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पाठविल्याची. माझी परिस्थिती अतिशय हालाकीची, शासकीय वसतीगृहात राहून कशी बशी पदवी पूर्ण करू शकलो. परंतू पुढील शिक्षणा करीता आर्थिक बळ माझ्याकडे नव्हते व औरंगाबादला जाण्याकरीता तिकीटाचीही सोय नव्हती. त्यावेळेस जून १९९५ ला मला पाचशे रूपये देऊन पाठविले. त्याच बरोबर कै.मीनाक्षी मॅडम व प्रा.धरणे मॅडम यांनी सुध्दा आर्थिक मदत केली. ही केलेली मदत माझ्या चिर अविस्मरणीय राहील (माझ्या संभाव्य आत्मकथनात मी या विषयी विस्तृत लिहिले आहे). या स्वरूपात सरांनी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी घडविलेत.
आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सर २०१७ साली सेवानिवृत्त झाले. मुख्याध्यापिका सौ. लता पाटील तौर मॅडम पण सेवानिवृत्त झालेल्या होत्या. या महान दाम्पत्य ज्ञानसागराच्या सेवागौरवा निमित्त सरांच्या असंख्य विद्यार्थी, मित्र, मान्यवर सर्वांनी मिळून मोठा गौरव सोहळा आयोजित करून त्यांच्या सेवाकार्याचा गौरव केला. येवढे सोज्ज्वळ दाम्पत्य, नेहमी प्रसन्न असणारे कदाचित नियतीलाच मान्य नसावे. म्हणतात ना,” जो आवडे सर्वाला, तोची आवडे देवाला. ” या उक्ती प्रमाणेच सौ.मॅडम आपल्या आजारपणातच देवप्रिय झाल्या व निजधामास गेल्या. फूलाप्रमाणे सजविलेल घर ,मुलं राहूल आणि चेतन आपली पुष्पकळी दरवळण्याच्या उंबरठ्यावर पोरके झाले. या प्रचंड आघाताने सरांना अर्धांगीनी वियोगाने दुःखाच्या अग्नीकुंडात लोटले.
परवा पार पडलेल्या ०५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त हाडाचे ज्ञानपिपासू शिक्षक, एक उत्कृष्ट असे ख्यातकीर्त मराठी वाङ्मयाचे समीक्षक माझे गुरूवर्य आदरणीय रामप्रसाद तौर सरांची आठवण आली. मी नम्रपूर्वक माझा हा छोटेखानी लेख त्यांच्या निस्पृह सेवाकार्यास समर्पित करतो. सरांना उदंड आयुष्य लाभो अशी विधात्या चरणी प्रार्थना करतो.
धन्यवाद 🌹👏!


शब्दांकन : डाॅ.वसंत भा.राठोड, मांडवी किनवट.
मो. नं. : 9420315409, 8411919665.
Mail ID:rathodvasant863@gmail.com


Social share
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.