काळवीटाची शिकार करणारे तीन शिकारी वनविभागाच्या जाळ्यात

हिमायतनगर| तालुक्यातील मौजे वडगाव शिवारातुन काळवीट हरणाची शिकार करून दुचाकीवरून जाणाऱ्या तिघा जणांना दि.०९ च्या मध्यरात्रीला वडगाव येथे रात्रपाळीचा गस्तीवर असलेल्या युवकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. हि माहिती वनविभागाला मिळताच उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. संध्याताई डोके व त्यांच्या टीमने दि.१० रोजी मध्यरात्रीला घटनास्थळी पोचून हरणाचे दोन मुंडके, मास व तीन आरोपीना दुचाकीसह ताब्यात घेऊन पंचनामा केला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यात असलेल्या वडगाव तांडा परिसरात हरीणपाठ आहे. या भागात हरणांची मोठे कळप फिरतांना अनेकांनी पहिले आहे. या रस्त्याने जाताना अनेकदा हररी, काळवीट वाहनाच्या धडकेत मृत झालेले आहेत. याचा भागात गुरुवारच्या मध्यरात्रीला किनवट तालुक्यातील मौजे रिठा तांडा येथील आऱोपी १) दादाराव राणू राठोड, २) बळीराम सुभाष राठोड, ३) भीमराव बळीराम आडे, युवकांनी दुचाकी क्रमांक TS01 -EC3207 वरून येऊन दोन काळवीटाची शिकार केली. आणि एका खताच्या पोत्यामध्ये मास आणि हरणाचे मुंडके घेऊन वडगाव मार्गे तेलंगणाकडे जाण्याच्या बेतात होते. हा प्रकार गेल्या महिन्यापासून चोरट्याने पकडण्यासाठी रात्रगस्तीवर असलेल्या सतीश मोहिते, बंडू ताडकुले,  भगवान भालेराव, विठ्ठल खुणे, सुरेश ताडकुले, दिलीप मोकले, योगेश मोकले, पप्पू थोरात, सचिन बीरकुरे, योगेश ताडकुले वडगाव ज. येथील युवकांना संशय आल्याने दुचाकीला अडवून विचारपूस केली. यावेळी त्यांच्याजवळील पोत्याची झडती घेतली असता. वन्य प्राणी असलेल्या काळवीटाची शिकार करून पलायन करत असल्याचे लक्षात आले. यावरून युवकांनी दत्तात्रेय हंगरगे (सरपंच युवतीचे वडील), बालाजी ताडकुले (पोलीस पाटील) यांच्या माध्यमातून पकडलेल्या आरोपीना हिमायतनगर पोलिसांना पाचारण करून तिन्ही शिकाऱ्याना पोलिसांच्या स्वाधीन केले. तात्काळ पोलिसांनी हि घटना वनपरिक्षेत्र अधिकारी संध्याताई डोके यांना दिली. त्यांनी गघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने उपवनसंरक्षक आर.ए. सातेलीकर, सहाय्यक वनसंरक्षक डी.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्रीला घटनास्थळ गाठले. 
 
आणि सकाळपासून काळवीटाची शिकार करणार्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तात्काळ पशुवैधकीय अधिकारी सोनटक्के आणि वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला. तसेच आरोपींची कसून चौकशी केली असता शिकार केल्याचे त्यांनी कबुल केल्यानंतर आज रात्रभर हिमायतनगर पोलिसांच्या कस्टडीत ठेवले आहे. आरोपींवर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये कार्यवाही करण्यात आली आहे. शुक्रवारी न्यायालयात हजरत केले जाणार असून, हरणाची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी आरोपीना चौकशीसाठी पोलीस कस्टडी मागणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संध्याताई डोके यांनी सांगितले. यामुळे आता वन्यजीवांची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मोरक्याला गजाआड करण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणारं आहेत. यानंतर वनविभाग कश्या पद्धतीने हे प्रकरण हाताळून आजवर झालेल्या घटनांची उकल करेल याकडे जिल्ह्यातील वन्यजीव प्रेमी नागरिकांचे लक्ष लागून आहे. 

या कारवाईत हिमायतनगर वनपरिमंडळाचे वनपाल व्ही एस.गोरलावाड, वनरक्षक गीते, घोगरे, खालसे, केंद्रे, सोने, पोतदार, खंडागळे. व्होनशेट्टे, अमृतवार, वनमजूर शेख अहेमद, व इतर वनकर्मचारी, सरपंच शिवानी दत्तात्रेय हंगरगे यांनी वनविभागाला सहकार्य केले. आजच्या या कार्यवाहीने हिमायतनगरसह नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.      
       

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.