kinwat today news

आज हुतात्मा जयवंतराव पाटील वायपणेकर यांचा स्मृतिदिन…….

हदगाव: हदगाव तालुका तसा क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो. पुरुषार्थाने भारलेला अन पराक्रमाने उजळून निघालेला हा परिसर.याच तालुक्यातील वायफना या गावी अन्यायाविरुद्ध नेहमीच चवताळून उठणाऱ्या घराण्यात विक्रमसिंह आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी जयंतरावांचा जन्म झाला.त्यामुळे अन्यायाविरुद्ध लढण्याचं बाळकडू घरुनच मिळालेलं.धाडसी, स्वाभिमानी आणि प्रचंड वाणीतेज असलेल्या जयवंतराव पाटलांचा ‘संघर्ष ‘हा स्थायीभाव होता.हैद्राबाद संस्थानातील जनता निजामशाही च्या धर्मांध व जुलमी जात्यात भरडून निघत होती.अन्याय व अत्याचाराने परिसीमा गाठली होती.निजामी राजवट उखडून टाकण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याकांक्षेने इर्षेला पेटलेल्या जिगरबाज तरुणांनी हैद्राबाद मुक्ती आंदोलनाचे रणशिंग फुंकले. त्याची परिणिती काही ठिकाणी सत्याग्रहात तर काही ठिकाणी सशस्त्र लढ्यात झाली.वैयक्तिक जीवनापेक्षा देशहित महत्वाचे मानणाऱ्या जयवंतराव पाटील वायपणेकर यांनी या मंतरलेल्या काळात हैद्राबाद मुक्ती आंदोलनात उडी घेतली. घर-दार सोडून ,जीव मुठीत धरून रानोमाळ पळणाऱ्या लोकांना जयवंतराव पाटलांनी आधार दिला, हिम्मत दिली. परिसरातील जिगरबाज तरुनांचं संघटन करून निजामशाही ला सातत्त्याने हादरे दिले.याच आंदोलनातील ‘इस्लापूर ऍकशन’मध्ये इस्लापुर पोलीस ठाण्यावर 60 ते 70 जणांच्या तुकडीने सशस्त्र हल्ला चढवताना मातीच्या मुक्तीसाठी सरसावलेल्या जयवंतराव पाटलांच्या सैनिकी रक्तानं मातृभूमीचा अभिषेक केला.3 जुलै 1948 रोजी ‘ इस्लापूर एक्शन’ मध्ये जयवंतराव पाटलांनी वीरमरण पत्करले.मातृभूमीच्या मांडीवर देह ठेवून आपल्या मातेची कूस पावन केली.
मातृभूमीच्या मुक्तीसाठी ‘इस्लापुर ऍकशन ‘मध्ये आपल्या प्राणाची आहूती देणाऱ्या वीर हुतात्मा जयवंतराव पाटील वायपणेकर यांच्या पवित्र, पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!
“नाही आम्ही खांदा दिला,शेवटच्या पालखीला।
नाही शास्त्रोक्त मंत्रांनी दानधर्म केला।
नाही वाहिला गुलाल नाही घातले पांढरे
नाही अर्पियले तुम्हा सुगंधित हार तुरे।
स्वराज्याचा सेनापती, शिष्य आम्ही जातिवंत।
प्राणपणे लढा देऊ ,होऊ स्मारके जिवंत।”
पुनश्च एकदा वीर हुतात्मा जयवंतराव पाटील यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम!
–सूर्यप्रकाश जाधव

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

4 thoughts on “आज हुतात्मा जयवंतराव पाटील वायपणेकर यांचा स्मृतिदिन…….

Leave a Reply