kinwat today news

वृक्षारोपणाच्या नवीन तंत्राचा वापर करून ‘अटल आनंदवन घनवन प्रकल्प’ मियावाकी मिशन यशस्वी करावे, -सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल


किनवट ( तालुका प्रतिनिधी ) : प्रदूषणावर मात करून आरोग्यदायी वातावरण व पर्यावरण निर्मिती करण्यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संगोपन कार्यक्रम निरंतर सुरु ठेवावा लागतो. मोकळ्या जागांची कमतरता पाहता अन्य पर्याय वापरून 33 टक्केपर्यंत वृक्षाच्छादन नेण्यासाठी वृक्षारोपण करणे अत्यंत गरजेचे आहे. स्थानिक परिस्थिती, हवामान, पावसाचे प्रमाण व पाण्याची उपलब्धता इत्यादी बाबी लक्षात घेऊन त्यास अनुसरून ‘अटल आनंदवन घनवन प्रकल्प’ कार्यान्वित करण्यात आलेला आहे. तेव्हा सर्वांनी प्रयोगशीलतेतून नवनवीन तंत्राचा वापर करून मियावाकी मिशन यशस्वी करावे, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले.
वसंतराव नाईक हरीत महाराष्ट्र अभियान 2020 अंतर्गत 50 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात ‘आनंदवन घनवन योजना मियावाकी मिशन 2100’ किनवट उप विभागात राबविण्याची माहिती देणे व प्रात्यक्षिक दाखविणे याकरिता बुधवारी ( दि. एक ) सकाळी 11 वाजता उप विभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसिलदार उत्तम कागणे ( किनवट ) व सिध्देश्वर वरणगावकर ( माहूर ), गट विकास अधिकारी सुभाष धनवे, उप विभागीय पोलिस अधिकारी विलास जाधव (माहूर ), तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे, तालुका कृषी अधिकारी संजय गायकवाड, गट शिक्षणाधिकारी सुभाष पवने, मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, पोलीस निरीक्षक मारोती थोरात आदींसह किनवट व माहूर तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना मा.गोयल म्हणाले की, आपल्या सजीवसृष्टीचा ढासळलेला तोल सांभाळायचा असेल तर आपण शंभर टक्के स्थानिक प्रजातींच्या झाडांचा वापर करून नैसर्गिक व दाट वने निर्माण केली पाहिजेत. ज्या कार्यालयात मोकळी जागा नसेल त्यांनी इतरत्र ठिकाणी उपलब्ध जागेवर ही योजना राबवून यशस्वीकरावी.
वनपरिक्षेत्राधिकारी के.एन.खंदारे यांनी मागील एक महिन्यापासून कार्यालय परिसरातील मोकळी जमीन नांगरून, खोदून त्यात जैवभार टाकून दहा बाय तीस चौरस मीटर घन लागवडीची आखणी केलेल्या ठिकाणी मियावाकी पध्दतीने स्थानिक प्रजातीची झाडे लावण्याचं प्रात्यक्षिक वनपरिक्षेत्राधिकारी एस. यू. जाधव यांनी दाखविलं. सेवानिवृत्तीनिमित्त पांडे यांचेसह सर्व कार्यालय प्रमुखांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नायब तहसिलदार मोहम्मद रफीक, अशोक कांबळे, उत्तम कानिंदे, बाबूराव इब्बीतदार, सर्व वनपरिक्षेत्राधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply