kinwat today news

चळवळीतील धडपड्या कार्यकर्ता ते लोकसेवक : अभियंता भरतकुमार कानिंदे

किनवट: विद्यार्थीदशेपासूनच चळवळीत ओढल्या गेलेले, सदैव समाजहित जपत सार्वजनिक बांधकाम विभागात लोकसेवक म्हणून यशस्वी कारकिर्द पूर्ण करून सेवानिवृत्त होणारे अभियंता भरतकुमार कानिंदे यांच्या कार्याचा महेंद्र नरवाडे यांनी मांडलेला लेखाजोखा देत आहोत.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुका मुख्यालयापासून आठ किमी अंतरावरील एकंबा गावी प्राथमिक शिक्षण घेतले. गावीच कसे बसे सातवी उत्तीर्ण होऊन नांदेडला जून 1977 ला पीपल्स हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला. वसतीगृहात राहतांना सोयीसुविधेसाठी सतत झगडत राहायचे. अनेकदा प्रशासनाशी भांडायचे. एकदा तर हनमंते नावाच्या वॉर्डनने चांगलच चोपलं होतं. तावडीतून सुटून, निर्भीडपणे दूर जाऊन त्यांच्यावर दगड फेकला. हा कोडगेपणाच त्यांच्या नेतृत्वाची नांदी ठरली. परंतु वसतीगृहातून काढलं. हे घरी त्यांनी सांगितलच नाही.
त्यांचे काका शेषराव कानिंदे यांनी त्यांचे मित्र फायरमन दत्ता कावळे हे एकटेच राहत असलेल्या शासकीय निवासस्थानी या विद्यार्थ्याला आसरा दिला. ते ठिकाण चळवळीचं केंद्रच होत. तेव्हा किनवटची पँथर्स चळवळ जबरदस्त प्रभावी होती. त्यामध्ये सुरेशदादा गायकवाड, दादाराव कायापाक, मनोहर भगत असे अनेक ज्ञात अज्ञात समर्पित कार्यकर्ते होते. नांदेडचे एस.एम.प्रधान, सोपान गायकवाड आदी कावळे मुळचे किनवटचे असल्यामुळे त्यांच्याकडे अनेक वेळा मुक्कामी असायचे. या काळात चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांचा जवळून संपर्क आला. लहान असल्यामुळे त्यांना सगळी कामं सांगितली जायची. याचा कोवळ्या मनावर परिणाम झाला. आपण देखील काही तरी केलं पाहीजे.
दहावीला असताना घिसाडी समाजाच्या वसतिगृहात त्यांनी प्रवेश घेतला, कारण जुन्या वसतिगृहात प्रवेश देत नव्हते. त्याला कारणही तसच होत. त्या वसतिगृहातील वाढपी म्हातारा वरणाची तर्री मागितल्यावर पळी मारायचा. त्यांच्या मित्रांनी त्याला अद्दल घडवायची ठरवल. एकदा तर्री मागितल्या मुळे तो मारायच्या बेतात असतांना, त्यांनी पळी धरली. तेवढ्यात वसंत दामोदर, अशोक खेबाले, वसंत पाईकराव आणि इतर मंडळी जमा होऊन जाब विचारू लागले. बिचारा गरीब म्हातारा एकदम नरमला, आणि नंतर कधी तोंड वर काढले नाही. त्यांनी एक शिष्टमंडळ घेऊन समाजकल्याण कार्यालय गाठले, निरीक्षकांना वसतिगृहात घेऊन आले. अशा अनेक प्रसंगांतून विद्यार्थीदशेतच बंड करण्याची शक्ती भेटत गेली.
त्यांचं गणित कच्च होतं म्हणून दहावीला पंडीत सरांकडे क्लास लावला. ते वातावरण निर्मिती करून अत्यंत सोप्या भाषेत शिकवत. गणित खुप चांगलं कळायला लागलं. परंतु एके दिवशी वर्गात खोड्या करतांना पकडल्या गेल्याने काढून टाकण्यात आलं. परंतु तेवढ्याच शिदोरीवर ते अभियंता झाले एवढं मात्र नक्की. दहावीला ते गणितात पास मात्र इंग्रजीत नापास झाले होते. नंतर मुंबईला पळून गेले. तिथे काका गोविंदराव कानिंदे यांचेकडे गेले. त्यांनी मुंबई फिरवून दाखवली. एकदा माधवराव जिंदे हे नातेवाईक त्यांना आय.आय.टी.पवई दाखवायला घेऊन गेले. तेथील तलाव, सभागृह, तंत्रज्ञान लॅब, सुखसोईयुक्त वसतीगृह हे सगळं पाहून ते भारावून गेले. तिथून प्रेरणा घेऊन काकांचा निरोप घेतला. परत येऊन तेव्हा सप्लीमेंट्रीचा फॉर्म भरून ते चांगल्या प्रकारे इंग्रजीत पास झाले.
अकरावीला भीमराव कांबळे हा मित्र त्यांना लाभला. त्यांनीच लसावी, मसावी, दशाऊंशाचा गुणाकार व भागाकार या गोष्टी शिकविल्या. त्यांच्या नादाने ते अभ्यासाला लागले.
बारावीला एक वर्ष ड्रॉप घेऊन पुन्हा मुंबई गाठली. काकांनी स्वतःच्या पैशाने ट्युशन आणि आभ्यासिका लावून दिली. त्यांच्या छाया काकू स्वतःच्या मुलांचा पसारा सांभाळत त्यांची व्यवस्था करायची वरून खर्चाला पैसेही देई. काकांनी अनेकदा दिवसभर कमावलेले पैसे संध्याकाळी हातावर ठेवले, प्रसंगी हातऊसणे घेऊनही दिले. ईच्छा एकच आपला पुतण्या मोठ्या पदावर गेला पाहिजे.
नंतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, औरंगाबाद येथे प्रवेश मिळविला. तिथे असताना संत तुकाराम शासकीय वसतिगृहात राहायचे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टलर्स असोसिएशनच्या माध्यमातून वसतीगृहाचे खासगीकरण,मेस पद्धत चालू करणे, बी.एड. आंदोलन, दलित ऐक्य चळवळ या व अशा अनेक विद्यार्थी आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला.
सन 1996 साली सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता श्रेणी 2 या पदावर ते रुजू झाले. अभि. यशवंतराव येरेकार आणि अभि.जी.एम.कांधारे यांचे मार्गदर्शन आणि पाठबळ त्यांना मिळाले. परंतु ही नेमणूक केवळ 4 महिन्यासाठी होती. त्यातच लोकसेवा आयोगाच्या उमेदवारांनी नेमणुकीच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती. कधी नोकरीवरून काढून टाकण्यात येईल याचा भरवसा नव्हता. परंतु अभि. चांदासुरले यांच्या नेतृत्वात संघर्ष करून, लेकासेवा आयोगाची तोंडी परीक्षा देऊन नोकरीत कायम होण्यासाठी 2010 साल उगवावे लागले.
शालेय जीवनात वडिलांनी घेतलेल्या झाडांची आंबे डोक्यावर,काही दिवस रेल्वेत जिथे विकली त्याच भोकर मध्ये 1996 ला ते रूजू झाले. नोकरीत रुजू होण्यापूर्वीचा 1992 पासूनाचा प्रवास फार खडतर गेला.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोकरीमुळे सर्वच सुखसोयी आपोआप उपलब्ध व्हायच्या. परंतु त्यांच्यातला कार्यकर्त्याचा पींड बाजूला पडला नाही. अनेक उपेक्षितांना त्यांनी मदत केली. दरम्यान आय.ए.एस. आधिकरी रमेश थेटे यांनी गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर चित्रपट काढायचा मानस व्यक्त केला होता. निधी उभारण्यासाठी, शिल्पकार नावाचा ऑर्केस्ट्रा नामवंत कलावंतांना घेऊन उभा केला होता. याकामी त्यांनी महाराष्ट्रभर फिरून त्याच्या प्रचार प्रसाराचे आणि नियोजनाचे कार्य केले. परंतु खर्च जास्त आणि तिकिटांचा खप कमी यात ते सगळं विस्कळीत झालं.
सन 2005 साली लक्ष्मण माने यांनी बौद्ध धम्म दीक्षेची चळवळ चालवली होती. त्या अनुषंगाने हिंगोली येथील बानाई व इतर सामाजिक संघटना यांनी धम्मचक्र परिवर्तनाचा मोठा मेळावा रामलीला मैदान येथे घेतला. अध्यक्षस्थान भूषवण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्या दरम्यान अनेक समाज घटकांसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली.
2012 सालापासून “लॉर्ड बुद्धा” चॅनल निर्मितीसाठी महत्वपूर्ण योगदान दिलं. परभणी येथे रुजू झाल्यानंतर “बानाई” अत्यंत क्रियाशील केली.
नोकरी करतांना, अनेक प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क आला.असाच एक प्रसंग आला. प्रा. जोगेंद्र कवाडे सर नांदेडला आले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांची व्यवस्था सा.बा.विभागाच्या विश्रामगृहात केली होती. परंतु त्यांच्या आरक्षित कक्षात पुरेशा सुविधा नव्हत्या. त्यांचे कार्यकर्ते डी.डी.वाघमारे यांचा तेथील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. ही गोष्ट त्यांना कळल्यावर त्यांनी सरांना व्ही.आय.पी. कक्षात नेले. तेथील कर्मचाऱ्याने हा मंत्र्यांचा कक्ष आहे, तो उघडण्यासाठी वरिष्ठांची परवानगी लागेल असे सांगितले होते. “अरे हा माणूस दहा मंत्र्यांच्या बरोबरीचा आहे, ” असे म्हणून त्यांनी कक्ष उघडून दिला. तेव्हा पासून कवाडे सरांचा त्यांच्यावर विशेष लोभ. त्यांच्या घरी प्रत्येक कार्याला सर आवर्जून उपस्थित राहतात.
आपल्या तांत्रिक ज्ञानाचा उपयोग लोकोपयोगी कामासाठी त्यांनी केला. प्रामाणिक काम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कार्यालयीन, सामाजिक, धार्मिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात त्यांनी लोकसेवक म्हणूून यशस्वी कार्य केले. त्यांच्या अर्धागिंनी सुनिता यांची त्यांना मोलाची साथ मिळाली. त्यांच्या भावी जीवनाला मनःपूर्वक शुभेच्छा !
– महेंद्र नरवाडे,
गोकुंदा ( किनवट )

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply