kinwat today news

जिल्ह्यात रुग्णांची संख्या 23 ने वाढली ; सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सतत हात धुणे अत्यावश्यक

नांदेड दि. 3 :- कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज तब्बल 23 रुग्ण संख्येची वाढ झाली असून नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात नांदेड येथील देगलूर नाका व शिवाजीनगर परिसरातील 21 व्यक्ती, देगलूर तालुक्यातील आमदापूर व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या 23 रुग्णांपैकी 20 वर्षाखालील 12 व्यक्ती तर उरलेले 11 व्यक्ती हे 35 वर्षाच्या आतील आहेत. जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 175 वर पोहचली आहे. यापैकी बरे झालेली रुग्ण संख्या 124 आहे.  
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात बुधवार 3 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 238 अहवालापैकी 193 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 23 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 175 झाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व पंजाब भवन यात्री निवास येथील 2 रुग्ण असे एकुण 3 रुग्ण आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 43 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 व 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.
आतापर्यंत एकूण 175 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 124 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 43 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 30 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 3 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय देगलूर आणि मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 41 हजार 434, घेतलेले स्वॅब 4 हजार 264, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 739, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 23, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 175, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 164, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 51, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 124, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 43, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 130 एवढी आहे.

दिनांक 2 जून रोजी प्रलंबित असलेल्या 267 स्वॅब तपासणी अहवालापैकी 238 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 19 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 3 जून रोजी 111 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply