kinwat today news

वनातील झाडांची वारेमाप तुटीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाला निर्माण होतोय धोका

किनवट ( प्रतिनीधी ) किनवट वनविभागाचे प्रभारी सहाय्यक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या भ्रष्ट व नाकर्तेपणामुळे पट्ट्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वनातील सागी झाडांची कत्तल होत असल्याने किनवट च्या जंगलाचे माळरानात झपाट्याने रूपांतर होत असल्याने वन्यप्रेमी नागरिकात मोठा रोष असून किनवट माहूर तालुक्यातील सहा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून पट्टा तोड परवानगी च्या नावाने चालू असलेला फार्स बंद करून पट्टा तोड परवानगी कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सातपुड्याच्या विस्तीर्ण पर्वतरांगांमध्ये वसलेला किनवट तालुक्याला वन देवतेचे विशेष आशीर्वाद प्राप्त आहे. तालुक्‍यात मोठा भूभाग, पर्वतरांगा, वनराई व वन्यजीवांनी नटलेला आहे. तालुक्यातील जंगलामध्ये बहुमूल्य वनौषधी मोठ्या प्रमाणावर वन्यजीव तसेच लाकडी सोने म्हणून ओळखल्या जाणारे इमारती उपयोगाकरिता वापरण्यात येणारे बहुमूल्य सागवान जातीचे लाकूड मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
परंतु गत काही वर्षात किनवट च्या हिरव्यागार वनराई ला काही लाकूड तस्कर व वनविभागातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची नजर लागली आहे. वनांची वारेमाप कत्तल होत असूनही म्हणावी तशी कोणतीही कार्यवाही तर सोडाच उलट केलेले पाप लपवून घेण्याकरिता वनविभाग व तस्करांच्या अर्थपूर्ण हितसंबंधातून पट्टे परवानगीच्या नावाने मोठ्या प्रमाणावर तुटलेल्या झाडांच्या लाकडांचा पास बनवून इतरत्र विकण्याचा गोरख धंदा सध्या किनवट मध्ये युद्धपातळीवर सुरु आहे वनविभागाचे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी यांच्याशी अर्थपूर्ण हितसंबंधातून पट्टा पासच्या नावाने मोठ्या प्रमाणावर जंगलातील लाकडे विकल्या जात आहेत.

वास्तविक पाहता किनवट, माहूर तालुक्यात शेतजमिनीवर मुख्य पीक म्हणून कापूस सोयाबीन इत्यादी मोसमी पिकांची नोंद महसूल विभागाकडे आहे. तालुक्यातील एकूण मालकी सातबारा पैकी कोणत्याही सातबाऱ्यावर सागवान झाडांची नोंद नसताना मात्र त्या जमिनीवर पट्टातोड परवानगी निर्गमित होत आहे. हे मात्र श्‍चर्यच म्हणावे लागेल सातबार्यावर झाडांची नोंद नसताना शेकडो घनमीटर सागवान लाकूड मात्र दररोज तोड होत असल्याचा प्रकार म्हणजे आडातच नसताना पोहरा कसा भरला हे न उलगडणारे कोडेच म्हणावे लागेल हे यावरून स्पष्ट होत आहे. तर येथील वनविभागाला आपल्या वनसंपत्तीची कसलीही काळजी नाही उलट तस्करांशी हातमिळवणी करून हा अवैध धंदा जोमात सुरू आहे.
परंतु वनातील झाडांची वारेमाप तुटीमुळे वन्यजीवांच्या अस्तित्वाला ही धोका निर्माण झाला आहे. त्यांचा नैसर्गिक निवारा हिरावला जात असल्याने वन्यजीव मानवी वस्तीकडे येत असल्याने त्यांच्या शिकारी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहेत. परंतु आपले पातक उघडे पडू नये याकरिता वनविभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. या सर्व बाबी ला केवळ जंगलाची होणारी तुटच जबाबदार असून किनवटचे सहाय्यक उपवनसंरक्षकाचे प्रभारी पद हटवून तात्काळ रिक्त पद भरावे व या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करून किनवट तालुक्याला परत हिरवळीने नटलेले नंदनवन करण्याकरिता वन कायद्यामध्ये संशोधन करून पट्टा तोड परवानगी या उपविभागात कायमस्वरूपी बंद करावी अशी मागणी वन्यप्रेमी नागरिकांतून होत आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply