kinwat today news

ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून कनकवाडी व माळबोरगांवात तब्बल 35 कुटूंबांना रोजगार

किनवट ( तालुका प्रतिनिधी ) :
ग्रामविकासासाठीच्या उपलब्ध निधितून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतांना सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकाने महिला बचत गटांच्या माध्यमातून जवळपास तब्बल 35 हून अधिक कुटूंबांना रोजगार उपलब्ध करुन देत मास्कची निर्मिती करुन मोफत मास्कचे वाटप करुन माळबोरगांव व कनकवाडीत स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवित आदर्श निर्माण केला आहे.
सविस्तर वृत्त असे की,कोव्हीड 19 च्या संकटकालीन परिस्थितीत किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल, तत्कालीन तहसीलदार नरेंद्र देशमुख, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष धनवे,सहायक गटविकास अधिकारी बि.बि.राठोड यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाच्या प्राप्त निधितून कोरोनाच्या प्रादुर्भावावर उपाययोजनांसह ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुषंगाने माळबोरगांव व कनकवाडी या दोन्ही ग्रामपंचायतींनी कर्तव्यतत्परता दाखवून स्थानिक महिलांना रोजगार मिळवून देत ग्रामस्थांना मास्कचे मोफत वाटपातून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली.
आदिवासी क्षेत्र असलेल्या किनवट तालुक्यामध्ये माळबोरगाव व कनकवाडी या दोन्ही ग्रामपंचायतीत ग्रामसेवक अतुल लष्करे यांनी पदभार स्विकारल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थांच्या सहकार्यातून स्थानिकस्तरावरिल जनतेच्या मूलभूत गरजा पुर्ण करित जनतेच्या समस्या निवारणासह ग्रामविकासाचीही विविध कामे दर्जेदार पद्धतीने केली आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत ते सदैव कर्तव्यतत्पर असतात त्यामूळेच 2203 लोकसंख्या असलेल्या माळबोरगांवमध्ये व 1073 लोकसंख्येच्या कनकवाडीत ते सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात.
सध्या ग्रामपंचायतींमार्फत स्थापन झालेल्या कोरोना टास्क फोर्स समिती व महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून कोव्हीड 19 पासून सुरक्षितता पाळण्यासंदर्भात अनेक प्रयत्न केले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून माळबोरगांवमधील पंधरा व कनकवाडीत निर्माण केलेल्या चौदा महिला बचतगटांच्या माध्यमांतून यापूर्वी विविध उपक्रम राबविण्यांत आल्याने या दोन्ही गावांतील महिला बचत गटांना मास्क शिलाई करण्यासाठी कापड उपलब्ध करून देण्यात आले व सोबतच, ते शिवून घेतल्यानंतर प्रती नग रुपये 10 प्रमाणे त्यांना मजूरी देण्यात आली.
यावेळी स्वयंसहायता समूहातील सर्व महिलांनी सुरक्षित अंतर राखत, स्वतः मास्कचा वापर करून 5000 मास्क शिलाईचे काम पूर्ण केले. या प्रयत्नामुळे स्वयंसहायता समूहातील महिलांना लॉकडाउन काळात काम आणि मजुरीही मिळाली असून जवळपास तब्बल 35 कुटूंबांना रोजगार निर्मितीमूळे उपजिविकेचे साधन प्राप्त झाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला.
प्रकल्पाधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने न्युक्लिअस बजेटमधून आदिवासी महिला बचत गटांना शिलाई मशीन्स् उपलब्ध करून दिल्या होत्या. हे विशेष.
माळबोरगांवमध्ये 3000 तर, कनकवाडीत 1500 मास्कचे ग्रामस्थांना मोफत वाटप करतांना या दोन्ही ग्रामपंचायतींनी लाॅकडाऊन कालावधीत लोकहितकारक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून त्यात महिला स्वयंसहायता समूहास सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांनी ग्रामपंचायतींचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच, माळबोरगाव व कनकवाडी या दोन्ही गावांतील सर्व गावकऱ्यांनी मास्क मोफत उपलब्ध झाल्यामुळे आनंद व्यक्त करत असून अत्यावश्यक कामासाठी घरातून बाहेर पडतांना मास्कचा आवर्जून वापर करत आहेत.
या उपक्रमासाठी कनकवाडी गावच्या सरपंच जयश्री पंडित व्यवहारे, उपसरपंच सुमनबाई जयवंतराव जाधव, माळबोरगावच्या सरपंच वंदना जुमडे, उपसरपंच संतोष राठोड, विस्तार अधिकारी साईनाथ चिंतावार, विस्तार अधिकारी विश्वनाथ पुरी, ग्रामसेवक अतुल लष्करे, ग्रामपरिवर्तक पांडुरंग मामीडवार, आरोग्य सहाय्यक एन.अनेलवार, उमेद अभियान व्यवस्थापक गौतम वाव्हूळे, एस.एम.भगत, आरोग्य सेविका मिनाताई जांभळे, आरोग्य सेवक पि.एस.गायकवाड, कुंभकरण, आशा कार्यकर्ती वंदना पेंदोर, ग्रामसंघाच्या अध्यक्षा गुंफाताई गवले, ग्रामप्रेरिका रंजना गवले, गायत्री पेटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

महिला बचत गटांच्या माध्यमातून मास्कची निर्मिती करुन ग्रामस्थांना 5000 मास्कचे मोफत वाटप

कर्तव्यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या संकटकालीन परिस्थितीवर उपाययोजना करतांनाच माळबोरगांव व कनकवाडीतील जनतेच्या आरोग्याची काळजी घेतांनाच लाॅकडाऊनमूळे स्थानिक जनतेच्या रोजगाराचाही प्रश्न होता. त्यामूळे वरिष्ठांचे मार्गदर्शन व गांवातील उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्यातून स्थानिक महिला बचत गटांना काम देण्यात आले. त्यामूळे या दोन्ही गांवातील जवळपास तब्बल 35 कुटूंबांना रोजगार निर्मितीतून उपजिविकेचे साधन मिळाले या उपक्रमात आपण कर्तव्य बजावतांनाच सर्वांच्या सहकार्यातून सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे समाधान आहे असे माळबोरगांवचे सरपंच वंदना रघुनाथ जुमडे, कनकवाडीच्या सरपंच जयश्री पंडित व्यवहारे या दोन्ही महिला सरपंच व ग्रामसेवक अतुल लष्करे तसेच,कनकवाडी (व्हि.एस.टि.एफ.) ग्रामप्रवर्तक पांडूरंग मामीडवार म्हणाले.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply