kinwat today news

रागात घेतलेले निर्णय असेच असतात. ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेंव्हा ठरवता येत नाही, तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजले. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो.

नांदेड: ४३ वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात मनस्वी रमता येत नाही. म्हणून मी माझा राजकीय प्रवास आता थांबवत आहे, अशी पोस्ट फेसबुकवर लिहून माजी केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपच्या नेत्या सूर्यकांता पाटील यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झाल्याची खंत आहे, अशा शब्दांत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा पश्चातापही बोलून दाखवला आहे.

सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोडून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांची वेगळे वजन होते. परंतु निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला आणि प्रदीर्घ राजकीय कारकिर्द असूनही त्या राजकारणात बाजूला पडल्या होत्या. फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून त्यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. ‘राजीनामा लिहून तयार होता, पण मी आहेच कोण म्हणून एवढा शो करायचा’, हे त्यांच्या पोस्टमधील वाक्य त्यांची उद्विग्नता दाखवून देते.

गेल्या ४३ वर्षात सर्वांनीच सन्मान दिला. अनेक पदे मिळाली. त्याबद्दल माझी काहीच तक्रार नाही. आता मला काहीही मिळवायचे नाही. एकटीने सगळे जिंकले. लोकांना कंटाळा यावा इथपर्यंत प्रवास करण्याची माझी इच्छा नाही. पण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. तरीही माझा निस्वार्थी प्रवास मला फार समृद्ध करून गेला. त्यामुळे मी माझा राजकीय प्रवास थांबवत आहे, असं सांगतानाच राजकीय प्रवास थांबवला तरी नव्या पिढीसाठी काम करत राहणारच आहे. घरी बसणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे.

चार वेळा खासदार, एकदा आमदार आणि केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री, संसदीय कार्य राज्यमंत्री आदी विविध पदे त्यांनी भूषिविली आहेत. १९८० मध्ये त्या हदगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. हिंगोली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे.१९८६ मध्ये त्या राज्यसभेवरही गेल्या होत्या.

रागात घेतलेले निर्णय असेच असतातः सूर्यकांता पाटील यांनी २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र रागाच्या भरात हा निर्णय घेतल्याचे त्यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. आपलीच लायकी नाही, हे समजले होते. रागात घेतलेले निर्णय असेच असतात. ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरवता येत नाही, तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत, हे पक्के समजले. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो, याची खंत आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याबद्दलचा पश्चातापही बोलून दाखवला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply