शेतकऱ्यांना कर्ज वाटप करताना कागदपत्रांचा अडथळा नको बँकाना प्रसंगी महसूल विभाग देईल आवश्यक कागदपत्रे : ना. वडेट्टीवार

चंद्रपूर, दि. 26 मे : (प्रा.सुग्रीव गोतावळे) या वर्षीच्या कोरोना संकटात संपूर्ण राज्याचे अर्थकारण, जीवनावश्यक अन्नधान्यांची उपलब्धता ही खरीपातील पिकावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना कर्जवाटप करताना कागदपत्राचे कारण पुढे करून त्यांची बोळवण करण्यात येऊ नये. प्रसंगी महसूल विभाग आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करेल. त्यामुळे शंभर टक्के कर्जवाटप झाले पाहीजे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या राज्यस्तरीय व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये चंद्रपूर येथून सहभागी होण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या प्रतिनिधींशी आज संवाद साधला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, शिखर बँकेचे प्रमुख एस. एन. झा, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे व जिल्ह्यातील सर्व बॅंकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेतांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्राची उपलब्धता करून देण्यासाठी चंद्रपूर महसूल प्रशासन पुढे आले आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या पीककर्जासाठी आवश्यक असणारी कागदपत्र उपलब्ध नसेल तर प्रसंगी महसूल कर्मचारी बँकेला मदत करेल. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने महसूल यंत्रणेला स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांकडे आवश्यक कागदपत्र नसल्यामुळे पीक कर्ज उपलब्ध झाले नाही, असे कारण सांगू नये, असेही त्यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

यावर्षी पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले पाहिजे. आणि ही जबाबदारी बँकांनी घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. सोबतच बँकेत येणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मानजनक वागणूक दिली गेली पाहिजे. या संदर्भातली कोणत्याच बँकेची तक्रार ऐकून घेतली जाणार नाही, असेही आजच्या बैठकीत पालकमंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

खरिपासाठी पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना यावर्षी आपला ऐच्छीक अर्ज देण्याचा अधिकार आहे. म्हणजे पिक विमा काढायचा नसेल तर तसे शेतकऱ्यांना लेखी सांगता येईल .तथापि अतिशय अल्प पैशांमध्ये निघणाऱ्या पीक विम्याचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पिक विमा संदर्भात कंपन्यांची कार्यालये तालुका पातळीवर निर्माण व्हावी, यासाठी आपण सूचना केल्या असून यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल,अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

गेल्या वर्षीच्या कर्जपुरवठा मधील थकबाकीदार शेतकऱ्यांना विना अडचण यावर्षीदेखील कर्ज पुरवठा करण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाचे आहे. त्यामुळे आधीच्या थकित असणाऱ्या खाते धारकांचे देखील कर्जवितरण थांबू नये, असेही त्यांनी बँक प्रतिनिधींना स्पष्ट केले.

गेल्या वर्षी 536 कोटी रुपयांचे वाटप जिल्ह्यामध्ये झाले होते. यावर्षीदेखील त्याच प्रमाणात त्यापेक्षा अधिक कर्ज वाटप झाले पाहिजे. कर्ज वाटपामध्ये जिल्हा सर्वात पुढे असला पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभागाने या वर्षीचा पीक पॅटर्न देखील कोरोना संकटाची सामना करताना देश राज्य स्वयंपूर्ण बनेल तसेच आर्थिकदृष्ट्या सबल बनेल अशा पद्धतीचा ठेवावा,अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक स्वावलंबित्व बहाल करणारा खरिपाचा हंगाम ठरला पाहिजे. यासाठी अनुषंगिक सर्व यंत्रणांनी या काळात काम करावे, बँकांनी दायित्व ओळखून पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांच्या कर्जवाटपाबाबत काही अडचण असल्यास जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 07172-250381 तसेच सीडीसीसी बँकेच्या 07172-255224 या क्रमांकावर कार्यालयीन सकाळी 10 ते 6.30 या वेळेत संपर्क करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलतांना शुक्रवारला मोठ्या गावात कर्ज मेळावे घ्यावे. प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडीट कार्डचा लाभ द्यावा तसेच मत्स आणि दुग्ध व्यवसाय करीता किसान क्रेडीट कार्डचे वाटप करावे, असे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी निर्देश दिले.

शेतकऱ्यांना बँकेमध्ये चांगली वागणूक द्यावी, एनआरएलएम महिला बचत गटांना मागील वर्षीप्रमाणे या वर्षी कर्जवाटप करावे तसेच कर्जवाटपाविषयी साप्ताहिक माहिती अद्ययावत करावी, असे निर्देश जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांना दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक एस. एन. झा यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांच्या पतपुरवठा संदर्भात नियमित बैठका घेण्याचे निर्देश देखील त्यांनी यावेळी दिले.

00000

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.