kinwat today news

“संविधान हाच आमचा धर्म ” – कॉ. गणपत भिसे. वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी दिला संदेश

किनवट टुडे न्युज।।
मृत्यू हे जगातले एकमेव सत्य. तो कुणालाच टाळता आलेला नाही. मृत्यू हा तसा दुःखदायकच. त्यातल्या त्यात जनक पित्याचा मृत्यू हा लेकरांसाठी आभाळ कोसळल्यासारखा असतो. मात्र याही प्रसंगी संयमाने वैयक्तिक दुःखापेक्षा सामाजिक दुःखाची गहिरी जाणीव ठेवत, अंधकारात चाचपडत असलेल्या आणि प्रस्थापित जात -धर्म, वर्ग व्यवस्थेकडून पिळल्या गेलेल्या वंचित समूहाला “भारतीय संविधान हाच आपला धर्म आहे” , असा मुक्तीचा संदेश काल परभणी येथे सार्वजनिक स्मशानभूमीत आपल्या वडिलांच्या अंत्यविधी प्रसंगी लाल सेनेचे प्रमुख कॉ. गणपत भिसे यांनी दिला.
‘जात’ हा भारतीय समाजाला लागलेला एक भयानक मानसिक रोग. जात हे गोरगरिबांच्या शोषणाचं प्रमुख साधन. भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात जाती आधारित शोषण व्यवस्था कार्यरत आहे. इथे माणूस जातीत जन्मतो आणि जातीतच मरतो. जातीतच राहण्याची सक्ती केली जाते. माणूस जातीबाहेर गेल्यास त्याची अक्षरश: समाजाकडून दमकोंडी केली जाते. सध्याच्या हुकूमशाही कोरोना काळात जात हा घटक अधिकच बंदिस्त होताना दिसत आहे. अशा काळात पारंपरिक धर्म आणि जात परंपरांना नकार देत, आपल्या वडिलांचा अंत्यविधी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करून कॉ. गणपत भिसे यांनी केला. ही एक ऐतिहासिक घटना आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या आगेमागे भारतात मार्क्सवाद्यांच्या आणि फुले शाहू-आंबेडकरवाद्यांच्या नेतृत्वाखाली जात वर्ग विध्वंसनाची चळवळ सुरू होती. युवकांत ‘डी क्लास’ आणि ‘डी कास्ट’ होण्याची उमेद निर्माण झाली होती. त्याचवेळी मूलतत्त्ववाद्यांनी, वंशश्रेष्ठत्ववाद्यांनी जाती मजबूत करण्याचे काम सुरू केले होते, त्यात त्यांना यश आले आणि आज देशपातळीवर त्यांचीच निरंकुश सत्ता असताना, जाती विध्वंसन करणे जवळपास अशक्य झालेल्या काळात कॉ. गणपत भिसे यांनी दुःखाच्या अत्यंत नाजूक प्रसंगी कृतीतून दिलेला हा संदेश मला खूप महत्त्वाचा वाटतो. भारतीय संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगायचा हक्क नाकारणारी जात आणि धर्म व्यवस्था केव्हाच नाकारली आहे. मात्र शारीरिक गुलामीपेक्षा मानसिक गुलामी ही जास्त वाईट असते.आज भारतात मानसिक गुलामी वरचेवर वाढत असताना दिसते. एकाबाजूला स्वतःच्या जात- धर्म आणि वंशश्रेष्ठत्वाच्या अस्मिता जोपासायच्या आणि दुसऱ्या बाजूला संविधानही सांभाळायचे अशी दुटप्पी भूमिका काही लोक घेत असतात. म्हणूनच ही अमानुष व्यवस्था भारतात टिकलेली आहे.
कॉ. गणपत भिसे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माझे सहाध्यायी. चळवळीतील सहकारी. अर्थशास्त्राचे अभ्यासक, संशोधक. चळवळीच्या ध्यासापायी त्यांनी नोकरी नाकारली आणि पूर्णवेळ कार्यकर्ता झाले. अण्णा भाऊ साठे यांच्या जग बदलण्याच्या तत्वज्ञानाने झपाटले. लाल सेना या संघटनेचे ते प्रमुख आहेत. आतापर्यंत त्यांनी दलितांच्या श्मशानभूमीचा प्रश्‍न , गायरान जमिनीचे प्रश्न, दुष्काळामुळे निर्माण झालेले प्रश्न, ऊसतोड कामगारांचे प्रश्न, मजूर वेठबिगारांचे प्रश्न, स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रश्न, जातीय अत्याचाराचे प्रश्न, जाती अंतर्गत आरक्षणाचे प्रश्न अत्यंत संवेदनशीलतेने हाताळले आहेत. मार्क्स फुले-आंबेडकर अण्णाभाऊ साठे स्कूलचे ते कॅडर आहेत. जात वर्ग स्त्रीदास्यांताचे त्यांचे स्वतःचे सिद्धांतन आहे. कालच्या मसनवट्यातील कृतीने त्यांनी आपण केवळ बोलके नाहीत ;तर कर्ते आहोत हे सिद्ध केले आहे.
तोरणादारी आणि मरणादारी जात पाहिली जाते. जशी लग्नसंबंधात जात लागते, तशीच मृत्यू प्रसंगीही जातच लागते. “तुम्ही शेवटी आमच्याच खांद्यावर जाणार आहात हे लक्षात ठेवा” , अशी धमकी जवळपास प्रत्येकालाच आपल्या जातवाल्यांकडून मिळत असते. मयताला खांदा देण्यावरून अनेक ठिकाणी तुंबळ मारामाऱ्या झालेल्या आहेत. तो भावकीचा हक्क असतो. मरणादारी भावकी आणि पै-पाहुणे म्हणजेच जातवाल्यांचाच कारभार असतो.मरणाचं दुःख बाजूला सारून बऱ्याचदा भावकीची खुशामत करावी लागते.
काल पहाटे जेव्हा आपल्या वडिलांचे वृद्धापकाळाने निधन झाले; तेव्हा गणपत भिसे यांनी आधी स्वतःला सावरले. आपल्या कुटुंबालाही सावरले. ही वेळ दुःख व्यक्त करण्याची नाही ;तर समाजाला योग्य संदेश देण्याची आहे, हे त्यांनी कुटुंबियांच्या लक्षात आणून दिले. त्यांचे वडील देवराव महादू भिसे हे खऱ्या अर्थाने सच्चे कॉम्रेड होते. आपल्या आयुष्यात त्यांनी कधीच जात-धर्मनिहित कर्मकांडे केली नाहीत. आपल्या कामातच त्यांनी देव पाहिला. मुलांवर त्यांनी वैज्ञानिक संस्कार केले. विचार आणि व्यवहार शिकविला. असे आदर्श जीवन जगलेल्या बापाचा, त्याला साजेसा असाच अंत्यविधी सोहळा मुलांनी घडवून आणला.
शिंगणापूर फाट्यावरील “लाल तारा” निवासस्थानापासून ही अंत्ययात्रा निघाली. त्यापूर्वी त्यांची नात समता गणपत भिसे हिने संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन केले. त्यानंतर सारजाबाई भालेराव, जानकाबाई वाव्हळे, गिरजाबाई कांबळे आणि मुलगा गणपत भिसे या चौघांनी आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला. ही अंत्ययात्रा सुरू असताना मध्ये कुठेही प्रेत उतरविले गेले नाही. विसावा नाही. किंवा कपाळाला रुपया नाही. फक्त फुलांनी सजविलेला देह मुलींच्या आणि मुलाच्या खांद्यावर होता.
परभणीतील सार्वजनिक स्मशानभूमीत पुन्हा समताने संविधान उद्देशिकेचे वाचन केले आणि चौघांनीही एकसाथ आपल्या पित्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. त्यापूर्वी गणपत भिसे यांनी आपण कोणतेही जात-धर्म विधि पाळणार नसून ,संविधान हाच आपला धर्म आहे हा अमूल्य संदेश उपस्थितांना दिला.

याप्रसंगी त्यांच्या आई आसरुबाई यांची कसल्याही प्रकारची विटंबना करण्यात आली नाही. त्यांचे कुंकू पुसले नाही. जोडवे काढले नाहीत. किंवा सौभाग्याची कोणतीही खुण पुसली नाही. यापूर्वी २०१६ मध्ये जेव्हा लाल सेनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. अशोक उफाडे यांचे वडील बंडुजी यांचे निधन झाले होते, त्यावेळीही बंडुजी यांच्या पत्नी कौशल्याबाई यांची कसल्याही प्रकारची विटंबना करण्यात आली नव्हती. त्यानंतर गणपत भिसे यांचे मेहुणे त्र्यंबक भालेराव यांचे निधन झाले, तेव्हाही त्यांच्या पत्नी सारजाबाई यांचीही विटंबना करण्यात आली नाही. आणि काल तर संविधानाचे वाचन करून” संविधान हाच आमचा धर्म आहे” , अशी घोषणा कॉ. गणपत भिसे यांनी केली. याप्रसंगी कोणतेही कर्मकांड करण्यास त्यांनी नकार दिला.
शिकाळे धरणे, मरणोपरांत पाणी पाजणे, पेटत्या चितेभोवती ओल्या अंगाने फिरणे, मडके फोडणे, ठो ठो बोंबलणे, राख सावडणे, झाडाला हाडे बांधून ठेवणे, खांदे उतरविणे, माळ लोंबविणे , तेरवी करणे, राख नदीत टाकून पाण्याचे प्रदुषण करणे आणि भटाला दक्षिणा देऊन शोषणाची व्यवस्था मजबूत करणे या सर्व प्रथापरंपरांना कॉ. गणपत भिसे यांनी नकार दिला.

हा नकार इथल्या शोषणकेंद्री धर्म व्यवस्थेला आहे. माणसाला जिथे तिथे आडवू पाहणाऱ्या जात व्यवस्थेला आहे. ही घटना ऐतिहासिक अशा स्वरूपाची असून, शोषणाची निर्मिती केंद्रे नाकारून संविधान हाच आमचा धर्म आहे ही कृतीयुक्त घोषणा सर्वहारा वर्गाला, सर्व वंचितांना दिशादर्शक आहे.

निदान समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी अशाप्रकारे अर्थहीन प्रथा परंपरांना फाटा दिला पाहिजे. हाच पायंडा यापुढे मातंग आणि तत्सम शोषित, वंचित जाती
जमातींनी पुढे चालवून स्वतःला जातधर्माधिष्ठित गुलामीच्या जोखडातून कायमचे मुक्त करावे.

कॉम्रेड गणपत भिसे आणि त्यांच्या परिवाराने अतिव दुःखाच्या प्रसंगीही समाजाला घालून दिलेला आदर्श निश्चितच अनुकरणीय ठरावा. कॉ. गणपत भिसे आणि त्यांच्या परिवाराच्या धाडसाला
जय लहुजी, जय भीम लाल सलाम…!
– डॉ. मारोती कसाब.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply