kinwat today news

अण्णा गेले आम्ही पोरके झालो…

किनवट टुडे न्युज।।
कॉम्रेड देवराव महादजी भिसे… आमचे अण्णा आज पहाटे अचानक आम्हाला सोडून गेले… अनेक दिवसांपासून आजारासह जगत होते, मात्र कधीच ते आपला त्रास आम्हाला सांगत नव्हते… लाल सेनेचे प्रमुख आणि विद्यमान चळवळींचे अभ्यासक, भाष्यकार कॉम्रेड गणपत भिसे यांचे ते वडील; मात्र आम्हां सर्व मित्रमंडळींना ते वडीलासमानच होते. जेवढं प्रेम ते गणपतवर करीत तेवढच आम्हा सर्वांवर. परभणी जिल्ह्यातील सोनपेठ जवळचं विटा खुर्द हे त्यांचं गाव. गावा शेजारूनच गोदावरी नदी वाहते. माजी आमदार उत्तमराव विटेकर यांचं हे गाव. गावाच्या भोवताली प्रचंड झाडी… निसर्गसौंदर्याने नटलेलं. दिवाळीच्या आणि उन्हाळी सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व मित्र मंडळी विट्याला जात असू. दिवसभर नदीवर पोहायचं आणि रात्री अण्णांसोबत मस्त गप्पा मारत बसायचं अशा आमच्या सुट्ट्या जायच्या. पाहुणचार करावा तो नदीकाठच्या माणसांनीच…! आम्ही गेल्यानंतर अण्णा कुठून कुठून काहीबाही आम्हाला खायला आणायचे कधी टरबूजं, खरबूजं, काकड्या; कधी रानातल्या शेंगा असं बरंच काही… मायबाप कसे असावेत तर अण्णा बाईसारखे. अण्णांना तीन मुली आणि एक मुलगा. एकुलता मुलगा असूनही अण्णांनी कॉम्रेडला कधीच आवरलं नाही. हे करू नको ते करू नको ,इथं जाऊ नको तिथं जाऊ नको असं कधीच म्हटलं नाही. आपल्या मुलाचा त्यांना नेहमीच गर्व वाटत आला. विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडून देऊन कॉम्रेडनं चळवळीला पूर्णपणे वाहून घेतलं. तेव्हा या चळवळीत अण्णा, बाई आणि त्यांच्या तिन्ही मुली, जावई, नातवंडांसह सहभागी होत असत. कॉम्रेड परभणीत राहायला आल्यानंतर अण्णा बाईनीही गाव सोडलं आणि तेही परभणीत दाखल झाले. अण्णांचे व्यक्तिमत्त्व हरहुन्नरी होतं. कोणतंही काम करायला ते लाजत नसत. त्यांच्या हातातच कला होती. सुतारकाम त्यांना चांगलं जमायचं.मी त्यांना रिकामं, निवांत बसलेलं कधीच पाहिलं नाही. काहीतरी खुटू रुटू चालूच असायचं. पंधरा-वीस वर्षांपूर्वी अण्णांचं मोठं ऑपरेशन झालं होतं. पण अण्णांनी कधी अंथरूण धरले असं झालंच नाही.आपल्या मुलाच्या संसाराला हातभार लावत राहिले.
रात्री अण्णा गेल्याचं कळालं. भडभडून आलं. आज परभणीत अण्णांचा अंत्यविधी आहे; परंतु या कोरोणाच्या कहराने जाता येणार नाही… अण्णांना शेवटचे पाहता येणार नाही… ही खंत कायम राहील. अण्णांच्या आठवणींनी मन गहिवरलंय… ती सावळी, मध्यम बांध्याची सुंदर मूर्ती डोळ्यापुढे उभी आहे…! तरतरीत नाक, त्याखाली शोभून दिसणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पिळदार मिशा, अंगात पांढरा सदरा आणि पांढरंच धोतर, सतत हसरा चेहरा… अण्णांची त्याग मूर्ती डोळ्यांपुढे आहे… माणसानं कसं जगावं तर अण्णांसारखं. आपल्या मुलाच्या मागे कसं राहावं, तर आणलं सारखं..! लाल सेनेच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणारे अण्णा सच्चे कॉम्रेड होते. आज अण्णा आपल्यात नाहीत; परंतु त्यांची लढण्याची आणि जग बदलण्याची उमेद आपल्याला सतत प्रेरणा देत राहील… या योद्ध्याला अखेरचा लाल सलाम , जय लहुजी, जय भीम…!
प्रा.मारोती कसब,उदगीर

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply