kinwat today news

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान.

किनवट टुडे न्युज ।।
1 मे 1960 रोजी संयुक्त मुंबईसह मराठी भाषिक प्रांत म्हणून महाराष्ट्राची निर्मिती करण्यात आली आज एक मे 2020 रोजी कोरोणाच्या या वातावरणामध्ये प्रत्येक जण आपल्या घरातून महाराष्ट्र दिन साजरा करत असला तरीही 105 हुतात्म्याचे हौतात्म्य स्वीकारून निर्माण झालेल्या महाराष्ट्राला त्या हुतात्म्यांचा आणि महाराष्ट्र निर्मितीच्या शिलेदारांचा विसर पडलेला दिसून येतो. केवळ नाव घेऊन औपचारिकता भागवणारी मंडळी दिसून येते या शिलेदारांच्या कार्याचा उल्लेख कमी प्रमाणात आढळतो म्हणून संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीचे प्रमुख शिलेदार, कामगारांचे नेते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान यावर छोटासा शब्दप्रपंच.
अण्णाभाऊ साठे यांनी त्यांच्या हयातभर चतुर्थश्रेणी वर्गाची, श्रमिक, पीडित, वंचित, शोषित, दलित वर्गाच्या व्यथा, वेदना समाजासमोर मांडून प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढण्याचे काम केलेले आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांना प्रमुख्याने कामगारांचे नेते म्हणून ओळखले जाते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांचे योगदान भरीव स्वरूपाचे असले तरीही ते दुर्लक्षित राहिलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांच्या शाहिरी वांग्मयाचा प्रभाव फार मोठा असल्याचे दिसून येते. ज्यांच्या शाहीरी वांग्मयाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठ्याप्रमाणात क्रांतीची बिजे रोवली, ज्यांच्या शाहिरी आणि वगनाट्य सर्वसामान्यांमध्ये चेतना निर्माण केली, मुंबई कोणाची या काव्याचा संयुक्त महाराष्ट्र चळवळ वर सकारात्मक परिणाम पडला त्या अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून आणि वगनाट्यातून महाराष्ट्रामध्ये वैचारिक क्रांतीचा परिणाम झालेला दिसून येतो. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून ज्ञानदानाचे, माहितीचे , परिवर्तनाचे, वैचारिक सर्जनशीलतेचे साधन आहे हे अनुभव आपल्या साहित्यातून अण्णाभाऊ साठंनीे दाखवून दिलेले आहेत. साहित्याच्या आणि कलेच्या माध्यमातून सामाजिक, वैचारिक, मानसिक जाणिवा कशा प्रगल्भ होतात हे अण्णाभाऊ साठे यांनी वेळोवेळी प्रकट करून दाखवलेले आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनमानसापर्यंत पोहोचवून मुंबई बद्दलची जाणीव, जिव्हाळा मराठी भाषेची गोडवी त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने मराठी बोली भाषेचा अस्सल बाज देऊन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवला हे माझी मैना गावावर राहिली या लावणीने सोदाहरण स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्रातील जातिभेदाला नष्ट करून गावकुसाबाहेरच्या समाजाला जागा करणारा हा एक महत्त्वाचा क्रांतिकारी लोकशाहीर होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान एक राजकीय नेता म्हणून नसले तरी राजकीय घटनांबाबत त्यांचा अभ्यास गाढा होता. प्रस्थापित राजकारणावर त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून सडकून टीका केलेलीे आहे. 1952 साली लोकमंत्र्यांचा दौरा हे वगनाट्य लिहिले व कलापथकाचा वापर करून रंगभूमीवर त्याचा यशस्वी प्रयोग केला. लोक मंत्र्यावर ओढलेले ताशेरे यामुळे आणि कलेच्या टीकेमुळे हे वगनाट्य प्रेक्षकांना अतिशय आवडले असले तरी महाराष्ट्र शासनाने पकड वॉरंट काढल्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना हे वगनाट्य मध्येच थांबून भूमिगत व्हावे लागले परंतु त्यांच्यातील विद्रोही क्रांतिकारी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता शासनाविरुद्धचा उठाव करण्याची उर्मी त्यांना अस्वस्थ करत होती म्हणून त्यांनी पुढे 1957 मध्ये माझी मुंबई हे लोकनाट्य लिहिले आणि त्याचा प्रयोग 1958 मध्ये केला या लोकनाट्याचा प्रयोग होताच शासनाने पुन्हा यावर बंदी घातली परंतु याचा फारसा विचार न करता त्यांनी शाहिरी, पोवाडे, लावण्या लिहिल्या व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला गतिमानता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तमाशा या कलाप्रकाराला नवीन स्वरूप देऊन लोकनाट्य या कला प्रकाराला जन्म घालून लोकनाट्याच्या या माध्यमातून आपल्या विद्रोहाला आणि विद्रोही विचारांना वाट मोकळी करून दिलेली आहे. अण्णाभाऊ साठे यांनी अकलेची गोष्ट, निवडणुकीत घोटाळे, बेकायदेशीर , माझी मुंबई, शेटजींचे इलेक्शन इत्यादी गाजलेले लोकनाट्य यातून मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी आग्रहाची भूमिका मांडून खंबीरपणे मागणी केली. याबाबत सर्वसामान्य माणसांमध्ये जनजागृती करण्याचे महत्त्वाचे कार्य अण्णाभाऊ साठेंनी केलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही मराठी भाषिकांची अस्मिता असल्याकारणाने सर्वांचा एकजुटीने या चळवळीत सहभाग असावा यासाठी शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख हे त्रिकूट उभा महाराष्ट्र पिंजून काढून महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ज्ञान देऊन या चळवळीमध्ये सहभागी होण्याचा आणि प्राणपणाने लढा देण्याचा संदेश देत महाराष्ट्र पेटवून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला क्रांतिकारी आणि लढवय्या म्हणून निर्माण करण्याचे काम करत होते.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठे यांनी राजकीय भाष्य केले ते आपल्या साहित्याच्या माध्यमातून. अण्णाभाऊ साठे केवळ लोकशाहीर होते असे नव्हे तर ते सामाजिक आणि राजकीय स्थितीचे भाष्यकार सुद्धा होते. अण्णाभाऊ साठे राजकीय भाष्यकार होते हे त्यांच्या लोकमंत्र्यांचा दौरा आणि शेटजींचे इलेक्षन या महत्त्वाच्या साहित्यप्रकार यातून स्पष्ट होते अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बाबत कॉम्रेड श्रीपाद डांगे , आचार्य अत्रे, सेनापती बापट, एस. एम. जोशी, केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, मोरे यांच्यासारख्या नेत्यांचे विचार सर्वसामान्यांमध्ये, सर्वसामान्य जनतेपर्यंत आपल्या शाहिरीच्या माध्यमातून पोहोचविण्याचे कार्य करत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा वनवा जसा राजकीय नेत्यांनी पेटवला होता तसा अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून तो महाराष्ट्रभर सतत तेवत ठेवला.
अण्णाभाऊ ची शाहीरी आणि लढा हा कल्पनेच्या भराऱ्या मारणारा किंवा मनोरंजन करणारा नसून विषमता मूलक मानवी जीवनातील संघर्षाचे, दुःखाचे दैन्याचे, अत्याचारित जीवनाचे चित्र, लेखन आणि दृश्य वास्तविकतेसह समाजासमोर मांडणारा लढा आहे. त्यांच्या विविध कलाकृती मधून क्रांतीची बिजे रोवली जात होती. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी 1942 ला चले जाव आंदोलनामध्ये बर्डे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सहभाग घेतला होता त्यावेळी त्यांच्यावर पकड वॉरंट जारी करण्यात आले. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लालबावटा कलापथकाच्या माध्यमातून आपले सहकारी शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर यांच्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्र क्रांतीसाठी पेटवून या महाराष्ट्रातील माणसाला संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी जागृत केलेच परंतु मानवी जीवनाच्या अनेक विदारक विषमतेचे चित्रणदेखील केलेले आहे. भांडवलशाही व्यवस्थेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मार्क्सवादी विचार मांडले, श्रमिकांच्या दृष्टिकोनातून वर्ण प्रमाणेच वर्ग जाणीव प्रगल्भपणे मांडण्याचा प्रयत्न केला, त्यातून वर्गसंघर्ष चित्रित केला, त्यांच्या शाहीरी आणि कलाकृतीतून राजकीय, आर्थिक, सामाजिक समानता बंधुभाव प्रवर्धित करण्याची तळमळ दिसून येते. वेदना, विद्रोह, नकार या जीवनमूल्यांचे विराट दर्शन त्यांच्या कलाकृतीतून पहावयास मिळते. त्यांनी सर्वसामान्य माणसाला आपल्या समाजक्रांतीचे नायक बनवले. पोटासाठी जमीनदार भांडवलदारांचा अन्याय अत्याचार सहन करणारा समाज त्यांनी आपल्या साहित्यातून रेखाटला, अन्याय, अत्याचाराने भरडला गेलेला सर्वसामान्य माणूस बहुसंख्य आहे. त्याचे विश्लेषण केले म्हणूनच नारायण सुर्वे अण्णाभाऊ साठे बद्दल म्हणतात की, “अण्णाभाऊ साठे हे केवळ दलित जनतेचे लेखक होते असे नाही तर ते जगातील सर्व अन्यायाविरुद्ध लढणारे समग्र मानव जातीचे लेखक होते. त्यांनी एकाच वेळेला वर्णव्यवस्था आणि भांडवली व्यवस्थेच्या विरोधात लढणारे ज्वलंत लिखाण करून ते समाजासमोर मांडलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आपल्या साहित्याच्या माध्यमातून एका अर्थाने लढणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना शस्त्र देऊन प्रेरित करून क्रांतीसाठी प्रवृत्त केले आहे”
अण्णाभाऊ साठे यांच्या शाहिरी वांग्मय आणि त्यांच्या कलाकृतीने प्रभावित होऊन त्यांच्या हाकेला साद देण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राच्या वेळी महाराष्ट्रभर कष्टकरी, शेतकरी, कामगार वर्ग या चळवळीमध्ये सहभागी झाला. त्या काळात महाराष्ट्रात लोकजागृतीचे महत्त्वाचे काम अनेक माध्यमातून चालू होते. समाज प्रबोधन, जनजागृती आंदोलन यासारख्या गोष्टी समाजात सतत सुरू होत्या म्हणून हा काळ धामधुमीचा होता असे म्हटले जाते. कष्टकरी, कामगार, शेतकरी, मजुर, राजकीय नेते, कार्यकर्ते, विचारवंत आपल्या जीवाची पर्वा न करता या आंदोलनामध्ये कार्य करीत होते कारण अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनमानसामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत जागृती आणि ऊर्जा तथा क्रांती निर्माण करण्याचे कार्य केले होते.
महाराष्ट्रातील राष्ट्रवादाची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पासून सुरू होते म्हणून त्यांचे प्रथम स्मरण आणि नंतर अन्य क्रांतिकारकांचे स्मरण केले पाहिजे अशी अण्णाभाऊ साठेंची भूमिका होती म्हणून त्यांनी परंपरागत रचनाबंध स्वीकारताना गणेश वंदन नाकारून मातृभूमीला महापुरुषांना आणि हुतात्म्यांना देशभक्तांना आत्मियतेने मानाचा मुजरा केला “प्रथम मायभूच्या चरणा | छत्रपती शिवबा चरणा | स्मरूनी गातो कवणा | ” अशाप्रकारच्या ओळी ह्या लोकनाट्य मध्ये प्रथमत: मांडल्या गेल्या आणि जनमानसाच्या हृदयामध्ये नवीन जागा आणि नवीन जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच नवीन महाराष्ट्र घडवण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेवर अण्णाभाऊ साठे यांनी एक नवा संस्कार केलेला आहे. यामधून अण्णाभाऊ साठे यांचे देशप्रेम आणि महाराष्ट्रावर असलेले प्रेम निदर्शनास पडते. अण्णाभाऊ साठे यांचा राष्ट्रवाद यामधून दिसून येतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अठरापगड जातीचा हा संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी मराठा, वारली, हटकर, रिहिल, कोळी, महार, मांग, चांभार, कुंभार, सोनार, सुतार, वडार, लोहार, साळी, माळी, कोळी, तेली, तांबोळी, रामोशी, इत्यादी अशा तमाम बहुजनांना एकत्र येण्याचा सल्ला अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून दिलेला आहे.
” महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया ” या अण्णाभाऊंच्या काव्या मधून त्यांचे महाराष्ट्र व देशाबद्दलचे गौरवोद्गार स्पष्ट होतात महाराष्ट्र ही माय भूमी कशी आहे याचे वर्णन त्यांनी या कवितेत करून ही भूमी वीरांची शासनकर्त्यांची आहे तसेच घाम गाळणारे कष्टकरी आणि बहुजन श्रमिकांची सुद्धा आहे त्याचप्रमाणे ही पुण्यभूमी आहे संतांची, वेगवेगळ्या शाहीरांची, त्याग करणाऱ्या महापुरुषांची , वीर छत्रपती शिवाजी महाराजांची या सर्वांची म्हणून या महाराष्ट्रावर आपली काया ओवाळुन टाका अशी जनतेला आर्त हाक देऊन जनतेच्या मनामध्ये क्रांतीची मशाल पेटवन्याचे काम अण्णाभाऊ साठे यांनी केलेले आहे. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी हातात कंकण बांधून सर्वांनी एकत्र यावे, मैदानात रणशिंग फुंकण्यासाठी तयार व्हावे, एकेक करून संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आपल्या मनातील मनीषा पूर्ण करण्याच्या जिद्दीने, हिंमतीने, पोलादा सारखे लढावे, स्वातंत्र्याची शपथ घेऊन संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी या भूमीचे उपकार फेडण्यासाठी सज्ज व्हावे, अशी आर्त हाक अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून जनसामान्यांना दिलेली पहावयास मिळते.
अण्णाभाऊ साठे यांच्या जाणिव आणि वैचारिकता किती प्रगल्भ होती याचे दैदिप्यमान रूप म्हणजे जे “माझी मैना गावावर राहिली | माझ्या जीवाची होतीया काहिली ” ही लावणी होय. या लावणीने महाराष्ट्र क्रांतीसाठी पेटविण्याचे काम केले. गावावर राहिलेली मैना म्हणजे महाराष्ट्रापासून वेगळे केलेले बेळगाव, कारवार, निपाणी, डांग, उंबरगाव या मराठी भाषिक भागांचा दाक्षिणात्य कानडी प्रदेशांमध्ये समावेश केल्यामुळे त्यांच्या जीवाची तळमळ या भागाला महाराष्ट्रामध्ये सामावून घेण्यासाठी व्यक्त केलेली या लावणीमध्ये पहावयास मिळते. एका वेगळ्या अाशयाने ही लावणी त्यांनी रचली. संपूर्ण मराठी भाषिकांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत नवचैतन्य निर्माण करण्याचे, कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी मनोभूमिका निर्माण करण्याचे काम अण्णाभाऊ साठे यांच्या माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहिली या लावणीने करून सकारात्मक परिणाम म्हणून दाखवून दिले.
अण्णाभाऊ साठे म्हणतात ” गिरीकंदीच्या कीर्रर्र झाडीने उंचावलेल्या माना | वीर मराठे गाऊ लागले | वीर रसाच्या गाना ” मराठी भाषिक प्रांतामध्ये वीरश्री संचार करून लढ्यामध्ये पेटून उठवण्याचे काम या ठिकाणी अण्णाभाऊ साठे करताना दिसून येतात.
” जागा झाला चालू लागला शिवारात ला शेतकरी | झेंडा उभारून एकजुटीचा | त्याने फुंकली तुतारी | काँग्रेसवाले सोंगाडे भारी दांडगे | झटपट झाले पुढारी | समदं खाऊन हळूच द्याया | आमच्या हातावर तुरी ” या ओळींमधून शिवारातील शेतकऱ्याला जागा करून त्याच्या हाती एकजुटीचा झेंडा देऊन, तुतारी फुंकून, त्यांना अण्णाभाऊंनी क्रांतीसाठी सज्ज केलेला आहे. तसेच काँग्रेसचे सोंगाडे झटपट झालेले पुढारी आमच्या हातावर तुरी देऊन कशा प्रमाणे राजकारण करतात याची जाणीव तमाम जनतेला करून देणे म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या राजकीय जाणिवा प्रगल्भ असल्याचे उदाहरण आहे.
अण्णाभाऊ साठे म्हणतात “दगडांच्या भेटी होऊन एक प्रचंड भिंत उभारली जाते आपण तर माणसे आहोत आपण एकत्र आलो तर भारतामध्ये नव्हे जगामध्ये महाराष्ट्र आपल्यापासून हिरावून घेण्याचं जिगर कोणातच नाही ” ही शिकवण महाराष्ट्रातील जनतेच्या मनावर बिंबवण्याचे काम अण्णाभाऊ साठेंनी केलेले आहे.
अण्णाभाऊ साठे म्हणतात ” तू मराठमोळा शेतकरी | घोंगडी शिरी | जुनी ती काठी जुनी लंगोटी | बदल ही दुनिया सारी | बदल ही दुनिया सारी ”
या कवणाने शेतकऱ्याला सामाजिक परिवर्तनाची दिशा देऊन व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी अण्णाभाऊ साठे प्रेरित करताना दिसून येतात. त्यानंतर अण्णाभाऊ साठे म्हणतात ” ऊठला मराठी देश | परतुनी झाला धन गंभिर | महाराष्ट्र राखण्या घालुनी घोड्यावर खोगिर | ”
” वीर मराठे गाऊ लागले वीर रसाच्या गाना गिरीकंदीच्या किर्रर्र झाडीने ऊंचाविल्या माना या कवणाने मराठी भाषिक प्रांतातील प्रत्येक मराठी माणसांमध्ये वीरश्रीचा संचार करण्याचे काम अण्णाभाऊ साठे करताना दिसून येतात त्यानंतर अण्णाभाऊ साठे म्हणतात ” आम्ही दुबळे , नेट आमचा तुम्हा होता ठाऊक | तीन कोटी माणसांचा देश मराठी भाषिकांचा | ”
” अन्यायाला रोखण्याची शासनाची शौर्याची सवय आमच्या मनगटाची कालची आणि आजची झुंजण्याचे पाळण्यात आम्ही कंकन बांधिले जबरीने आमावर धोर रण लादले ” म्हणजे येथील तीन कोटी मराठी भाषिकांच्या या महाराष्ट्राला सतत अन्यायाशी झुंज देण्याचे कंकन जणू काही जन्मताच बांधलेले आहे असे अन्नाभाऊ साठे म्हणतात. या अन्यायाला रोखण्याची शक्ती महाराष्ट्रातील लोकांमध्ये कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील ती कधीही दुबळी ठरली नाही आणि ज्यावेळी शत्रूंनी जबरदस्तीने युद्ध लादण्याचा प्रयत्न केला त्यावेळी शत्रूला या महाराष्ट्रानं रगडूनही काढलेला आहे त्याचा पराभवही केलेला आहे. असा इतिहास अण्णाभाऊ साठे आपल्या कवनामध्ये सांगून लोकांना प्रेरित करताना दिसून येतात. त्यानंतर अण्णाभाऊ साठे म्हणतात की, ” अस्तनित आमच्या निखारे फुलले | जय महाराष्ट्राला कलंक लावून गेले | तो पिसाळ रिपूला देईल रायगड किल्ले आणि संताजीला नागोजी ने मारीले | बाळ आमचे परी वाढले | नित रगडुनि ऊन्मता | घडवी मराठा या महाराष्ट्रा | रण लढता-लढता ” यामधून महाराष्ट्राचा लढण्याचा आणि झुंज देण्याचा समर्थ इतिहास आणि परंपरा अण्णाभाऊ साठेंनी जनतेसमोर ठेवलेली आहे
एक महत्त्वाचा प्रश्न याठिकाणी चर्चिला जावा असे मी मनोमन समजतो कारण, शाहिरीने आणि लावणीने काय साध्य केले असा प्रश्न अनेक निकृष्ट दर्जाच्या आणि नीच प्रवृत्तीच्या मेंदूमध्ये खुळावतो आणि तो तसाच बाहेर पडताना दिसून येतो. त्यांना माझे सांगणे आहे पोवाडे ऐकून दुर्बलता नष्ट होते व त्या दुर्बल व्यक्तीमध्ये प्रबलता पैदा होते कारण शाहीरीत विजेचा कडकडाट असतो, डफात तोफा आदळत असतात म्हणून शाहिरी अंगावर शहारा ऊभा करणारे, रोमांच निर्माण करणारे आणि रक्त सळसळून खवळून झेप घ्यायला लावणारे एक प्रभावी तंत्र आहे. अण्णाभाऊ साठे हे तंत्र हाताळताना म्हणतात ” बाईल द्यावी पण इमान देऊ नये ” अण्णाभाऊ साठेंचे हे शब्द म्हणजे महाराष्ट्रभर आग वर्षवत होते म्हणूनच महाराष्ट्रातील माणसे नटून-थटून हा महाराष्ट्र राखु शकली नाही तर या महाराष्ट्राचे नाव या देशाच्या पटलावर उरले नसते म्हणून त्या शाहिरी वाड्•मयातून उभा महाराष्ट्र पेटवण्याचे ज्यांनी काम केले त्या अण्णाभाऊ साठेंच्या असामान्य कर्तुत्वाचा विसर पडणे म्हणजे आपल्या बापाच्या नावाचा विसर पडण्या जोगे आहे असे माझे मत आहे.
हा महाराष्ट्र घडावा म्हणजे हे स्वराज्य घडावे ही श्री छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा अशी ती भावना आहे त्याबद्दलची तळमळ वेदना आणि अभिलाषा व्यक्त करताना अण्णाभाऊ साठे म्हणतात की, ” मुकुट मुंबई तुझा चढावा | लोकशाही चौघडा झडावा | कोटि कंठ देती ललकारी | नाद निनादे धनी अंबरी | चिरायू हो महाराष्ट्र आमुचा एकच ही अभिलाषा ”
या कवणावरून संयुक्त मुंबईसह मराठी भाषिक प्रांत म्हणून महाराष्ट्राची निर्मिती व्हावी याची अण्णाभाऊ साठे यांच्या उरामध्ये असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहायला मिळते अण्णाभाऊ साठे तनाने, मनाने, धनाने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये लढले झगडले, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी क्रांतिकारी निर्माण करण्याचे काम त्यांनी केले म्हणून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे योगदान फार मोठे आहे हे विसरता येणार नाही करिता आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त अण्णाभाऊ साठे यांच्या पावन स्मृतीस त्यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील लढ्याला त्यांच्या वैचारिक जाणिवा आणि प्रगल्भतेला कोटी – कोटी , त्रिवार अभिवादन……!
– प्रा.डॉ.पांडुरंग रामराव सुतार
जीवनदीप महाविद्यालय, पिंपळनेर, ता.जि.बीड 431122.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply