kinwat today news

अण्णा भाऊ साठे यांचे सहकारी दिगंबरराव दुर्गे निर्वतले

किनवट टुडे न्युज।। अहमदपूर जवळच्या धसवाडी या गावात राहणारे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या कला पथकातील ज्येष्ठ सहकारी दिगंबरराव लिंबाजी दुर्गे यांचे वयाच्या 93 व्या वर्षी आज पहाटे दुःखद निधन झाले. चार महिन्यांपूर्वी त्यांना भेटायला मी मुद्दाम धसवाडीला गेलो होतो. तेव्हा भरपूर उंची लाभलेले काळेसावळे पण काटक असलेले दादा मला फार भावले होते. वयस्क असूनही सलग चार तास ते माझ्याशी बोलले .अण्णाभाऊंचे “अकलेची गोष्ट ” हे वगनाट्य त्यांना संपूर्ण मुखोद्गत होते. त्यातील अनेक संवाद त्यांनी मला म्हणून दाखवले.या वगनाट्याच्या अनेक तालमी धसवाडीत शंकराव कांबळे यांच्या वाड्यात झालेल्या होत्या. अण्णाभाऊ धसवाडीला कसे आले आणि कसे ते तिथे रमले, जवळ जवळ तीन साडेतीन महिने त्यांचा मुक्काम शंकराव कांबळे यांच्या वाड्यात होता. त्या सर्व आठवणी दादांनी मला सांगितल्या. गावातील आणि परिसरातील विविध जातींतील गुणी कलावंत त्यांनी एकत्र केले होते. परभणीचे कॉम्रेड चंदाताई फुलारी आणि त्यांचे पती हे दोघेही तिथे येत असत.
अहमदपूर येथील काही कॉम्रेडही त्यांच्या संपर्कात होते. या सर्व आठवणी दादांनी मला सांगितल्या. बोलता बोलताच त्यांचा आवाज कातर व्हायचा. पण तरीही मोठ्या ताकतीने अण्णाभाऊंची गाणी त्यांनी मला गाऊन दाखविली.
अण्णाभाऊंची शाहिरी ही तशी गायला खूपच अवघड. तरीही पहाडी आवाजात, आरोह-अवरोहाच्या अनेक ताना घेत, दादा मला गाणी म्हणून दाखवत होते. दादांनी मला अनेक गाणी म्हणून दाखवली. तेव्हा मीच त्यांना थांबवलं. दम लागत होता; तरीही दादा गातच होते . अण्णा भाऊंच्या आठवणींनी गहिवरले होते. दादा पुन्हा पुन्हा उंच आवाजात गातच होते. “अकलेची गोष्ट” या वगनाट्यात अण्णाभाऊ बंडा गवळ्याची भूमिका करायचे .त्याच वगनाट्यात दादा छोटीशी भूमिका करायचे. ते उत्कृष्ट गायक होते. तसेच वादकही होते. धस वाडी आणि खंडाळी परिसरात उत्कृष्ट बांधकाम करणारे शिल्पकार म्हणून ते नावाजलेले होते.आज त्यांचा एक मुलगा गावचा सरपंच आहे तर दुसरा तंटामुक्त समितीचा अध्यक्ष. दोघेही त्या गावाची प्रामाणिकपणे सेवा करत आहेत. दिगंबरराव दुर्गे यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली आहे. अण्णाभाऊंचा सहवास लाभलेले, अण्णाभाऊंच्या सोबत प्रत्यक्ष वगनाट्यात काम केलेले दिगंबरराव दुर्गे ही एक ऐतिहासिक अशी ठेव होती. विशेष म्हणजे ” करा रे करा रे, कडं एकीचं करा रे ” हे अन्यत्र कुठेही न छापलेलं अण्णाभाऊंचं गाणं दादांनी मला पूर्णपणे मुखोद्गत म्हणून दाखवलं. तेच गाणं नंतर सीताराम धसवाडीकर, त्याचबरोबर श्रीराम दुर्गे यांचे वडील अशा इतर काही जणांनीही मला म्हणून दाखवलं. म्हणजेच ते गाणं अण्णाभाउंनी खास धसवाडीमध्ये लिहिलं होतं . धसवाडीतील तीन-साडेतीन महिन्यांच्या वास्तव्यात अण्णाभाऊंनी अनेक कथा लिहिल्या. “सापळा” , आणि “विठू महार ” या कथा तर प्रत्यक्ष धसवाडी आणि खंडाळी या गावात घडलेल्या घटनांवर आधारित होत्या. इथंच अण्णाभाऊंनी नवी गाणी बसवली. अण्णाभाऊंचे एक कलापथकच त्या ठिकाणी कार्यरत होतं. लातूर जिल्ह्यातील साकोळ जवळगा, उदगीर, अहमदपूर आणि नांदेड जिल्ह्यातील माळेगाव या परिसरात अण्णाभाऊंनी अनेक कार्यक्रम या काळात दिले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारासाठी अण्णाभाऊ तेव्हा भालकी बिदर या परिसरातही जाऊन आले होते.
अण्णाभाऊ जेव्हा मुंबईला परत जायला निघाले, तेव्हा अख्खा गाव आणि परिसरातील लोक त्यांना पाठवायला लातूर पर्यंत गेले होते, ही आठवणही दादांनी मला सांगितली. हा सगळा आठवणींचा ठेवा दादांच्या जवळ होता. आज आपण त्याला मुकलो आहोत. हा कोरोनाचा काळ संपल्यानंतर पुन्हा एकदा धसवाडीला जावं आणि दादांना भेटावं ,असं मी मनोमन ठरवलं होतं. पण नियतीने ते होऊ दिले नाही. मी दादांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. दादा तुम्हाला शेवटचा जय भीम, लाल सलाम…!
– प्रा.मारोती कसब (उदगीर)

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply