kinwat today news

किनवट – माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना विरुध्‍दचा लढा आरोग्य यंत्रणेचे खरे योध्दे अतिशय सक्षमपणे लढत आहेत

किनवट/तालुका प्रतिनिधी : जिल्‍हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व सहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्‍या मार्गदर्शनाखाली किनवट व माहूर तालुक्यातील ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे. आरोग्‍य सेविका, आरोग्‍य सेवक, आशा वर्कर, अंणवाडी कार्यकर्ती इत्‍यादी कर्मचारी हे नांदेड जिल्‍ह्यातील आरोग्‍य यंत्रणेचे खरे “कोरोना वॉरियर्स” असून ते तालुका आरोग्‍य अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांच्‍या मार्गदर्शनाखाली कोरोना (कोविड-19) अनुषंगाने ग्रामीण भागात कोरोना विरुध्‍दचा लढा अतिशय सक्षमपणे लढत आहेत. असे प्रतिपादन जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर किनवट – माहूर तालुक्यातील आरोग्य विभागाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी ते आले असता तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, किनवट येथे संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे ( किनवट ) व डॉ. साहेबराव भिसे ( माहूर ), प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश जाधव ( देहलीतांडा ), डॉ. वामन म्हात्रे ( कोठारी सिंद. ), डॉ. गणेश जाधव ( आष्टा ) उपस्थित होते. या दौऱ्यात त्यांनी माहूर व किनवट येथील कोविड केअर सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा व दहेली तांडा येथे भेट देऊन तयारी बद्दल समाधान व्यक्त केले.
पुढे डॉ. शिंदे म्हणाले,ग्रामीण भागात आरोग्‍य यंत्रणा सक्षमरित्‍या कार्य करीत असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी योग्‍य ती पावले उचलत आहे. घरोघरी जाऊन सर्वेक्षणासाठी आशा वर्कर, आरोग्‍य सेवक आणि समुदाय आरोग्‍य अधिकारी यांची पथके तयार करण्‍यात आली असून या पथकामार्फत ग्रामीण भागात मागील दिड महिण्‍यांपासून दैनंदिन सर्वेक्षण सातत्‍याने करण्‍यात येत आहे. या सर्वेक्षणामध्‍ये प्रत्‍येक गावात, वाडी, वस्‍त्‍यांमध्‍ये बाहेर जिल्‍ह्यातून येणाऱ्या सर्व व्‍यक्‍तींची ताप सर्दी खोकला व तत्सम लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची माहिती घेऊन अति जोखमीच्‍या व कमी जोखमीच्‍या रुग्‍णांना आवश्‍यकतेनुसार कोरोना केअर सेंटर अथवा जिल्ह्याच्‍या डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल्‍स येथे दाखल करण्‍यात येत आहे.
जनतेने घाबरुन जाऊ नये व आपल्‍या घरातच राहावे. गरज असेल तरच बाहेर जावे. ताप किंवा कोरोना सदृश्‍य लक्षणे आढळल्‍यास तातडीने नजिकच्‍या ताप उपचार केंद्रामध्‍ये जाऊन तपासणी व उपचार करुन घ्‍यावेत. सर्वेक्षणात आपल्‍या घरी येणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना योग्‍य ती खरी माहिती देऊन सहकार्य करावे. हात वारंवार साबणाने स्‍वच्‍छ धुवावेत, संपर्कातील व्‍यक्‍तींशी योग्‍य अंतर ठेवावे, मास्‍क अथवा स्‍वच्‍छ रुमाल वापरावा, साथ पसरु नये यासाठी सर्वांनीच काळजी घ्‍यावी. आपल्‍या मोबाईल मध्‍ये आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करुन त्‍याचा वापर करावा, असे आवाहनही जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. शिंदे यांनी प्रशासनातर्फे केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply