kinwat today news

गुरूद्वारातील कोरोना संसर्ग वाहनचालकांमुळे झाल्याची शक्यता जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात

नांदेड, दि. २ मे २०२०:
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या अचानक २६ झाली असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी भयभीत न होता अधिक खबरदारी बाळगावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

चव्हाण यांनी शनिवारी सायंकाळी फेसबुकवरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, गेल्या आठवड्यापर्यंत नांदेडमध्ये एकही रूग्ण नव्हता आणि आज ही संख्या २३ ने वाढून २६ वर गेली. नांदेडमधील जुन्या ३ रूग्णांपैकी १ महिला परभणी जिल्ह्यातून उपचारासाठी आली होती, तर २ रूग्ण हे शहराच्या वेगवेगळ्या भागातील रहिवासी होते. या २ रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे नांदेड शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात आज वाढलेल्या २३ रूग्णांमध्ये २० जण गुरूद्वाराचे सेवेकरी तर ३ जण पंजाबहून परतलेले वाहनचालक आहेत.

गुरूद्वारात अडकलेल्या भाविकांना नेण्यासाठी पंजाबहून आलेल्या वाहनचालकांना प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाला असावा आणि परतीच्या प्रवासात अनेक भाविकांनाही त्याची लागण झाली असावी, अशी शक्यता पालकमंत्र्यांनी व्यक्त केली. कोरोना झालेल्या २० सेवेकऱ्यांमध्ये विषाणूची लक्षणे नव्हती. २६ एप्रिल रोजी पंजाबहून आलेल्या ७८ बसेसचे प्रत्येकी २ वाहनचालक-कर्मचारी नांदेडला मुक्कामी होते. त्यांनी लंगरमध्ये जेवणही घेतले होते. त्यातून सेवेकऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असावी. २३ एप्रिल रोजी पंजाबला गेलेल्या नांदेडच्या वाहनचालकांना देखील ते परतल्यानंतरच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते, याकडे लक्ष वेधून चव्हाण यांनी नवीन २३ रूग्णांच्या संक्रमणाचा स्त्रोत नांदेड शहर नसून, तो बाहेरून आला असण्याचा अंदाज व्यक्त केला.

पंजाबच्या भाविकांना नांदेडच्या गुरूद्वारात कोरोना झाल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. गुरूद्वारात इतक्या मोठ्या प्रमाणात लागण झालेली असती तर नांदेड शहरातही संसर्गाचे तसेच मोठे प्रमाण दिसून आले असते. पण शहरात तशी परिस्थिती नाही. गुरूद्वारामधील बाबांनी देखील या प्रवाशांना नांदेडमध्ये लागण झालेली नसल्याचे सांगितले आहे. गुरूद्वारात या भाविकांची नियमित तपासणी सुरू होती. या भाविकांनी नांदेडला असताना कोरोनाची लक्षणे दिसत असल्याची किंवा त्रास होत असल्याची तक्रार केली नव्हती. तशी कोणतीही नोंद नाही. तसे असते तर गुरूद्वारा प्रशासनाने त्यांची तातडीने तपासणी करून घेतली असती व त्यांच्यावर उपचार सुरू केले असते, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना झालेले गुरूद्वारामधील २० सेवेकरी एकाच परिसरात वास्तव्यास होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या परिसरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. तेथील नागरिकांच्या तपासण्या होत आहेत. हा संसर्ग त्याच भागात रोखण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे आणि कोणताही त्रास होत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी या निवेदनातून केले आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply