निवृत्ती एका ध्येयवेड्या शिक्षकाची…

।।किनवट टुडे न्युज।। –
शिवाजी खंडुजी गायकवाड हे लातूर जिल्हा परिषदेच्या हंगरगा येथील प्राथमिक शाळेतून सहशिक्षक म्हणून प्रदीर्घ सेवेतून उद्या निवृत्त होत आहेत. ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना मनापासून शिकवणारा आणि पोटच्या लेकराप्रमाणे जीव लावणारा एक उपक्रमशील शिक्षक म्हणून शिवाजी गायकवाड सर यांची चाकूर ,उदगीर, शेळगाव, हाळी या परिसरात ओळख आहे. माझे मित्र ग्रामीण कथाकार आणि पत्रकार भरतकुमार गायकवाड यांचे ते वडील आहेत. उदगीर पासून जवळच असलेल्या डोंगरज या गावी ते राहतात. भरतकुमार गायकवाड यांच्यासोबत अनेकदा डोंगरज ला जाण्याचा मला योग आला. सुट्टीच्या दिवशी मी जेव्हा जेव्हा डोंगरज या गावी गेलो ,तेव्हा तेव्हा मला शिवाजीराव गायकवाड सर म्हणजेच अण्णा हे गावातील विद्यार्थ्यांना एकत्र करून शिकवीत असलेले दिसले . मुलांना अभ्यासाबरोबरच गोष्टी गाणी शिकवीत असलेले मी पाहिले आहे. विशेषतः शालेय शैक्षणिक साहित्य तयार करण्यामध्ये गायकवाड सरांचा हातखंडा आहे . त्यांचं छोटसं टुमदार घर म्हणजे मला एक शाळेची सजवलेली वर्ग खोलीच वाटते. गावाच्या खालच्या बाजूला रस्त्याला लागूनच गायकवाड सरांचे घर आहे. अंगणामध्ये प्रवेश करतानाच विविध प्रकारांची झाडं आपले स्वागत करतात. आपण थोडं आत गेलो की खाली फरशीवर गायकवाड सरांनी रंगविलेली बाराखडीची अक्षरं आपलं लक्ष वेधून घेतात. एका उपक्रमशील शिक्षकाचे घर असल्याचे लक्षात यायला आपल्याला वेळ लागत नाही. अंगणामध्ये अनेक रंगीबिरंगी मराठी अक्षरं, इंग्रजी अक्षरं त्याच बरोबर घराच्या भिंतीवर विविध पशुपक्ष्यांची अशी अनेक प्रकारची चित्रं त्यांनी स्वतः रंगवून घेतलेली आहेत. शाळेत आणि घरातही शिक्षण कार्यात रमणारा हा अवलिया शिक्षक या परिसरात लोकप्रिय आहे. खरं म्हणजे शहरात बंगला बांधून राहता यावं एवढा पगार असतानाही, अण्णा मुद्दामहून खेडे गावात राहतात. ज्या मातीत आपला जन्म झाला त्या मातीतल्या माणसांची सेवा करता यावी हा त्यांचा उद्देश आहे . गावातील उडाणटप्पू मुलांना एकत्र करून ते शिक्षण आणि नोकरीविषयक मार्गदर्शन करतात . अनेक अडल्यानडल्या ना आपल्यापरीने मदत करतात. ही त्यांची समाजसेवाच. सतत कार्यमग्न राहणं हा अण्णांचा स्वभावच. अनेकदा शैक्षणिक साहित्य बनवत असलेले अण्णा आपल्याला दिसतात . त्यांचं संपूर्ण घरंच पुस्तकांनी आणि शैक्षणिक साहित्यांनी भरलेले आपल्याला दिसून येते. त्यांना अनेक जुन्या गोष्टी जतन करण्याचाही छंद आहे. त्यांच्याकडे अनेक जुनी पुस्तकं आहेत . त्याचबरोबर लहान मुलांना शाळेची आणि अभ्यासाची गोडी लागावी, त्यांची समज वाढावी , यासाठी आवश्यक शैक्षणिक साधनांनी त्यांचे घर अगदी भरून गेले आहे. विद्यार्थ्यांना विविध रंगांची ओळख व्हावी, विविध आकारांची ओळख व्हावी, त्याचबरोबर त्यांनी अंकगणित सहज शिकावं यासाठीचे प्रयत्न गायकवाड सर सातत्याने करत असतात. त्यांच्या शैक्षणिक साहित्यामध्ये अनेकदा मला विविध वस्तू दिसल्या. मुलांना निसर्गाच्या संगतीत राहून शिकवण्याचा गायकवाड सरांचा प्रयत्न असतो. विविध रंगांचे आणि आकाराचे नदीतले खडे गोटे , गजगे, चिंचोके आदी फळांच्या बिया, त्याचबरोबर विविध रंगांच्या वस्तू त्यांनी आपल्या संग्रहामध्ये ठेवलेल्या आहेत. गायकवाड सर स्वतःच एक उत्कृष्ट चित्रकार आहेत. त्यामुळे चित्रांची त्यांना विशेष जाणीव आहे. अनेक रंगांची चित्रे त्यांनी कपाटावर रंगविलेली आहेत .ते जेव्हा शाळेत जातात तेव्हा त्यांच्याकडे एक मोठी बॅग असते आणि अगदी हसत खेळत ते आपल्या मुलांना शिकवीत असतात. सुंदर आणि स्वच्छ हस्ताक्षराची देणगी गायकवाड सरांना मुळातच लाभलेली आहे . त्यांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचे अक्षर ही अत्यंत लयबद्ध ,रुबाबदार आणि वळणदार अशी आहेत. गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून अध्ययनाच्या माध्यमातून ते मुलांशी रममाण झालेले आहेत. एकरूप झालेले आहेत .मुलांचे संपूर्ण भावविश्व त्यांना मुखोद्गत आहे. म्हणून मुलांबरोबर खेळताना ते स्वतःच एक मूल होऊन जातात. गायकवाड सरांना जेव्हा जेव्हा मी भेटलो तेव्हा तेव्हा त्यांच्यातलं
हे मूल मला अचंबित करून गेलं. अत्यंत हळवा, संवेदनशील मनाचा हा एक आदर्श असा शिक्षक आहे, हे त्यांना भेटल्यावर सहजच लक्षात येतं. पहिल्यांदाच लक्ष वेधून घेते ती त्यांची गोड मधुर वाणी. दलित जाती समूहात जन्मल्यामुळे लहानपणी अत्यंत दुःख हाल-अपेष्टा सहन केलेले गायकवाड सर अत्यंत मनमिळावू आणि सहनशील आहेत. जातिभेदांमुळे लहानपणीच वाट्याला आलेली अस्पृश्यता, सर्व प्रकारच्या वंचना, उपेक्षा सहन करूनही त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र आणि तेवढाच बाणेदार बनलेला आहे. प्रकारची दुःख त्यांनी लहानपणी पाहिलेले आहेत. स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज, लोकराजा शाहू महाराज, क्रांतिगुरू लहुजी साळवे, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जाणीवपूर्वक त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली आहे. त्यामुळे आपण भोगलेले दुःख निदान पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नये म्हणुन गायकवाड सर हे सतत प्रयत्न करत असतात. त्यांच्या हातून आतापर्यंत अनेक मुले घडलेली आहेत. शिवाजीराव गायकवाड यांचा जन्म 1 मे 1962 रोजी डोंगरज येथील एका छोट्याशा खोपटामध्ये झाला. त्यांचे वडील खंडुजी गायकवाड हे त्या काळातील नामवंत बँड मास्टर. पण आपल्या मुलांनी बँड मास्टर होऊ नये तर शाळा मास्तर हे स्वप्न खंडूजीनी पाहिलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम शिवाजीराव गायकवाड यांनी केलं .1982 पासून ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षक होऊन आपली सेवा बजावत आहेत. गायकवाड सरांना खूप शिक्षण घ्यायचे होते. बारावी पास झाल्यानंतर उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयामध्ये त्यांनी पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. परंतु घरची परिस्थिती गरिबीची. त्यामुळे डीएड करून चटकन नोकरी लागावी या हेतूने त्यांनी उच्च शिक्षणावर पाणी सोडले आणि ते अध्यापनाकडे वळले. १९८२ मध्ये उदगीर तालुक्यातील मोर्तळवाडी या ठिकाणी त्यांनी आपली सेवा बजावली . त्यानंतर पीरतांडा येथे काही दिवस ,त्यानंतर चाकूर तालुक्यातील महांडुळ या गावी त्यांची दहा वर्षे सेवा झाली. त्यानंतर राचन्नावाडी या गावामध्ये त्यांनी आठ वर्षे सेवा बजावली आणि गेल्या बारा वर्षांपासून उदगीर जवळच्या हंगरगा या गावामध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. त्यांनी ज्या ज्या गावी नोकरी केली त्या त्या गावातील गावकऱ्यांनी त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविलेले आहे. चाकूर पंचायत समितीचा आदर्श पुरस्कार, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेचा शिक्षकरत्न पुरस्कार, उदगीर येथील ना. य. डोळे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्याचबरोबर लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविले आहे. या परिसरामध्ये एक आदर्श शिक्षक म्हणून शिवाजीराव गायकवाड यांची ओळख आहे . त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले आहेत . आज विविध पदांवर ते कार्यरत आहेत. शिवाजी गायकवाड सरांनी आयुष्यभर विद्यार्थी हेच दैवत मानून अध्ययन आणि अध्यापन केले आहे. प्रदीर्घ सेवेनंतर उद्या ते सेवानिवृत्त होत आहेत. सरांना वाचन, लेखनाचा छंद आहे. ते कविता करतात. लेख लिहितात. त्यांना शैक्षणिक साहित्याची आवड आहे. यापुढेही त्यांनी आपले हे छंद जोपासावेत .त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची प्रार्थणा निर्मिकाचरणी करतो आणि गायकवाड सरांना सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा देतो.
– प्रा. डॉ. मारोती कसाब ,
महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर जिल्हा लातूर.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Anand Bhalerao (Editor in Chief) 9421585350. सूचना -- या इंटरनेट न्युज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखा मधून व्यक्त झालेल्या मताशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही.

1 thought on “निवृत्ती एका ध्येयवेड्या शिक्षकाची…

Comments are closed.