kinwat today news

किनवट शहरात अवैध दारू चढ्या भावाने विक्री.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह.

किनवट ( तालुका प्रतिनिधी) बंद काळामध्ये नियमांची पायमल्ली करत शहरात अवैध दारू विक्रीने उच्चांक गाठला असताना देशी-विदेशी अनुज्ञाप्ती धारक व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिलीभगत मधून मोठ्याप्रमाणावर मागच्या दाराने मद्य काढून चढ्या भावाने विक्री करून सर्वच नियम धाब्यावर बसवण्याचा आरोप करत बंद तारखेपर्यंत बियरबार व देशी अनुज्ञाप्ती धारकांचे साठा तथा विक्री रजिस्टरची व प्रत्यक्ष साठ्याची पडताळणी करून दोषींविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्याची मागणी एका तक्रारी द्वारे करण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशानुसार कोव्हीड १९ संक्रमणाचा धोका लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्यात आले होते. अचानक मध्यरात्री हा आदेश आल्याने तळीरामांची भंबेरी उडाली दुसऱ्या दिवशी दुकाने बंद असल्याने अचानक मद्याची मागणी वाढली याचाच फायदा घेत दारू विक्रेत्यांनी मान वर काढली. ज्याला किनवट व गोकुंदा अनुज्ञाप्ती धारकांची साथ मिळाली मोठ्या प्रमाणात मागील दाराने दारू बाहेर काढून इतरत्र साठेबाजी करून चढ्या भावाने विक्री करण्यात आली.
असे असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाला उशिरा जाग आली. त्यांनी बंदी आदेशानंतर दोन दिवस उशिराने देशी-विदेशी दारू विक्री दुकाने तथा परमिट बार रेस्टॉरंटला बाहेरून सील लावून पंचनामा केल्याचा फार्स केला परंतु अनुज्ञात्यांमध्ये मागील दारा बाबत कोणतेही पडताळणी केले नसल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. शिवाय सिलिंग पूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विक्री व स्टॉक रजिस्टर तथा प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ व पाहणी करून प्रथम गोडाऊन व नंतर दुकान असे दुहेरी सीलिंग करणे क्रमप्राप्त असताना उत्पादन शुल्क विभागातले सिलिंग करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी अक्षम्य चूक करत कोणतीही पडताळणी न करता सिलिंग केल्याने ही कार्यवाही संशयास्पद असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
शिवाय सिलिंग करणारे अधिकारी व कर्मचारी यांनी कर्तव्यात गंभीर कसूर केली आहे. याची व सिलिंग करणाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिवाय आरोग्य आपत्ती काळामध्ये कलम १४४ व संचारबंदी लागू असताना गोकुंदा येथील देशी दारू विक्री दुकानांमध्ये १२८ बॉक्स दारू चोरी गेल्याची फिर्याद दुकानात काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. प्रत्यक्ष पाहता इतका काटेकोर बंदोबस्त असताना १२८ बॉक्स दारू चोरणे अशक्यप्राय आहे. परंतु सदर तक्रार व तक्रारदार यांच्या भूमिकेमुळे साशंकता निर्माण होत असल्याचा आरोप करत सदर दुकानातील दारू अगोदरच काळ्याबाजारात विक्री झाली असून कार्यवाहीच्या धास्तीने चोरी झाल्याचा फार्स रचण्यात आला असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
एकंदरीत राज्य उत्पादन शुल्क विभाग, स्थानिक प्रशासन, अनुज्ञप्ती धारक व अवैध दारू विक्रेत्यांच्या संगनमतातून बंद काळात दारूचा मोठा काळाबाजार झाल्याचे म्हणत सदर प्रकरणी निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असून जिल्हाधिकारी साहेबांनी स्वतःच्या देखरेखीखाली पथक निर्माण करावे या प्रक्रियेमध्ये राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक प्रशासन यांना दूर ठेवून निष्पक्ष चौकशी करून संबंधितावर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.

Social share
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

Leave a Reply